नृत्यमग्न शिव –
वेरूळला (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) लेणी क्र.१३ ते २९ या हिंदू लेण्या आहेत. यात प्रामुख्याने शिवाची शिल्पे आहेत. यातही परत नृत्य करणार्या शिवाची शिल्पे खुप वैशिष्ट्यपूर्ण आहेत.नृत्यमग्न शिव.
इथे घेतलेले छायाचित्र लेणी क्र. १४ मधील आहे. मुर्ती आता खंडित झालेली आहे. पण अगदी पहिल्याच दर्शनात मुर्तीकाराने शिल्पबद्ध केलेली लयबद्धता डोळ्यात ठसते. प्रत्यक्ष शिवतांडव चालू असताना कॅमेर्याने शुटींग करावे आणि त्यातील एक फ्रेम स्थिर करून ठेवावी अशी एक विलक्षण गती या शिल्पात जाणवते. मुर्ती खंडित असल्याने इतर बारकावे तज्ज्ञ नजरेने शोधावे लागतात. उजव्या बाजूला खाली पखवाज सारखे वाद्य उभे ठेवून ड्रम सारखे वाजशिणारे तीन वादक आहेत.
बाजूला कृश देहाची भृंगी आहे. पाठीमागे गणांसह पार्वती आहे. ब्रह्मा विष्णु आहेत. ऐरावतावर बसलेला इंद्र आहे. एडक्यावर बसलेल्या अग्निचिही मुर्ती कोरलेली आहे. पार्वती डावे कोपर टेकवून आरामात उभं राहून नृत्य करणार्या शिवाकडे कौतूकाने पहात आहे. आठ हातांचा हा नृत्यमग्न शिव विलक्षण कलात्मक उर्जेने भारलेला भासतो.
शिल्पकाराने मुर्तीचा तोल साधण्यासाठी हातांची रचना, बाजूच्या शिल्पांची रचना, अगदी पायाच्या पंज्याची रचना विलक्षण सुंदर पद्धतीने केली आहे. मुख्य डाव्या उजव्या दोन हातांची बोटं एकमेकांत गुंतवून एक सुंदर नृत्यमुद्रा साकार झाली आहे. यातील बारकावे अभ्यासक अजून नेमके सांगु शकतील. पण एका सामान्य दर्शकाच्या डोळ्यात विलक्षण ऊर्जापूर्ण नृत्यआवेश ठसून राहतो. आता लगेच ही मुर्ती जिवंत होउन डावा टेकवलेला पंजा कायम ठेवून उजवा पाय फिरवत गिरकी घेईल की काय असेच वाटते.
Pic – Travel Baba Voyage.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद