श्री दशभुज चिंतामणी मंदिर –
सहकारनगर परिसरातील तुळशीबागवाले कॉलोनीमध्ये दशभुज चिंतामणी मंदिर आहे. हे मंदिर खळदकर कुटुंबियांच्या मालकीचे आहे. आबा बागुल उद्यानावरून अरण्येश्वर्कडे जाताना बँक ऑफ इंडियाच्या समोर एक रस्ता जातो. दशभुज गणपती मार्ग म्हणून तो ओळखला जातो. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक छोटे मैदान उजव्या हाताला दिसते. त्याच्याच थोडेसे पुढे श्री दशभुज चिंतामणी निवास नावाची बिल्डिंग उजव्या हाताला लागते. तेच दशभुज चिंतामणी मंदिर | Dasbhuj Chintamani Temple.
श्री. दा. सि. खळदकर गुरुजी यांना अश्विन शुद्ध विनायकी चतुर्थी, शुक्रवार दिनांक ०९ ऑक्टोबर १९६४, शके १८८६ रोजी सकाळी ११ वाजता विहीर खोदताना ९ फुटांवर हि दशभुज गणेशाची मूर्ती सापडली. नंतर विधिवत श्रींची प्राणप्रतिष्ठा केली. मूर्तीच्या कपाळावर ओंकार असून तीन डोळे आणि सौंड उजवीकडे वळलेली आहे. सोंडेवर रत्नकलश कोरलेला आहे. उजव्या हातात मोदक, डाव्या हातामध्ये तुटलेला दात आणि बाकीच्या आठ हातामध्ये अनुक्रमे पाश, अंकुश, गदा,त्रिशूळ, शंख, चक्र, धनुष्य, तोमर धारण केलेले आहे. मूर्तीचे हात अंगालगत आहेत. तसेच नाग आणि उंदीर यांचे संयुक्त आसन आहे. मूर्तीचे वजन अंदाजे अडीच मण, उंची दोन फूट व रुंदी दीड फूट आहे. मूर्तीचा रंग मूळचाच तांबडा असल्याने याला नर्मदेश्वर गणपती असे म्हणतात.
इमारतीच्या मुख्य फाटकामधून आत गेल्यावर मंदिराचे छोटेसे प्रांगण लागते. उजव्या हाताला छोट्याशा मंदिरामध्ये हनुमान, मूषक आणि नंदिसमवेत महादेवाची पिंड आहे. तर डाव्या हाताला मंदिराचे प्रवेशद्वार आहे. २/३ पायऱ्या चढून गेल्यावर सभामंडप लागतो.सभामंडप ऐसपैस असून छतावर जुन्या काळातील हंड्या आणि झुंबरे लटकवलेली आहेत.सभामंडपाच्या भिंतींवर हिंदू पुराणातल्या विविध प्रसंगांची चित्रे लावलेली आहेत. समोर गाभाऱ्यामध्ये उंचावर लाकडी नक्षीदार मखरामध्ये श्री दशभुज चिंतामणीची मूर्ती आहे.मागच्या बाजूला चांदीची प्रभावळ आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने सुंदर नक्षीकाम केलेल आहे.तसेच प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या कोनाड्यांमध्ये गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती आहे. तसेच मूर्ती आहे मंदिराचे जुन्या काळातील फोटो सुद्धा लावलेले आहेत.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिर – डॉ. शां.ग. महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/LwAe6umCj35BDbiT9
आठवणी इतिहासाच्या