महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,564

किल्ले दातेगड ( सुंदरगड )

By Discover Maharashtra Views: 5345 6 Min Read

किल्ले दातेगड ( सुंदरगड )

पंधराव्या शतकात किल्ले दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करुन हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. १५७२ मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती.अफ़जलखानाच्या वधानंतर छ. शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर किल्ले दातेगड मुघलांकडे गेला.

इसवीसन १६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील ३४ गावे इनाम दिली होती. इसवीसन १७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विषेश सांगन्याची बाब ज्यानी तिन्ही छत्रपतीचा काळ पाहीलेले रामचंद्र आमात्य बावडेकर याचे यागड़ावर तीन महिने वास्तव्य होते.

गडाची मुख्य चढण फारशी नाही. हा चढ चढायला साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. गड उत्तर दक्षिण पसरलेला असून गडाला पंधरा ते वीस मीटर उंचीचा नैसर्गिक कडा लाभलेला आहे. उत्तर व पश्चिमेच्या बाजूकडे गडावर जाण्यासाठी दरवाजे आहेत. पण उत्त्तरेकडील दरवाजाची पडझड झाली असून पश्चिम दरवाजा नामशेष झाला आहे. मात्र येथे काही पायऱ्या व खडक कोरून तयार केलेला बुरुज पहावयास मिळतो. उत्त्तरेकडील दरवाजाजवळ पहारेकर्यांच्या खोल्या, गडाचे वैभव असणारी
६ फूट उंचीची गणपतीची व
८ फूट उंचीची हनुमानाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती, पाण्याची टाकी,धान्यचे कोठार,सैन्यासाठी देवड्या, गडावर जाणाऱ्या पायऱ्या ,गडाच्या उत्तर टोकावरची तटबंदी मात्र आज ही चांगल्या अवस्थेत आहे इ.अवशेष आहेत. १९६७ च्या कोयनेच्या प्रलयकारी भूकंपात दातेगड़च्या अनेक वास्तुचे नुकसान झाले.विशेष म्हणजे हे सर्व अवशेष काळाकभिन्न काताळात खोदलेले आहेत.

गणपती व हनुमानाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती अतिशय सुंदर, सुरेख व रेखीव आहे.गणपतीचे कान जास्वंदीच्या फुलासारखे नक्षीदार आहेत. हनुमानाच्या मूर्तिसारखीच एक मूर्ती किल्ले विसापूर वर सुद्धा पहावयास मिळते.
हे अवशेष पाहून पायऱ्या चढल्या कीआपला गडावर प्रवेश होतो.तेथून डावीकडे या गडाचे वैशिष्ट्य असणारी तलवारीच्या आकाराची काळाकभिन्न खडकात खोदलेली विहीर दिसते. ही विहीर पंचविस ते तीस मीटर लांब, तितकीच खोल व साधारण आठ ते दहा फुट रुंद आहे. या विहिरीला “गेरूची विहीर” असेही म्हणतात. विहिरीमध्ये आत जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. या पायऱ्या चेही एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे यातील डावीकडील पायऱ्या उंचीने जास्त असून उजवीकडील पायऱ्या उंचीने कमी आहेत.

खाली उतरुन गेल्यावर डाव्या बाजूस एक छोटीशी गुहा दिसते. गुहेची लांबी साधारण दहा फुट, रुंदी सात फुट व ऊंची सहा फुट इतकी आहे. गुहेबाहेर एक नंदी असून गुहेत शिवलिंग आहे. येथे उजेड कमी असल्याने प्रकाशासाठी बॅटरीचा वापर करावा लागतो. या गुहेपासून खाली काही अंतरावर पाणी असून ते थेट जवळील कोयना नदीतून येते, अशी समजूत आहे. अशाच प्रकारची एक विहीर वाई जवळील किल्ले कमळगडवरही पहावयास दिसते.या विहिरीला ‘कावेची विहिर’ म्हणतात.विहीर पाहून वर आलो की विहिरीच्या डावीकडे खडकामध्ये खोदलेले घरांचे अवशेष दृष्टीस पडतात. गडावर इतरत्र ही तुरळक अवशेष व काही ठिकाणी तटबंदी दिसते. या तटबंदीमध्ये काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असे शिवकालीन शौचकूप दिसतात.

छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील नावाप्रमाणेच सुंदर परंतु दुर्लक्षित किल्ला म्हणजे घेरा दातेगड उर्फ सुंदरगड हा होय. मध्ययुगामध्ये चिपळून – पाटण – कराड – विजापुर – विजयनगर हा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता. या मार्गावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्या लगत अनेक लहान मोठे किल्ले बांधले गेले. जंगली जयगड, गुणवंत गड, घेरा दातेगड, वसंतगड व सदाशिवगड इ. किल्ल्यांचा त्यात समावेश होतो. या सर्व किल्ल्यांमध्ये आपल्या अंगाखांद्यावर असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण व कलात्मक अवशेषांसाठी मनात कायमचा घर करून राहणारा व एक अविस्मरणीय अनुभव देणारा किल्ला म्हणजे दातेगड.

सर्वांगसुंदर अशा दातेगड चा इतिहास मात्र अपरिचित आहे. गडावरील अवशेषावरुन हा किल्ला पुरातन असावा. तसेच कमळगड व विसापूरगडाच्या निर्मात्यांनी याही किल्ल्याची निर्मिती केली असावी.
आदिलशाह तसेच मुघलांच्या ताब्यात काही काळ हा किल्ला होता. शिवकाळात या किल्ल्यावर कचेरी व कायम शिबंदी होती. शिबंदीच्या खर्चासाठी गडाजवळील गावातील जमीन नेमून देण्यात आली होती. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रैंट याने हा किल्ला न लढताच ताब्यात घेतला.
गडापासून ८ ते १० कि. मी. अंतरावर धारेश्वर येथे काही लेण्या आहेत. येथे निळकंठ शिवाचार्य ब्रम्हस्वामी धारेश्वर महाराज यांचे वास्तव्य आहे. या लेण्यांमध्ये राम, लक्ष्मण, विरभद्र, आदिश्वर बाबा, केदारेश्वर, महादेव, पाच पांडव इ. देवतांची स्थापणा करण्यात आली आहे.

असा हा घेरा दातेगड उर्फ सुंदरगड हा किल्ला छोटासाच परंतू अतिशय देखना असून शिवप्रेमी – गडप्रेमींकडून दुर्लक्षित राहिला आहे. गड व गडपरिसारातील निसर्ग आवर्जून पाहण्यासारखा आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये हा परिसर अतिशय सुंदर दिसतो. या काळात पश्चिमेकडून वाहणारे जोरदार वारे एक वेगळाच अनुभव देऊन जातात. मात्र तो अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष गडाचा फेरफटका मारण्याशिवाय गत्यंतर नाही…. ! टीम दातेगडच्या माध्यमातुन गड सवर्धनाचा दोन वर्षापासुन सातत्याने गडसवर्धन काम चालु आहे.टीमने अनेक ज़मीनीखाली गाडलेल्या वास्तु प्रकाशात आनल्या आहेंत.
आजवर अनेक गडकोट पाहिले,मात्र गडकोट पाहताना असे लक्षात आले की या गडकोटांवर असलेले वाडे,इमारती,बुरूज,तटबंद्या जाणीवपूर्वक पाडलेल्या असाव्यात.कारण हे मरहट्टे याच गडकोटांचा आधार घेऊन संघटित होतील व पुन्हा गनिमाला धूळ चारतील अशी भिती शत्रूला नक्कीच वाटली असेल.

फोटो:- नेट साभार
लेख – वैभव साळुंखे पाटील

1 Comment