दंतवक्रवध | आमची ओळख आम्हाला द्या –
बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यात धर्मापुरी नावाचे प्राचीन गाव आहे. या गावाला प्राचीन वारसा असून कल्याणीच्या चालूक्याच्या काळात या गावाचा उल्लेख इंद्रनगरी म्हणून केला जात होता. धर्मापुरी येथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे केदारेश्वर मंदिर होय. हे मंदिर चालुक्यकालीन आहे. चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा याच्या काळात केदारेश्वर मंदिर बांधले. या नगराची स्थापना राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याने केली व पुढे हे नगर राष्ट्रकूटांची राजधानी बनली. राष्ट्रकुटांच्या काळात एक प्रसिद्ध बाजारपेठ,नागरी केंद्र, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र , वैभवशाली नगर म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळात धर्मापुरी हे नगर धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. धर्मापुरीत चालुक्यकालीन सहा शिलालेख मिळालेले असून, त्यापैकी चार कानडी एक देवनागरी व एक न वाचण्याच्या स्थितीत आहे. हे शिलालेख चालुक्य राजा भूलोकमल सोमेश्वर तिसरा यांच्या काळातील आहेत. यात धर्मापुरी ची संपूर्ण माहिती आहे.(दंतवक्रवध)
कल्याणीच्या चालुक्य काळात धर्मापुरी हे गाव धर्मापुर या नावाने ओळखले जात असे. या काळात याठिकाणी अनेक शिवमंदिरे होती. त्यापैकी चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा याच्या कालखंडात बांधण्यात आलेले केदारेश्वर शिवमंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराची मुख्य मंडप, अर्धमंडप मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराच्या मंडोवरावर काली, ब्रह्म ,नृसिंह, विष्णू, देवांगणा, रती, कामदेव, योगनरसिंह, भैरव, विष्णूच्या विविध विभव अवतारातील मूर्ती शिल्पांकित केलेल्या आहेत. मंदिरावरील इतर कोरीव काम अत्यंत सुबक रेखीव अशा स्वरूपाचे आहे. मंदिराच्या आवारात अनेक मूर्तिशिल्प आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे व दुर्मिळ प्रकारचे शिल्प म्हणजे दंतवक्र वध शिल्प होय.
धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराच्या मंडोवरावर हे शिल्प अंकित केलेले आहे. या शिल्पांमध्ये श्रीकृष्णाने दंतवक्रचा वध केला हा प्रसंग दाखवला आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या प्राचीन मंदिरांच्या बाह्यांगावर धार्मिक ग्रंथातील पौराणिक कथेला अनुसरून मूर्तिशिल्प घडवले गेल्याचे दिसते. त्याचप्रमाणे याही ठिकाणी हे शिल्प दिसते. महाभारतामध्ये दंतवक्राची कथा विस्ताराने दिली आहे. महाभारतामध्ये राजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाने शिशूपालाचा वध केला होता.
शिशूपालाचा दंतवक्र जिवलग मित्र होता. जरासंध वध व शिशूपाल वध या दोन्ही वेळेस दंतवक्र रणांगणातून पळून गेला होता. शिशुपाल वध व जरासंध वधाचा बदला घेण्यासाठी राजा शाल्य याने द्वारकेवर आक्रमण केले. तेव्हा दंतवक्र एकटाच द्वारकेला गेला. तो रथातून खाली उतरला हातामध्ये गदा घेऊन तो श्रीकृष्णावर धावून गेला व त्याने आपल्या हातातील गदेने श्रीकृष्णाच्या वक्षस्थळा वर जोरदार प्रहार केला. क्रोधीत झालेल्या श्रीकृष्णाने आपली कौमोदकी गदा उचलली आणि दंतवक्राच्या वक्षस्थळावर प्रहार केला. श्रीकृष्णाने केलेल्या प्रहारामुळे दंत वक्राची छाती फाटली. त्याच्याफासळ्या तुटून कौमोदकी गदा त्याच्या वक्षातून आरपार गेली आणि दंतवक्राचा वध झाला.
अशा पद्धतीची दंतवक्रवधाची कथा आहे. कथारूपाने केदारेश्वर मंदिराच्या मंडोवरावर अंकित केलेली आहे. या शिल्पांमध्ये श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार असल्याने तो चर्तुभुज दाखवला आहे. श्रीकृष्णाचे हे संहाररूप आहे. प्रदक्षणा क्रमाने खालच्या डाव्या हातात गदा असून ती दंतवक्राचे वक्षस्थळ भेदून आरपार झाल्याचे दाखवले आहे. डाव्या वरच्या हातात चक्र असून वरच्या उजव्या हाताने दंतवक्राचा शस्त्रधारी हात वरच्यावर वर धरलेला आहे.उजव्या खालच्या हाताने दंतवक्राचे केस श्रीकृष्णाने धरले आहेत. दंतवक्र द्विभूज असून उजव्या हातातील शस्त्राने तो श्रीकृष्णावर प्रहार करीत आहे. डावा हात मोकळा सोडलेला आहे.
श्रीकृष्णाच्या डोक्यावर किरिट मुकुट असून कानात चक्राकार कुंडले आहेत हातात कटकवलय, गळ्यात ग्रीवा, स्तनसूत्र, बाजूबंद पादवलय व पादजालक इत्यादी आलंकार आहेत. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर उग्र भाव असल्याने ह्यास संहारमूर्ती असेही म्हंटले जाते. याउलट दंतवक्राच्या चेहर्यावर भय आहे. वक्षस्थळ भेद नाने त्याचे डोळे विस्फारलेले दाखविलेले आहेत. त्याच्या तोंडातून त्याचे सुळे दात बाहेर आलेले दिसतात. दंतवक्राला जटामुकुट असून कानात कुंडले, ग्रीवा स्तनहार, कटिसूत्र, बाजूबंध, पायात पादवलय अत्यंत कलात्मकरीत्या कोरलेले आहेत. श्रीकृष्णाचा डावा आणि दंतवक्राचा उजवा पाय पूर्णतः भंगलेलाला आहे. कथेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे दंतवक्रच्या वधाचा प्रसंग या मूर्ती शिल्पात अंकित केलेला आहे.
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिराच्या मंडोवरावर पुराणे, उपनिषदे व इतर धार्मिक ग्रंथातील पौराणिक कथांचे अंकन शिल्प रूपाने केलेले आढळते. साधारणता रामायण महाभारतातील प्रसंगांचे वर्णन केलेले आढळते शिवाय विष्णूचे अवतार, शिवलीला मातृमूर्ती अशा विविध मूर्ती मंदिराच्या मंडोवरावर दिसतात. धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिराच्या मंडोवरावर असणाऱ्या मूर्तीशिल्पा पैकी प्रस्तुत दंतवक्र वधाची प्रतिमा दुर्मिळ स्वरूपाच्या शिल्पांमध्ये येते. आज पर्यंत अभ्यासकांनी या शिल्पाची ओळख काही ठिकाणी शिवमुर्ती तर काही ठिकाणी देवमुर्ती ,गंधर्व मूर्ती अशा विविध नावाने उल्लेख केलेला आहे. परंतु आजपर्यंत या मूर्तीची खरी ओळख कोणत्याच ग्रंथात आलेली नाही. प्रथमता या लेखाद्वारे ही मूर्ती नव्याने उजेडात येत आहे हे महत्त्वाचे आहे.ह्या मूर्तीसाठि बर्याच विद्वानांच्या वादानंतर सर्वांनी हि दंतवक्रवध मूर्ती म्हणून मान्य केलेले आहे.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर