महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,723

दासोपंत | दासो दिगंबरपंत देशपांडे

By Discover Maharashtra Views: 3880 4 Min Read

दासोपंत | दासो दिगंबरपंत देशपांडे…

दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत (इ.स. १५५१ – इ.स. १६१६) हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. यांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते संत एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात.

संत सर्वज्ञ दासोपंत हे इसवी सनाच्या १६-१७ व्या शतकात होऊन गेले. मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय. या पंचकांतीलच नव्हे तर एकूणच आजवरच्या संत काव्यांत सर्वाधिक, प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत होत. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यांत आपली विशिष्टता सिद्ध करते. त्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले.

या पंचकांतीलच नव्हे तर एकूणच आजवरच्या संत काव्यांत सर्वाधिक, प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणून दासोपंत यांचे नाव आदराने घेतले जाते. दासोपंत रोजचे नित्यकर्मे , आन्हिके आटोपत आणि अव्याहत लेखन करीत. साधारणपणे वयाच्या 35 – 40 व्या वर्षी ते आंबेजोगाई स्थिरावले .यावेळी त्यांनी लेखनास सुरुवात केली असे गृहीत धरल्यास ,त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षापर्यंत म्हणजे वीस ते पंचवीस वर्ष अखंड लेखन केले . त्यांना दररोज एक ढब्बू पैसा किमतीची शाई लागे असे सांगतात. दासोपंतांनी केवळ साहित्य निर्मिती केली नाही, तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यांत आपली वैशिष्ट्य आणि वेगळेपण सिद्ध करते.बेदर परगण्यातील नारायणपेठी दिगंबरपंत हे बेदरच्या अलीच्या दरबारात होते. दिगंबरपंतांकडे पंचमहाली देशमुख-देशपांडेपण होते. बालपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दासोने मुंज होताच चारही वेद मुखोद्गत म्हणून दाखविले, असे सांगितले जाते.

दासोपंतांच्या वाङ्मय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण ‘पासोडी’ होय. ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण, अध्यात्मज्ञानाचा विषय चित्राकृतींतून मांडलेला आढळतो. ही पासोडी मराठी संतवाङ्मयात अनन्य, अपूर्व व एकमेवाद्वितीय अशीच म्हणावी लागेल. दासोपंतांच्या सर्जन व सृजनशक्तीचे दर्शन यातून घडते. दासोपंत एक उत्तम चित्रकार होते याची साक्ष पासोडीतील चित्रांवरून सहजच मिळते. आजवर निर्माण झालेल्या पारमार्थिक वेदांती वाङ्मयात दासोपंतांची पासोडी ही वेदांतातील पंचीकरण इतक्या सूक्ष्मपणे, विस्ताराने विवरण करणारी एकमेव आकृत्या असलेली व चित्रमय वाङ्मयीन रचना असावी.

दासोपंतांची वाङ्मयनिर्मिती विपुल असून, त्यातील वैविध्य लक्षवेधी आहे. सव्वा लक्ष ओव्यांचे प्रदीर्घ गीताभाष्य म्हणजे दासोपंतांचा ‘गीतार्णव’ होय. ‘दिगंबरानुचर’ ही नाममुद्रा धारण करून दासोपंतांनी आपले ग्रंथ लिहिले. गीतेच्या श्लोकांवर स्वयंप्रज्ञा भाष्य व परमार्थ निरूपण ही मुख्य विषय स्वीकारून विवेचनातून चिंतन करणारे निबंध, समाजकथा, बोधकथा सांगत प्रशस्त विवेचनशैलीने, विस्ताराने विषय मांडणी, यांत केलेली दिसते.

दासोपंतांनी सव्वालक्ष पदांचा ‘पदार्णव’ रचला. आताच्या घडीला त्यांची ३००० ते ३५०० पदेच उपलब्ध आहेत. संत दासोपंतांच्या पदरचनेत विविध आकृतिबंध आढळतात. त्यात ओवी, धवळे, ध्रुवा, चौचरणी, जती, अभंग, पद, प्रबंध, आरती, शेजारती, लळित आरती, भारूड, गवळण, विरहिणी, पाळणा, हिंदूोळा, कूट, स्तोत्र, श्लोक, अष्टक यांचा समावेश होतो. दासोपंतांच्या वाङ्मयात विविध भाषांची पदे आढळतात. त्यात संस्कृत, प्राकृत, मराठी, हिंदी, ब्रज, फारसी, उर्दूमिश्रीत हिंदी, कन्नड, तेलुगु असे भाषावैविध्य आहे. तसेच हिंदी-मराठी या दोन भाषामिश्रित मणिप्रवाळ रचनाही आढळते.

भारतातील ६४ ललित कलांमध्ये संगीत, चित्र आणि काव्य यांचे विशेष महत्त्व आहे. त्यातही संगीत कला अधिक प्रभावी म्हणून श्रेष्ठ. गीत-वाद्य-नृत्य ही त्रिपुटी म्हणजे संगीत. या तीनही ललित कला, सौंदर्य, माधुर्य, सहजता, सरलता, प्रसाद, सृजनशीलता, ओज, लय या गुणांनी युक्त असतात. दासोपंतांच्या ठायी या तीनही कलांच्या सृजनशक्ती एकवटल्या होत्या. अफाट साहित्य निर्मिती करणाऱ्या दासोपंतांनी माघ वद्य षष्ठीला समाधी घेतली. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. अंबेजोगाई (जिल्हा बीड) येथे नृसिंहतीर्थावर दासोपंतांची प्रशस्त समाधी आहे.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

बाजींद कांदबरी

Leave a Comment