डांगे धनगर –
आत्तापर्यंतच्या अभ्यासात आपण ‘हट्टगर, दनगर, गौळी, म्हस्के, तेल्लारी आणि बरगे या शब्दाची व्यत्पत्ती आणि गोपालनाशी संबंधित इतिहास संदर्भासहित मांडला आहे. आता ‘डांगे’ या शब्दाविषयी जी ऐतिहासिक माहिती उपलब्ध झाली(डांगे धनगर), ती पुढीलप्रमाणे-
लेखक जोगळेकर लिखित सह्याद्री या पुस्तकात डांग म्हणजे खिंडीत किंवा अरुंद दरीत असलेला झाडीचा प्रदेश, डोंगराळ प्रदेश, टेकडीचे शिखर होय. तसेच, इतिहासात ‘डांगे’ म्हणजे पद होते.. ज्याला जकात अधिकारी म्हणत जो घाटमार्गाचे रक्षण करण्याच्या कामी मदत करीत. आणि डांगी म्हणजे जंगलातील रहिवासी किंवा बंडखोर असे अर्थ सांगितले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, भूधरगड, राधानगरी, बावडा आणि पन्हाळा तालुक्यात डांगे धनगर लोक प्रामुख्याने आढळतात. ते अतिशय दुर्गम भागात राहत असून अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगतात.
डांगे लोक हे मूळ हट्टी वंशाचे असून त्यांचे परंपरागत नातेसंबंध पश्चिम महाराष्ट्रातील हटकर मंडळींशी होतात. तसेच, गजी नृत्य, ओव्या, पूर्वज देवता बिरोबा, खंडोबा हे सर्व साम्य दर्शविते. कोल्हापूर गॅझेटनुसार डोंगराळ प्रदेशात राहतात म्हणून यांना डांगे म्हणतात, त्यांचे मूळ दक्षिणेकडील असून त्यांना कानडे देखील म्हणतात. मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांनी दिलेल्या एका अहवालानुसार, “हाटकर, झेंडे, ठेल्लारी आणि डांगे या फार पूर्वी वेगळ्या झालेल्या मूळ एकाच वंशाच्या जाती आहेत.” डांगे लोकांत प्रामुख्याने झोरे, बावधने, थोरात, शेळके, येडगे, लांबोर, फोंडे, वरक, बोडेकर, बरगे, कोकरे जानकर इत्यादी आडनावे आढळतात. लोकहितवादीकृत निंबंधसंग्रह दिलेल्या माहितीनुसार “मावळ व डांग प्रदेशात धनगर लोक जागोजाग वस्ती करून राहतात व त्याचे धनगरवाड्यात जो मुख्य असतो त्यास गावडे म्हणतात व त्याप्रकारचे महालही जुन्नर व भीमाशंकराकडे आहेत. आणि त्यांजवरील मुख्यास सरगावडा म्हणतात.”
जसे पश्चिम महाराष्ट्रात झेंडे, मेंढे, बंडे, हंडे तसेच मावळ- कोकणात म्हस्के, डांगे, गौळी हि नावे रूढ झाली असून हे सर्व एकच आहेत. वरील माहितीनुसार, हट्टगर, दनगर, बरगे, गौडा, तेल्लारी या शब्दांप्रमाणेच डांगे हा देखील एक ऐतिहासिक शब्द असून.. या सर्व तत्सम जमाती मूळ एकाच हट्टी वंशाच्या शाखा असल्याचे सिद्ध होते.
* फोटो साभार- कोकणी विश्वकोश, गोवा विद्यापीठ.
– सुमितराव लोखंडे