दर्पणा –
मीच माझ्या रूपाची राणी गं !
आपले स्वतःचे सौंदर्य आरशात न्याहाळणाऱ्या सुरसुंदरींना “दर्पणा” म्हणतात. सौंदर्यप्रसाधनात मग्न असणाऱ्या, डोळ्याभोवती काजळ घालताना, कर्णकुंडले बसवताना आरशामध्ये आपलेच प्रतिबिंब पाहणाऱ्या ह्या सुरसुंदरी. पहिल्या शिल्पामध्ये उजवा हात भग्न असून तो बहुधा कानापर्यंतच असावा त्यामुळे कदाचित कर्णकुंडले परिधान करताना ही सूरसुंदरी आपले सौंदर्य आरशात पाहत असावी. तिची बांधेसूद काया, तिच्या कोरलेल्या भुवया, नाजूक कटीभाग, वस्त्रालंकार पाहण्यासारखे आहेत. दुसऱ्या शिल्पामध्ये एक हात डोक्याच्या वर थोडा मागील बाजूस आहे त्यामुळे केशरचना करताना दाखवल्याचा भास होतो. तिसऱ्या शिल्पामध्ये एक हात डोक्याच्या वर पुढील बाजूस आहे त्यामुळे बिंदी सारखे आभूषण परिधान करत असल्याचा भास होतो. तीनही शिल्पे ही पुण्याजवळील भुलेश्वर मंदिरातील आहेत.
संदर्भ – सुरसुंदरी – प्रा. गो. बं. देगलूरकर
थोडं अवांतर –
सौंदर्य आणि आरसा यांचा संबंध तसा जुनाच. आरशाचा शोध लागण्याआधीही सौंदर्य होतंच. पण ते दुसऱ्यासाठीच किंवा दुसऱ्याच्या परिभाषेत मर्यादित. त्याआधी फक्त एखाद्या शांत, स्वच्छ, नितळ पाण्यातले स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचे सुख वाटेल तेव्हा घेता यावे यासाठी आरशाचा शोध लागला असावा. किंवा समोरील व्यक्तीचे सौंदर्य पाहताना आपण स्वतः कसे दिसतो हे पाहण्यासाठी म्हणजेच आत्मनिरीक्षण करण्यासाठीही लागला असावा. पण एक गोष्ट मात्र नक्की की या आरशामुळे माणसाच्या सौंदर्यदृष्टीला व्यापक आयाम मिळाला. मला नेहमी एक प्रश्न पडतो जर आरसा नसता तर सौंदर्यप्रसाधनांचा किंवा तत्सम उपकरणांचा शोध लागला असता का ? काळानुओघ हा आरसा फक्त स्त्री सौंदर्यापुरता मर्यादित न राहता पुरुषांच्या जीवनातही महत्वाचा भाग झाला. मजेशीर भाग म्हणजे माणूस काही बाबतीत स्वावलंबी झाला. स्वतःचे सौंदर्यप्रसाधन तो स्वतः करू लागला. स्त्रियांनी स्वतःचा मेकअप करणे, पुरुषांनी स्वतःची दाढी करणे हे या आरशाशिवाय अवघडच होईल. न्हाणीघर, ड्रेसिंग टेबलच्या कक्षा रुंदावत तो घरात इतर ठिकाणी पोहोचला, घराव्यतिरिक्त तो व्यायामशाळा/जिम, सलून/स्पा या व्यापारी आस्थापनांमध्येही दिसू लागला. गाड्यांचे प्रकाश परिवर्तीत करणारे दिवे, कॅमेरे, मोठ्या दुर्बिणी यासारख्या इतर अनेक गोष्टींपर्यंत त्याने मजल मारली. एखाद्या ठराविक क्षणाला आपली छबी/प्रतिबिंब कसे दिसते हे तिथे उपस्थित नसलेल्यांना तत्काळ एका क्षणात दाखवणारी सध्याची प्रसिद्ध “सेल्फी” या आरशाशिवाय शक्य झाली असती का ?
असो.. हे स्वबाह्यरुप दर्शन घडवणारा दर्पण स्वतःच्या अंतर्मनात डोकवायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.
– शैलेश गायकवाड.