महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,306

दौलतमंगळ किल्ला | Daulatmangal Fort

Views: 4028
9 Min Read

दौलतमंगळ किल्ला | Daulatmangal Fort

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यात माळशिरस गावात शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे शिवमंदिर प्रसिध्द आहे पण हे शिवमंदीर ज्या दौलतमंगळ किल्ल्यामधे आहे तो किल्ला मात्र आज विस्मरणात गेला आहे. भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यात आहे याची मंदिर पाहुन आल्यावरही अनेकांना कल्पना नसते. शिवपूर्वकालात फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ(Daulatmangal Fort) या गढीकोटांचा उल्लेख येतो. पुणे शहराच्या दक्षिणेकडे सह्याद्रीच्या उपरांगेत पूर्व पश्चिम पसरलेल्या भुलेश्वर डोंगररांगेत यवतजवळ दौलतमंगळ किल्ला आहे.

दौलतमंगळ किल्ला पुण्याहून दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे ६१ कि.मी.अंतरावर असुन पुणे-सोलापूर महामार्गाने यवतमार्गे ५६ कि.मी. अंतरावर आहे. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर ८ कि.मी.अंतरावर आहे. दौलतमंगळ किल्ल्याची काही तटबंदी फोडुन भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता आलेला आहे. गाडीमार्गाने मंदिराकडे जाताना वाटेत किल्ल्याचा दरवाजा, पायऱ्यांचा मार्ग व तटबंदी बुरुज पहायला मिळतात. भुलेश्वर मंदिर हि या किल्ल्यावरील मुख्य व अतिशय सुंदर वस्तु असली तरी आपली भटकंती दौलतमंगळ किल्ल्याची असल्याने असल्याने त्या अनुषंगाने किल्ल्याचे वर्णन प्रामुख्याने केले आहे. (भुलेश्वर मंदिराचे वर्णन मंदीरे या विभागात केलेले आहे.) खाजगी वाहनाने आल्यास आपण थेट गडाच्या माथ्यावर येत असल्याने किल्ल्याची फेरी तिथूनच सुरु होते.

भुलेश्वर मंदिर किल्ल्याच्या सर्वोच्च भागात असुन साधारण ८ फुट उंचीच्या चौथऱ्यावर बांधले आहे. या ठिकाणी किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २६८० फुट असुन पायथ्यापासून ६२० फुट आहे. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याचा परीसर साधारण ८ एकर आहे. चौथऱ्याच्या नव्याने बांधलेल्या पायऱ्या चढताना पायऱ्यां शेजारी भिंतीत ठेवलेल्या द्वारपाल जय-विजय यांच्या मुर्त्या दिसतात. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी सिंह हत्तीवर आक्रमण करीत असल्याचे शिल्प असुन वरील बाजूस एक वीर सिंहाबरोबर लढत असल्याचे शिल्प आहे. मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा टांगलेली असून त्याखाली दगडात कासव कोरले आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराचा खालील भाग काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला असुन कळसाचे बांधकाम विटांमध्ये करून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. या चुन्याच्या गिलाव्यात बारीक नक्षीकाम तसेच गणपती, विष्णू, भैरव, दुर्गा, नृसिंह आदी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. यावरून मंदिराचा जीर्णोद्धार हा अलीकडील काळात झाल्याचे दिसुन येते.

मंदिरात शिरल्यावर सर्वप्रथम आपण नगारखान्यात येतो व त्यानंतर आतील सभागृहात. मुख्य मंदिराच्या बाहेर असलेल्या या दोन्ही इमारती नंतरच्या कालखंडात बांधलेल्या आहेत. या सभागृहातुन उंच पायावर उभ्या असलेल्या मुख्य मंदिरात समोरच एक भिंत बांधलेली असुन तिथून दोन्ही बाजूला जायला पाय-या बांधल्या आहेत. पायऱ्यांनी पहिल्या मजल्यावर आल्यावर काळ्या पाषाणात कोरलेला ६ फुट उंच भला मोठा नंदी व त्याच्या बाजुला कासव पहायला मिळते. नंदी पाहुन आत आल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. मंदिराभोवती मंडपाच्या बाहेरील बाजूने रामायण व महाभारतातील प्रसंग कोरलेले असुन मंदिराच्या भिंतीवरील नक्षीकाम, विविध मुर्ती व कोरीव शिल्पे शिल्पसौंदर्याचा आविष्कार आहेत. भिंतींवर कोरलेल्या या मुर्तींची मोठया प्रमाणात जाणीवपूर्वक नासधूस केलेली आढळते. मंदिराच्या आतील भागात अंधार असुन बांधकामातील काळ्या पाषाणामुळे थंडावा जाणवतो. मंदिराबाहेर पडल्यावर डावीकडे एक चौथरा व त्यावर कोरीव खांब तसेच वरील बाजूस दगडी छप्पर असलेली वास्तू आहे.

मंदिरात असणारा नंदी आधी कदाचित या चौथऱ्यावर असावा. येथुनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराच्या मागील बाजूस चुन्याचा घाणा असुन शेजारी एक घुमट असलेली वास्तु आहे. मंदिरासमोर असलेल्या घंटेच्या बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून या पायऱ्याशेजारी दीपमाळ आहे. दीपमाळेशेजारी लांबलचक दगडी कोठार असुन या कोठाराखाली तळघर आहे तसेच समोरच्या बाजूला एक महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराकडून आपली गडफेरीला सुरवात होते. मंदिराकडील तटबंदीवरून सरळ चालत गेल्यास आपण किल्ल्याच्या पुर्व टोकाला असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या खालील बाजुस असलेल्या मेटाचे अवशेष पहाता या भागातुन किल्ल्यावर येण्यासाठी एखादा दरवाजा असावा पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. या बुरुजावरून गडपायथ्याला असलेल्या वस्तीचे अवशेष तसेच एक ढासळलेली मसजीद दिसुन येते. या बुरुजावरून गडाचे मुख्य प्रवेशद्वार व त्या शेजारी असलेली तटबंदी नजरेस पडते. गडाचे आजही मोठया प्रमाणात बांधकाम शिल्लक असुन त्याची काही प्रमाणात पडझड झाली आहे व त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

आपण आलेल्या तटबंदीच्या दुसऱ्या बाजुने मंदिराकडे निघाल्यावर आपण मंदिराखाली असलेल्या एका समाधी चौथऱ्याकडे येतो पण हि समाधी कोणाची आहे हे सांगता येत नाही. येथुन किल्ल्याच्या नव्याने बांधलेल्या पायऱ्याच्या वाटेने खाली उतरण्यास सुरवात केल्यावर डाव्या बाजूस पायऱ्या असलेली दुमजली दगडी वास्तु दिसुन येते. या वास्तुच्या अलीकडील भागात असलेल्या कपारीत एक मोठी गुहा दिसुन येते. या गुहेत काही प्रमाणात पाणी जमा झाले असुन सफाई नसल्याने कचरा जमा झाला आहे. गुहेच्या पुढील भागात किल्ल्यावर येणारी पायऱ्यांची मुळ वाट असुन या वाटेवरील तटबंदीत असलेला किल्ल्याचा दरवाजा आजही पुर्णपणे शिल्लक आहे.या दरवाजावर एक मजला असुन आतील दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. सध्या येथे एक साधु मुक्कामाला आहे. या दरवाजा शेजारील तटबंदीत एक बुरुज पहायला मिळतो. येथुन खाली काही अंतरावर गडाच्या पायऱ्यावर एक बुरुजाच्या आधाराने बांधलेला गडाचा पूर्वाभिमुख महादरवाजा आहे. दरवाजाची चौकट जरी शिल्लक असली तरी वरील कमान मात्र पुर्णपणे ढासळली आहे. दरवाजासमोर किल्ल्याच्या आतील भागात एक घडीव चौथरा असुन या चौथऱ्याच्या चार टोकाला नक्षीदार तळखडे आहेत पण या वास्तुचे नेमके प्रयोजन ध्यानात येत नाही.

महादरवाजातून खाली न जाता सरळ पुढे आल्यावर खडकात बांधलेले एक भलेमोठे आयताकृती आकाराचे खोल टाके दिसुन येते. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन या टाक्याच्या अंतर्गत खडकात खोदलेली दोन टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या टाक्याच्या भिंतीत कोनाडे बांधलेले असुन साधुमुनींची काही शिल्पे कोरलेली आहेत. या टाक्याच्या पुढील भागात एक स्वतंत्र टाके असुन या टाक्यापुढे एक दगडी ढोणी दिसुन येते. या वाटेने पुढे आल्यावर आपण गडावर येणाऱ्या डांबरी रस्त्यावर येतो. येथे वाटेच्या दुसऱ्या बाजूस किल्ल्याचे तीन बुरुज असुन दोन बुरुज गोलाकार तर बुरुज षटकोनी आहे. या षटकोनी बुरुजाच्या आतील भागात जनाबाईचे घडीव दगडांनी बांधलेले देऊळ असुन या बुरुजाच्या खालील बाजुला खडकात खोदलेले खांबटाके आहे. सध्या हे टाके कोरडे पडले आहे. टाक्याच्या वरील बाजूस काही काही भग्न झालेली शिवलिंगे ठेवलेली आहेत. येथुन वाहनतळाकडे परत फिरल्यावर वाटेत एक गोलाकार बुरुज व त्यावर जाणाऱ्या पायऱ्याखाली ढासळलेला दरवाजा दिसतो. गडाच्या आतील भागात असलेला हा बुरुज किल्ल्याच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा.

पुरातत्त्वखात्याने हे मंदिर व आसपासचा परीसर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. किल्ल्यावरून पुरंदर-वज्रगड, मल्हारगड, जेजुरी, ढवळगड इथपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. भुलेश्वर मंदीर व संपुर्ण किल्ला पहाण्यास दोन तास लागतात. दौलतमंगळ किल्ल्यावर असलेल्या भुलेश्वर या शिवमंदिरामुळे या जागेचा संबंध थेट पुराणात जोडला जातो. पुराणातील एका कथेनुसार पार्वतीने येथे नृत्य करून महादेवाला भुलविले म्हणुन या ठिकाणास भुलेश्वर हे नाव पडले व येथेच त्यांचा विवाह होउन ते कैलासपर्वतावर गेले. १२ व्या शतकात यादवांनी या ठिकाणी भुलेश्वर मंदिर मंदिराची उभारणी केली. शिवपूर्वकालात फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ या गढीकोटांचा उल्लेख येतो.

१६ व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव व त्यांच्या पुत्रांच्या हत्येनंतर शहाजीराजांनी निजामशाही सोडली व स्वतंत्र राज्य स्थापण्याच्या विचाराने वडिलोपार्जित जहागिरदारी असलेले पुणे व आजुबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. यावर आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फ़ौज घेऊन पुण्यावर पाठवले व पुणे उध्वस्त केले. मुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिराच्या टेकडीभोवती तटबंदी बुरुज बांधुन किल्ल्याची बांधणी केली व पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार तेथे हलवला. भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळे या किल्ल्याला दौलतमंगळ नाव पडले. मुरार जगदेवांची १६३५ मधे हत्या होईपर्यंत पुणे प्रांताचा कारभार दौलतमंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करुन लालमहालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगळ किल्ल्याचे महत्व कमी झाले.

पहिले बाजीराव पेशवे व शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी १७३७ मध्ये या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. ब्रह्मेंद्रस्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे आणि बाजूचा बुरूज उभारला. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद पेशवे दफ्तरात आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment