दर्पणा –
कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१४ –
सौंदर्यप्रसाधनांमध्ये पूर्णपणे गढून गेलेली एक नाजूक स्वर्गीय अप्सरा दर्पणा या नावाने कोरवलीच्या सुरसुन्दरीच्या गोतावळ्यामध्ये उभी आहे. बहुतांशी दर्पणाची हजेरी कलात्मक मंदिरांवर लागलेली असतेच. या दर्पणा सुंदरीचे दोन पद्धतीने विभाजन करता येते स्वतःचे असे लावण्य स्वतःच्या हातातील आरशामध्ये प्रतिबिंबित झालेले त्यास सहजपणे न्याहाळताना सुरसुंदरी उभी असते तिला म्हणावयाचे दर्पणा.
आपल्या ढगाळ आणि दाट केशसंभारातील सरळ भांगात केतकी(कुंंकु) भरणारी सौंदर्य लतिका असते तिला म्हणायचे केतकीभरणा. अशा पद्धतीची अनेक शिल्पे महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांवर आढळतात.कोरवलीची ही दर्पणा इतर दर्पणेच्या प्रमाणे भासत असली तरीही कोरवली येथे या दर्पणेचे वेगळेपण कलाकारांनी फार कौशल्याने दाखविले आहे.
ही सुरसुंदरी त्रिभंग आवस्थेत उभी आहे. त्यामुळे मुळचाच देखण्या बांधेसूद अशा तिच्या शरीरयष्टीस एक वेगळी ळाळी आली आलेली आहे. पूर्णपणे शृंगारात गढून गेलेली ही अंगणा इतकी नीटनेटकी दर्शवली आहे की, तिच्या सौंदर्याचे आणि प्रसाधनाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. तिची केशरचना अतिशय रेखीव अशी आहे. तिच्या मस्तकावरील मुक्ताजाल नजर खिळवून ठेवणारे आहे. केसांच्या लहान लहान बाटांची रंगावली शोभून दिसणारी आहे. कपाळाच्या दोन्ही बाजूस आणि मधोमध केसांचे अगदी लहान लहान पण नक्षीदार असे घोस सोडलेले आहेत. चेहरा गोलाकार असला तरी तिची हनुवटी मात्र थोडीशी लांब आहे.
मानेखाली तिच्या शरीराला दिलेला एक लयबद्ध बाक कलाकारांने जाणीवपुर्वक दाखविलेला आहे. तिच्या डाव्या मुडपून धरलेल्या हातामध्ये दर्पण म्हणजे आरसा पकडला आहे व उजवा हात खांद्यापासून उंच करून तिने तो किंचितसा कोपर्यात वाकवून आपल्या सुरेख केशरचनेतील सरळ भांगात केतकी भरण्याचा प्रयत्न चालविला आहे.
आपण भांगात भरलेले कुंकु नीट बसलेले आहे किंवा नाही हे ती डाव्या हातातील आरशामध्ये पाहात आहे. आपल्या शृंगारात ती एवढी मग्न झालेली आहे की, तिची एकाग्र नजर दर्पणावर खिळून आहे. अशा या रूपगर्वितेच्या सर्वच हालचाली कलाकारांनी एवढ्या सुंदर पद्धतीने टिपलेल्या आहेत की, त्यामुळे हे शिल्प फार बोलके झालेले आहे. दोन्ही हातांच्या हालचाली बरोबर त्यामध्ये घातलेल्या आभूषणांची किणकिण सूक्ष्मपणे टिपली आहे. भलीमोठी कर्णफूले तिच्या सौंदर्यात भर घालणारी आहेत. आणि तिला साजेसा आहे.उजवा हात उचलून वर मस्तकाशी धरताना तिचे सौंदर्य अधिकच सुंदर दिसते.
ह्या सौंदर्यवतिने परिधान केलेले वस्त्र आणि दागिने ठळकपणे नजरेत भरणारी आहेत. देखणे उदरबंध, त्याखाली कटीसूत्र, उरूद्दाम, मुक्तदाम आणि सर्वांच्या मधोमध असलेला अत्यंत रेखीव व नक्षीदार असा तिच्या वस्त्राचा सोगा तिच्या कमनीयतेला शोभणारा आहे.पादवलय आणि पादजालक आभूषणांमुळे या ललनेच्या पदसौंदर्याची जाणीव होते. हे शिल्प बोलके देखणे आणि मनाला भावणारे असे आहे
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर