दातेगड वर्धापनदिन माझ्या नजरेतून भाग – ३
नमस्कार! न्हाय म्हणलं उगाच नको लई वाट बघाय लावायला म्हणून लगेच लिहायला घेतल.
तर मागच्या भागात काही किस्से सांगायचे राहून गेले ते सांगतो आणि मग पुढचं सांगतो. आपला गण्यादा नाव वाचूनच बऱ्याच जणांना हसायला आलं आसल, आहो आमच गण्यादा हाईच लई फेमस. तर दादांना पाठवलं खाली रुईची पानं आणायला. दादा गेले खरे पण तीन तास गडावर आलेच नाहीत. मस्त लव्ह दादांच्या घरी गेले. आजींनी भाकऱ्या करायला घेतल्या होत्या, बहाद्दराने ताटली घेतली, कालवण घेतलं आजींनी गरम भाकरी टाकली ताटात. मस्त ताव मारून दादा टूम. त्यावर मुंबईवरून जे मावळे आणि ताई आलेल्या त्यांनी खायला पावभाजी आणलेली त्यातील पावभाजी आणि ७ पावांवर एक हात मारून, चहा पिऊन, अंघोळ करून जे निवांत पडले ते पालखी सोबतच गडावर आले.
आपले रूपेश दादा यांचा एक किस्सा सांगतो मग आपण पुढे जाऊ. तर मी आणि रुपेश दादा गवत काढत होतो हे तर माहितीये तुम्हाला. गवत काढून झाल्यावर ते टाकायला काही सापडलं नाही तर दादांनी स्वतःचा टीशर्ट काढला आणि त्यावरून गवत वरती नेलं. निष्ठा हो बाकी काही नाही म्हणत याला. त्यांना खरंच सलाम या पामराचा.
तर मागच्या भागात कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत काय काय झालेलं ते बघितलं. तर कार्यक्रम झाल्यावर मी आणलेला बॅनर आणि ब्लॅंकेट वर जिथं थांबलेले सगळे तिथं देऊन खाली गेलो. आणि देवळात मी, सागर, पिंक्या, प्रितेश दादा आणि त्यांचा अवलिया मित्र पडलो. तेव्हा सागर दादा आणि रुपेश दादा आले हे कदाचित रात्री ११.३०ची गोष्ट असावी. बहूदा आएशा ताई साताऱ्यात आलेल्या त्यांच्यासाठी ते आलेले. पण काही कारणाने त्यांना राजधानीतच थांबायला सांगितलं तोवर १.३० वाजलेले. झोपायला जागा कमी पडत होती. तेवढ्यात रुपेश दादांना जळू दिसला. रक्त पिऊन चांगलाच माजलेला की हो…. पण पिलय कोणाचं हेच कळत नव्हतं. जो तो म्हणतोय मला नाय लागला-मला नाय लागला रक्त तर सांडलेले दिसत होतं. जो तो पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वतःला चापचू लागला. तेव्हा मला प्रितेश दादांच्या मित्राच्या पायाला जखम दिसली, पण ते म्हणे मला लागलाच नाय. सगळं चेक केलं आणि जागा कमी होती म्हणून सागर दादा मला घेऊन पुन्हा वर गेले.
त्या हॉटेल मध्ये पोचलो. हॉटेल म्हणजे बांधकाम चालू असलेलं बरका. तिथं पोहोचलो माझा बॅनर पॅक, अंगावरच घेऊन दिपक दादा आणि अतुल दादा झोपलेत. एका एकाला थोडं थोडं बाजुला सारून अभिजित दादांच्या अंथरुणात शिरलो. संपूर्ण रात्र दोघांनाही एका कुशीवर काढावी लागली. कुशी बदलायची असली तरी दोघांना एकदम बदलावी लागत होती. म्हणजे विचार करा किती जागा असेल आणि काय हाल झाले असतील दोघांचे. त्यात आपला भाऊ वरुणराज थांबायचं नावच घेत नव्हता. तो एक कसलं वैर काढत होता कुणास ठाउक.
डोळा लागतंच होता तोवर ६ वाजले सकाळचे. आणि रुपेश दादांच मोबाईलवर पोवाडा लावून उठा उठा सुरू झालं. हा माणूस यांच्यातला उत्साह बघुन कोण म्हणणारच नाही की याचं लग्न झालंय. तर यांनी सगळ्यांना उठवलं आणि चहा न्याहरीचं नियोजन करू लागले सगळे. प्रश्न होता पाण्याचा. पाणीच नव्हतं हो तिथं काय करायचं आता? “आहो पण जुगाड पे दुनिया कायम है!” लावले ओळचणीला टोप भरलं पाणी आणि हा ही अनुभव घेतला. ओळचणीच्या पाण्याचा चहा आणि पोहे. आत्ता वाचणाऱ्या बऱ्याच जणांनी ई…..शी…. चा सुर ओढलाही असेल पण तेव्हा सगळ्यांनी ताव मारला त्यावर. आणि खरंच भारी झालेले बरं चहा आणि पोहे दोन्ही. आणि तेवढ्यात आगमन झाले सर्वांचे लाडके प्रेमाचं पाखरू प्रितेश दादा पिण्याच्या पाण्याच्या ४ कळश्या घेऊन तेपण सगळं न्याहरीचं झाल्यावर.
सगळे ह. भ. प. ढाणे महाराजांच्या कडाडणाऱ्या तोफेची वाट बघत होते. तोवर आपला गण्यादा पाहुणे सोडायला गेलेला😂 आणि वेगळेच पाहुणे घेऊन आला. त्यांच्या हाताला जळू लागलेला. कस कस रक्त थांबवलं ते गण्यादालाच विचारा.
तोवर तोफ आली आणि कडाडली. सर्वांच्या अंगावर शहारे आले. पावसालाही कदाचित या तोफेचा आवाज ऐकून रडू आलं आणि त्यानं जोर धरला. महाराजांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सगळ्या सामानाची जुळवा जुळव करून खाली गाडीकडं निघालो. पावसाने जोर धरलेलाच. चप्पल घालून कोणी चालूच शकतं नव्हतं. अनवाणी पायाने जो तो सामान घेऊन उतरू लागला. सामान पोहोचलं आणि आपले सूर्यदेव सामान पोहोचलं का चेक करायला आले. सगळं सामान भरून आम्ही पुढं गेलो. आणि आपलं गण्यादा माग थांबलं. म्हणजे सगळ्यात आधी आलेला व्यक्ती आणी सगळ्यात शेवटी गेलेला व्यक्ती म्हणजे आपला गण्यादा.खाली जाऊन सुद्धा गण्यादान लव्हदादांच्या घरी जेवण केलंच.आणि याच गण्यादामूळ गाडी घरी जाण्यासाठी १ तास उभी होती.
गाडीतून सगळे हसत खेळत चालले होते. कुणाला पर्वा नव्हती की माझे पाय फाटलेत, की मला जळू लागलाय, की माझं अंग दुखतंय, की मी उपाशी आहे, की माझी झोप झाली नाही. जो तो आपआपल्या अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन खुशीत निघाला होता. प्रत्येकाच्या मनात आनंद होता तो कार्यक्रम पार पडल्याचा. आनंद, फक्त आनंद. मीही निघालो बऱ्याच अनुभवांची शिदोरी घेऊन. बरीच नवीन माणसं घेऊन निघालो. खूप काही शिकून निघालो. सह्याद्री शिकवतो हे अनुभवून निघालो. निघालो सगळ्या आठवणी उराशी घेऊन. निघालो त्या दातेगडाचे आभार मानून, त्या माऊलीचे आभार मानून. निघालो……
समाप्त
✍ प्रतिक शिवाजी मोरे