दातेगड वर्धापनदिन माझ्या नजरेतून भाग-२
प्रथम माफ करा खूप दिवस झाले तरी लिहू शकलो नाही. तर आत्तापर्यंत आपण आदल्या दिवशी काय झालं ते पाहिलं. आता पुढे….
दातेगड वर्धापनदिन माझ्या नजरेतून भाग- 1 वाचण्यासाठी येथे click करा
तर रात्रभरच्या चर्चेने आणि आदल्या दिवशीच्या कामाने शरीर आधीच थकलेलं होतं. २.३०वाजता झोपल्यावर सकाळी ५.४५ पासून रुपेश दादा आणि दिपक दादांचं उठा उठा सुरू झाल. माझे डोळे काय उघडत नव्हते, त्यांना म्हणलं “तुम्ही व्हा पुढं मी आलोच.”😅 पण त्यांनी माझा कावा योग्य ओळखलेला. त्यांनी मला उठवलच.
साहित्य घेउन चिखल तुडवत गडावर निघालो तेव्हा समजलं की काही मावळे फुलं घेऊन रात्री ३ला आलेत. त्या बहादरांनी मळ्यात जाऊन कार्यक्रमासाठी फुलं तोडून पावसात भिजत रात्री उशिरा आले होते. वाटत असेल ना की किती करतात हे. आहो आमचा प्रत्येक मावळा असाच आहे. मागच्या भागात ओंकार विषयी वाचलं असेलच. नसेल तर एका ” ओंकार दादांना दैवान धोका दिला त्यांना एकच हात आहे पण हाच मावळा सर्वात जास्त मोहिमांना असतो. आणि फक्त असत नाही हौश्या-गौश्यांसारखं नाही तर त्यांचा सिंहाचा वाटा असतो हो सिंहाचाच…… बरं मी पुढं सांगतो. दाट धुक्याच्या चादरेतुन वाट काढत गडावर पोहोचलो. पोहोचलो की रुपेश दादांनी हातात विळा दिला आणि पाय-यांवरील गवत काढू लागलो. तिकडे ज्याने त्याने आपल्या जबाबदा-या हातात घेतल्या. इथं आवर्जून सांगतो आपलं परीस वैभव दादा आपल्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आले होते. पण याचा विचार न करता दादांनी फुलाच्या माळा बनवायला घेतल्या. तुम्हाला वाटलं असेल असतील १-२किलो नाही हो ५०किलो होती फुलं. आणि कुठं कार्यक्रमात प्रमुख पाहुणे काम करताना बघितलंय का? आहो हे फक्त इथंच बघायला मिळतं.
सगळं काम चालू होतं पण पोटात उंदीर दुदुदुडू उड्या मारत कालवा करत होते. आणि तेवढ्यात आपल्या राजेश दादा (पर्मनंट आचारी) व अनिकेत दादा (नवनियुक्त आचारी) यांनी घमेल्यात मॅगी बनवली आणि तिच्या वर एवढा ताव मारला की घमेल सुद्धा चाटून खाल्लं. एका मिनिट साठी वाटलं त्यांच्या हाताच चुंबन घ्यावं पण भावनांना आवर घातला. आणि बॅक टू वर्क का काय म्हणत्यात ना ते केलं. आंग पार दुखत हुतं राव. सागर दादांनी मुंबईची ताजी फळी घेऊन येऊन दर्शन दिलं त्यांना म्हणलं मूव्ह आणलंय का? मूव्ह न आंघोळ करायचीय.. आणि कहर म्हणजे त्यांनी शब्दश: अर्थ घेतला.😂 भर पावसात तलवार विहीर, महादरवाजा, आणि अलीकडे वाटेवरच गवत काढून फुलांचे हार बांधून घेतले.
तोवर काहीजण पालखी सजवून गावात घेऊन गेलेले. सगळी तयारी झाली, ढोल-ताशे वाजले, माझ्या राजाची मिरवणूक दिमाखात निघू लागली. आनवाणी पायान चिखल-दगड-धोंडे तुडवत निघालो. वरून वरुणराजा जलाभिषेक घालतच होता. आणि मिरवणुकीचा दिमाखदार सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. तेव्हा आपल्या प्रेमाच्या पाखराने प्रितेश दादांनी दर्शन दिलं जे रुपेश दादांच्या २० मावळ्यांच्या फळीत होते, आणि जे आदल्या दिवशी येणार होते.
त्यांना व त्यांच्या अवलिया मित्राला सोबत घेतलं.
पालखी पोहोचतानाच दृश्य खरच पाहण्याजोग होत. मधून पालखी दोन्ही बाजूने व वरून फुलांचा वर्षाव, समोर तुताऱ्या. म्हणजे नजर लागावी असंच ते दृश्य. आणि त्यात वरुणराज जलाभिषेक घालतंच होते. गडपूजन, पालखी पूजन, गडदेवता पूजन,शिवलींग अभिषेक हेही दिमाखात झालं.
घमेल्यात बनवून खाल्लेली मॅगी एव्हाना जिरली होती. आपल्या आचाऱ्यानी मस्त पोहे आणि चहा बनवलेला त्यावर ताव मारला.
राजेमहाडीकांचे १२वे वंशज धैर्यशील राजेमहाडीक यांची ओळख करून दिली व त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्या नंतर आपलं परीस आलं, तसा सगळ्याना धक्का बसला. कारण हा माणूस सकाळ पासून इतर लोकांइतकाच झटत होता कोणी विचारसुद्धा केला नव्हता की वैभव दादा आज पाहुणे म्हणून आलेत. त्यांनी त्यांच्या शांत वाणीने सर्वांना आपल्या ज्ञानाच्या सागराच दर्शन घडवून आणलं. त्यांच्या आणि सागर दादांच्या सोबत आम्ही गडफेरी पूर्ण करून सर्व कामांबद्दल माहिती दिली, तसेच वास्तूंविषयी माहिती दिली. तोवर इकडे रुपेश दादांच्या वडिलांनी सुंदर असं जेवण बनवलं होतंच. ते खाऊन मावळे टुम झाले.
पुढच्या कार्यक्रमाच्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन सगळे कामाला लागले. विनोद दादा, प्रदीप दादा, विराज दादा, प्रशांत दादा आलेले. ते मला फोन करून कंटाळले होते. पण माझा फोन माझ्याजवळ नव्हताच. समोर येताच चौघांनी येताच शाब्दिक टोले लगावायला सुरुवात केली. त्यांची माफी मागत त्यांना आलिंगन घातलं. विराज दादा आणि विनोद दादा सकाळीच एक-एक इंजेक्शन टोचून आले होते. तरीही भर पावसात ते आले. तुम्हाला इथं फक्त निष्ठा दिसेल.
वरून पाऊस कहर करत होता तर खालून जळू रक्त पित होते. तरी हार मानतील ते मावळे कसले?
सर्वांनी एक निर्णय घेतला. उर्वरित कार्यक्रम आपण पायथ्याला करू. साहित्य उचलू लागलो. तिथं विनोद दादा (आजारी) उभे होते, त्यांनी हे बघितलं आणि नको म्हणत असतानाही एक टोप त्यांनी उचलला. पावसात भिजत दादांनी तो टोप पायथ्याला पोहोचवला. एखादा दुसरा असता तर म्हणाला असता ‘एकतर मी आजारी, त्यात पाहुणा म्हणून आलोय आणि मी हे करू का?’ पण हे इथंच होत’
पारंपारिक गोंधळ पार पडला. गारठलेल्या मावळ्यांच्यात एक नवीन उर्जा आली. बाहेर पाऊस पडत असतानाही गोंधळ्यांना घाम फुटला होता यावरून तुम्ही तिथला अंदाज लावू शकता. गोंधळ आटोपला तसा मला आतुरता होती ते दोघेजण आता बोलणार होते. आपले प्रदीप दादा आणि विनोद दादा पण वेळेची मर्यादाही होतीच. तरीही सुरुवातीला प्रदीप दादांनी अगदी कमी वेळात खूप माहिती देऊन गंगासागर तलावावरील एक पद्य म्हणून दाखवला व ते थांबले. पुढे होते विनोद दादा माझा आवडीचा विषय घेऊन ‘वीरगळ’. तस पाहायला गेलं तर खूपच मनोरंजक विषय हा पण तितकाच दुर्लक्षित. दादांनी या विषयाला योग्य तो न्याय दिला. त्यांच्या चर्चासत्रानंतर आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. पण आजच्याच हा. आजून खूप आहे पुढं पण या भागात इतकंच.
✍ प्रतिक शिवाजी मोरे
दातेगड वर्धापनदिन माझ्या नजरेतून भाग- 3 वाचण्यासाठी इथे click करा