पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण दत्त मंदिरे –
श्रीगुरुदत्तांची पुण्यात मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत. औदुंबराच्या झाडाखाली स्थापन केलेल्या पादुकांपासून ते दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासारख्या मोठ्या देवस्थानांपर्यंत, दत्तात्रेय सगळीकडे मोठ्या भक्तिभावाने पूजले जातात. त्रिमुखी, सहा हातांची, भोवती गोमाता आणि श्वान असलेली दत्ताची मूर्ती साधारणपणे बघायला मिळते, मात्र याव्यतिरिक्त काही खास दत्तमंदिरे पुण्यात आहेत. पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण दत्त मंदिरे त्यांचाच हा थोडक्यात परिचय.
०१) नरपतगीर दत्त मंदिर – केईएम हॉस्पिटल जवळ, नरपतगीर चौक, मंगळवार पेठ.
या मंदिरात, आई अनसूया आणि वडील अत्री ऋषी यांच्याबरोबर दत्तगुरू विराजमान झाले आहेत. या तिन्ही मूर्ती काळ्या पाषाणात घडविलेल्या असून त्यांना अंगचीच प्रभावळ आहे. दत्ताची अशी बैठी मूर्ती दुर्मीळच.
०२) श्रीपाद श्रीवल्लभ – मारुती नवग्रह मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ.
सुप्रसिद्ध हत्ती गणपती मंदिरामागे दडलेल्या मारुती मंदिरात आणि संगमरवरी देवघरात श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातील दत्त मूर्ती आहे. श्रीवल्लभ इथे हाताची घडी घालून मांडी घालून बसले आहेत. मागे गाय आणि श्वान यांच्या प्रतिमा आहेत. श्रीवल्लभ अवतारात असलेले असे पुण्यातील हे एकमेव मंदिर असावे.
०३) एकमुखी दत्त मंदिर – त्रिमूर्ती चौक, आंबेगाव पठार, कात्रज.
ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांचे एकत्रित स्वरूप म्हणजे त्रिमुखी दत्तात्रेय. परंतु काही ठिकाणी एकमुखी दत्ताच्या मूर्ती बघायला मिळतात. सन २०१० साली उभारलेल्या या मंदिरात एकमुखी आणि सहा हाताची मूर्ती स्थापन केली आहे.
०४) काळा दत्त मंदिर, जिजामाता उद्यान शेजारी, कसबा पेठ.
साधारणपणे दत्ताची मूर्ती म्हणलं की शुभ्र पांढऱ्या दगडात घडविलेले दत्तात्रेय समोर उभे राहतात. परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात, काळ्या दगडात घडविलेली दत्ताची सुबक मूर्ती बघायला मिळते. या त्रिमुखी, सहा हातांच्या मूर्तीला सोनेरी प्रभावळ लाभली आहे. हे मंदिर श्री. घोटणकर यांच्या मालकीचे आहे.
०५) दाढीवाला दत्त मंदिर – हुजूरपागा शाळेसमोर, कुंटे चौक, नारायण पेठ.
पुण्यातील चमत्कारिक नावांमध्ये दाढीवाला दत्ताची गणना नक्कीच होते. सन १९११ मध्ये श्री. घाणेकर यांनी दत्ताची स्थापना केली. या सुंदर, संगमरवरी दत्त मूर्तीला, तेवढीच सुंदर प्रभावळ आणि देव्हारा लाभला आहे. मंदिराचे संस्थापक श्री. घाणेकर यांच्या वाढलेल्या दाढीमुळे दत्तालाच ‘दाढीवाला दत्त’ असे संबोधण्यात येऊ लागले.
©साकेत नितीन देव.