महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,104

डमरूवादिनी | कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 1284 2 Min Read

डमरूवादिनी –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख. क्र .१९ –

महाराष्ट्रातील काही मोजक्याच आणि रेखीव मंदिरांवर जी शिल्पे कोरली जातात त्यामध्ये अनेक पौराणिक दृश्य दाखवली जातात. रामायणातील आणि महाभारत कालीन प्रसंग दाखवणारे मोठमोठे शिलाखंड,  शिल्पांनी सजलेले असतात आणि ते मंदिरावर योग्य त्या ठिकाणी बसवलेले असतात. बहुतेक मंदिरे शिवाची आढळतात .त्या मंदिरांच्या मंडोवरावर सुरसुंदरींचे अंकन केलेले आढळते. अशाच पद्धतीने कोरवलीच्या मंदिरांवर ही डमरूवादिनी या सुरसुंदरी अंकन केलेले आहे.

कोरवली च्या मंदिरावर शिवाचे डमरू तल्लीन होऊन वाजवणारी मर्दला समूहातील डमरूवादिनी आपल्या मनमोहक हालचालीसह नृत्याविष्कारासाठि उभी आहे. तिच्याकडे पाहताच सुबक ठेंगणी तरुणी आपल्या समोर उभी राहते. कारण इतर सुरसुंदरीच्या मानाने तिची उंची कमी वाटते, तथापि कलाकारांनी तिच्या मस्तकावर केलेल्या चित्ताकर्षक केशरचनेमुळे इतर सुंदरीच्या उंचीप्रमाणे हीदेखील उंच भासते. या सुरसुंदरीची केशरचना येथे असणाऱ्या इतर सुरसुंदरीच्या मागाने फार वेगळी आणि आकर्षक अशी आहे.

तिने मस्तकावर आपले केस अगदी चोपून बसवलेले आहेत.राहिलेल्या केसांची दोन भागात रचना केलेली असून एकावर एक गोलाकार अंबाड्याप्रमाणे हे केस तिने बसविले आहेत. त्यामुळे तिच्या गोल गरगरीत पण  विलक्षण मोहक असणाऱ्या चेहर्‍यास या उभट केश रचनेमुळे चांगलीच शोभा आलेली आहे. चेहऱ्याला उठाव देणाऱ्या धनुष्याकृती भुवया, जमिनीवर खेळलेली नजर, नाजूक नासिका यामुळे एक वेगळीच तारुण्यसुलभ अप्सरा कलाकारांनी येथे उभी केली आहे.

तिने खांदे आणि हात पोटाशी घट्ट पकडलेल्या डमरूवर हळुवारपणे ताल धरीत आहेत. दोन्ही पायांनी तिने नृत्यासाठी सुरुवात केली आहे असे कलाकाराने दर्शविले आहे. या हिच्याहि  अंगाखांद्यावर सर्वत्र आभूषणे आहेत हीच्या गळ्यामध्ये एकूण तीन अलंकार आहेत. त्यामध्ये कंठहार, उपग्रीवा आणि स्तनहार हि आभूषणे दिसतात. स्कंदमाला, केयूर कर्णभूषणे, पादवलय आणि पाद जालक यांच्या जोडीला कटिसूत्र,उरूद्दाम आणि मुक्तदाम यांनीही हजेरी लावलेली आहे. बरोबर मधून सोडलेला वस्त्राचा नक्षीदार असा सोगा तिच्या व्यक्तिमत्वास उठाव देणारा आहे. त्रिभंगावस्थेतील ही अप्सरा सौष्ठवता आणि मार्दवता यांचा संगमच आहे. आपल्या कोणत्याही सौंदर्य लक्षणाकडे तिचे लक्ष नसून डमरू वाजवण्यात मग्न आहे असे दर्शविण्यात आलेले आहे.

अशा पध्दतीने कोरवलीच्या मंदिरावर असणार्‍या एकूण १८ देवांगणेचे वर्णन आपण पाहिले आहे.या सर्व देवांगणा एकाहून एक सरस अशा आहेत.त्यांची शब्दात वर्णने करणे कठिण आहे.तरी देखील मी छोटासा प्रयत्न करून त्यांना शब्दबध्द करण्याचा कयास केला आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a Comment