महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,19,416

दातीवरे बुरुज

By Discover Maharashtra Views: 3610 3 Min Read

दातीवरे बुरुज

दातिवरे कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून दातिवरे येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत.दातिवरे कोट सफाळे रेल्वे स्थानकापासून १६ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून ३५ कि.मी.वर आहे. दातिवरे गावात २ कोट असल्याने स्थानिक लोक या कोटाविषयी सांगताना जागेची गल्लत करतात.दुसरा कोट म्हणजे हिराडोंगरी दुर्ग जो गावाबाहेर टेकडी स्वरुपात आहे आणि दातिवरे कोट गावामध्येच भर वस्तीत आहे.कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त काही माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे.

स्थानिक लोक दातिवरे कोटास माडी किंवा माडीचा बुरुज म्हणुन ओळखतात. दातिवरे किल्ला म्हणजे एका बुरुजाची शिल्लक राहिलेली एक अर्धगोलाकार भिंत. हा किल्ला म्हणजे पोर्तुगीजांनी बांधलेला एक बुरूज असावा.उपलब्ध अवशेषस्वरूप भिंतीवरून याची उंची १५ ते २० फुट असावी.या बुरुजाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना, शंखशिंपले, भाताचा तूस यांचा वापर केला गेला आहे. डॉ. श्रीदत्त राउत यांच्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी या बुरूजासमोर दुसरा भागही होता जो काळाच्या ओघात आता पूर्णपणे नष्ट झाला आहे.या अर्धगोलाकार भिंतीला लागून स्थानिकांची घरे वसली आहेत.दातिवरे कोट समुद्रकिनारी असुन अर्नाळा बेटाच्या समोर आहे.येथून अर्नाळा किल्ला पूर्णपणे द्रुष्टीपथात येतो.

चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत १७३९ साली दातिवरे कोट मराठ्याकडे आला. चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत अर्नाळा किल्ला जिंकताना या कोटाने महत्वाची भूमिका निभावली.वसई मोहिमेचे तपशील वाचताना मराठयांचे सैन्य अर्नाळा दातिवरे मार्गाने दातिवरे बंदरात व परिसरात उतरल्याचे उल्लेख आढळतात.याच्या एकंदरीत रचनेवरून हा लढवय्या बुरुज असावा व याचा उपयोग लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने गलबते व जहाजांना अटकाव करण्यासाठी केला जात असावा.

महिकावतीच्या बखरीत उत्तर कोकणातील दातिवरे परिसराचा उल्लेख दात्तामित्रीय या नावाने येतो.कोटाच्या नावाविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावाने ओळखले जाते. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात.किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीझांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या ठिकाणास अवश्य भेट द्यावी.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment