श्रीमंत दौलतराव शिंदे –
पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेले तुकोजी शिंदे हे महादजी शिंदे यांचे बंधू होते. तुकोजीरावांना आनंदराव हे पुत्र होते .आनंदरावांना दौलतराव हे पुत्र झाले. १७९४ मध्ये पुत्र नसल्याने महादजीने दौलतराव यांना दत्तक घ्यायचे ठरवले. पण दत्तकाचा समारंभ होण्यापूर्वीच महादजी शिंदे निधन पावले. त्यांच्या इच्छेप्रमाणे वयाच्या १४ व्या वर्षी दौलतरावांना शिंदेची सरदारकी मिळाली. यावेळी शिंदे हे मराठेशाहीतील सर्वात सामर्थ्यवान सरदार होते. श्रीमंत दौलतराव शिंदे अननुभवी व वयानेही लहान असल्याने शिंदे यांचा कारभार त्यांचे दिवाण बाळोबा पागनीस हे पाहत होते. खर्ड्याच्या लढाईनंतर सवाई माधवरावांनी आत्महत्या केल्याने पुण्यात विलक्षण गोंधळ उडाला .
रघुनाथरावांचे पुत्र बाजीराव दुसरे यांच्याऐवजी आपल्या मर्जीतला वारस पेशवेपदावर स्थापण्याचा नाना फडणवीसांचा प्रयत्न बाजीरावांनी बाळोबा पागनीस यांना मोठी रक्कम देण्याचे कबूल करून हाणून पाडला. बाजीराव पेशवे पदावर येताच त्यांनी नाना फडणीसांना कैद करावयाचे ठरविताच नाना महाडकडे निघून गेले. कबूल केलेली रक्कम बाजीराव देईनात म्हणून बाळोबांनी बाजीरावांना कैद करून त्यांचे बंधू चिमाजीआप्पा यांच्या नावे कारभार आपल्या हाती घेतला. बाजीरावांनी नानांशी समेट केला.नानांनी दौलतराव यांना आपल्या पक्षात ओढून त्यांच्याकरवी बाळोबांना कैद केले व बाजीरावांना पुन्हा गादीवर बसविले.नानांनी यासाठी दौलतरावांना मोठ्या रकमेचे आमिष दाखविले होतेच शिवाय बाजीरावांनाही गुप्तपणे दौलत रावांशी नाना फडणीसांपासून आपले रक्षण करावे यासाठी दोन कोटी रुपये देण्याचे कबूल केले. त्याशिवाय सर्जेराव घाटगे यांची रुपवती कन्या बायजाबाई तुम्हाला लग्न करून देऊ असे वचन दिले.
कागलच्या घाडगे घराण्यातील तुळाजीराव घाटगे हे भावांशी भांडून पुणे येथे पटवर्धनांच्या सैन्यात नोकरी करू लागले. लवकरच नाना फडणीस यांच्या जवळच्या व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश झाला. १७७८ पासून ते १७९६ पर्यंत नानांच्या सर्व राजकारणाचा व कटकारस्थानाचा अनुभव घेऊन तुळाजीराव अशा बाबतीत हुशार झाले होते.१७९६ मध्ये नाना फडणीस पुणे सोडून पळाले त्यावेळी तुळाजीराव हे दौलतराव शिंदे यांच्या पदरी दाखल झाले .सर्जेराव या त्यांच्या घराण्याच्या पदवीमुळे ते सर्जेराव घाटगे या नावाने ओळखले जात. सर्जेराव यांच्या रूपवती कन्येची त्यावेळी खूपच प्रसिद्धी झाली होती. तिच्याशी लग्न करण्याची दौलतरावांची तीव्र इच्छा होती. आढेवेढे घेऊन ,आपले महत्व वाढवून अखेर सर्जेराव यांनी बायजाबाई यांचा विवाह दौलतराव यांचेशी करून दिला. सर्जेराव यांचे आतून बाजीरावांशी संधान होते. लग्नानंतर सर्जेराव यांना दौलत रावांचे दिवाणपद मिळाले. शिंदेच्या सरदारातील महत्त्वाचा अधिकार हाती आल्याने सर्जेराव यांचे महत्व अतोनात वाढले .
नाना फडणीसांनी ठरलेली रक्कम न दिल्याने बाजीरावांच्या सांगण्यावरून नाना फडणीसांना शिंदेनी कैद करून नगरच्या किल्ल्यात डांबले .लग्नानंतर सर्जेरावांनी पेशव्यांकडे त्यांनी कबूल केलेली दोन कोटी रुपयांची रक्कम मागितली.खजिन्यात तेवढा पैसा नसल्याने बाजीरावांनी सर्जेराव यांना सरळ पुण्यातील लोकांकडून परभारे पैसे वसूल करण्याची परवानगी दिली. यानंतर सर्जेराव यांनी पुण्यात पैशाच्या वसुलीसाठी पेशव्यांचे कारभारी, सरदार व पुण्यातील सावकार ,व्यापारी यांच्याकडून पैसा काढण्यासाठी अत्यंत अत्याचार केले. पुण्यात त्याने हाहाकार माजला .महादजी शिंदेच्या पत्नीने दौलतरावांविरूद्ध त्यांनी आश्वासने न पाळल्याने दंगा चालू केला. सर्जेरावांनी महादजींच्या पत्नीनाही क्रूर वागणूक दिली .तीन वर्षे पुण्यात सर्जेराव यांचा मनमानी कारभार चालू होता.
२६ जुलै १८०९ रोजी सर्जेरावांनी दौलतरावांशी एकेरीवर येऊन भांडण केले .दौलतराव यांचे काही नोकर मारून सर्जेराव आपल्या तंबूत गेले. हा प्रकार शिंदे घराण्यातील आनंदरावांनी पाहताच त्यांनी सर्जेराव यांच्या तंबूत शिरून त्यांना ठार मारले. सर्जेराव यांचा पुण्यात अत्याचार चालू असतानाच दौलतराव शिंदे १८०१ मध्ये ग्वाल्हेरकडे गेले. यावेळी होळकरांची झालेल्या युद्धात दौलतराव पराभूत झाले. दौलतरावांनी इंग्रजांशी पाच-सहा लढाया केल्या पण अखेर त्यांना इंग्रजांशी तह करावा लागला. त्यांचा निम्मा मुलूख इंग्रजांच्या कब्जात गेला.
१८०५ मध्ये पुन्हा दौलतरावाने होळकरांची संधान बांधून इंग्रजांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी त्यांना नमवून पुन्हा नवीन तह केला .पुढे दहा-बारा वर्ष शांत राहून दौलतरावाने १८१७ मध्ये इंग्रजांविरुद्ध अखेरचा लढा दिला . मात्र यावेळीही वरचढ ठरलेल्या इंग्रजांनी त्यांना आपले मांडलिक बनवले. यानंतर नऊ वर्षांनी १८२७ मध्ये दौलतराव निपुत्रिक मरण पावले .नंतर त्यांच्या पत्नी बाईजाबाई यांनी शिंदे घराण्यातील पुत्र दत्तक घेऊन त्याच्या नावे पुढील सहा वर्षे जहागिरीचा कारभार व्यवस्थितपणे केला .संस्थानातील बंड मोडण्यासाठी प्रसंगी बायजाबाई यांनी स्वतः घोड्यावर स्वार होऊन सैन्याचे नेतृत्व केले .त्यांच्या सौंदर्याबरोबरच त्यांच्या राजकारण कुशलतेचेही इंग्रजासह सर्व समकालीनांनी गौरवपूर्ण शब्दात कौतुक केले .बायजाबाई २७ जुन १८६३ रोजी मरण पावल्या.
मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोठे आहे. या घराण्यातील कर्तृत्ववान पुरुष यामुळे विशेषतः राणोजी – महादजी यांच्यामुळे पानिपतचे अपयश धुवून निघाले आणि उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले .पेशव्यांनी या घराण्यास दौलतीचे आधारस्तंभ म्हणून गौरविले होते.
बाईजाबाई यांनी आपले वडील सर्जेराव घाटगे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ त्यांची छत्री पुष्कर या प्रसिद्ध व पवित्र ठिकाणी बांधली.तर दौलतराव शिंदे यांची समाधी गाॅल्हेर येथे बांधली.
संदर्भ :
मराठी रियासत.
मराठ्यांची धारातिर्थे, प्रवीण भोसले.
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे.