महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,691

छत्रपती शिवरायांचे निधन कि विषप्रयोग ?

By Discover Maharashtra Views: 6416 15 Min Read

छत्रपती शिवरायांचे निधन कि विषप्रयोग ?

छत्रपती शिवरायांचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड येथे रौद्र संवत्सर शके १६०२ , चैत्र शुद्ध पोर्णिमा , शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी झाले. शिवरायांचे निधन नैसर्गिक की विषप्रयोग याविषयी काही संभ्रम जनमानसात आढळून येतो . शिवाजी महाराजांचा मृत्यू आजारपणाने झाला असे सांगणारे संदर्भ आपणास इतिहासात आढळून येतात तसेच शिवाजी महाराजांवर सोयराबाई यांनी विषप्रयोग केला असे सांगणारे संदर्भ देखील आपणास आढळून येतात. काही इतिहासकारांच्या मते ब्राम्हण मंत्र्यांनी विषप्रयोग केला . प्रथम आपण शिवाजी महाराज यांचे निधन नैसर्गिकरीत्या झाले सांगणाऱ्या साधनातील तसेच विषप्रयोग झाले सांगणाऱ्या साधनातील उल्लेख आपण पाहू. तसेच या साधनांचा लेखनकाळ व त्यातील वर्णनावरून येणारे निष्कर्ष देखील अभ्यासू.छत्रपती शिवरायांचे निधन कि विषप्रयोग ?

सभासद बखर लेखनकाळ १६९५ सभासद लिहितो “ मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची जाहली. राजा पुण्यश्लोक . कालज्ञान जाणे. विचार पाहता आयुष्याची मर्यादा जाली. असे कळून कारकून व हुजरे लोक होते. त्यामध्ये सभ्य , भले लोक बोलावून आणिले. सभासदाने कारकून व हुजरे लोक अशी उपस्तीथ चौदा जणांच्या नावाची यादी दिली आहे. त्याउपरी राजे बोलिले कि “ तुम्ही चुकुर होऊ नका . हा तो मृत्यूलोकच आहे. या मागे किती उत्पन्न जाले , तितके गेले . आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे . आता अवघे बाहेर बसा. आपण श्रींचे स्मरण करतो. “ म्हणोन अवघियांसी बाहेर बसविले. आणि राजीयानी श्री भागीरथीचे उदक आणून स्नान केले. भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले. आणि योगाभ्यास करून आत्मा ब्रम्हांडास नेऊन , दशद्वारे फोडून प्राणप्रयाण केले.

निष्कर्ष :- सर्वात विश्वसनीय मानली जाणारी छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात लिहिली गेलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १५ वर्षांनी लिहिली गेलेली समकालीन सभासद बखर शिवाजी महाराज यांचे निधन आजाराने झाले असे नमूद करते .

शेडगावकर भोसले बखर लेखनकाळ १८५४ : शके १६०२ रौद्र्नाम संवत्सरे फसली सं १०९० राज शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते .तेथेच महाराज छत्रपती यांचे शरीरास व्यथा ज्वराची जाहली त्या समयी महाराज पुण्यश्लोकी व त्रिकाळज्ञानी सर्व जाणती यांनी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे मंडळी यास बोलावून आणिले . बखरकाराने उपस्तीथ बावीस जणांच्या नावाची यादी दिली आहे. भागीथिंचे उदक आणोन स्नान केले. भस्म धारन करोन रुद्राक्षमाळा धारण केल्या आणि योगे अभ्यास करून आत्मा ब्रम्हंडास नेवून दश इंद्रिये यकाग्रयी करून शुभ्र चक्षु प्राण आक्रमण करोन प्रयाण केले. शेम मजकूर चैत्र शुद्ध १५ या रोजी सिवाजी महाराज छत्रपती कैलासवासी शांत जाहाले.

निष्कर्ष :- सदर उत्तरकालीन बखर देखील सभासद बखरीप्रमाणे वर्णन करते.

९१ कलमी बखर भारतवर्ष प्रत लेखनकाळ १७०६ बखरीत येणारे वर्णन “ राजेस्वामीस नवज्वर प्राप्त जाहला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सर चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा राजेस्वामी कैलासवासी झाले .

९१ कलमी बखर राजवाडे प्रत लेखनकाळ १७०६ बखरीत येणारे वर्णन “ त्याउपर राजेस्वामीस व्यथा नवज्वर जाला. शके १६०२ रौद्र नाम संवत्सर चैत्री पौर्णिमा दो प्रहरा राजे स्वामी कैलासवास जाला .अंतकाळी बहुत धर्म केला. सहस्त्र रुद्राक्ष परिधान भागीरथी उदके स्नान विभूती चर्चन केले. सावधपणे शिवस्मरणे करून देह ठेविला .“

९१ कलमी बखर साने प्रत ( मराठा साम्राज्याची छोटी बखर , लेखनकाळ १८१७ ) बखरीत येणारे वर्णन “ नंतर शिवाजी महाराज यांच्या शरीरी रोगाची भावना होऊन परत्र झाले. राजश्री कान्होजी भांडवलकर हवालदारास व सरकारकून यांनी श्री महादेवाच्या देवळापुढे अग्नी दिला .

९१ कलमी बखर फॉरेस्ट प्रत ( रायरी बखर लेखनकाळ १७७० ) बखरीत येणारे वर्णन “ Shivaji was soon afterwards seized with a violent fever , which carried him off on the ninth day. His death happened in the year 1602 of the shalivahan era ( A. D. 1680. )

९१ कलमी बखर जदुनाथ सरकार प्रत ( तारीखे शिवाजी लेखनकाळ १७८० ) बखरीत येणारे वर्णन “ यावेळी कोणीतरी सोयराबाई यांना सांगितले “ शिवाजी महाराजांनी संभाजीला पन्हाळगडावर बोलावले असून त्याला आपले राज्य व संपत्ती देण्याची त्यांची इच्छा आहे. याविषयी वारंवार चर्चा झाली असून त्यावर निर्णय घेतला आहे. चंचलविधीने बदल घडवण्याची योजना आखली आणि महाराजांचे आयुष्य संपुष्टात येत होते. म्हणूनच बातमी ऐकून राणीचे मन बदलले व तिने एक कृत्य ( विषबाधा ) केले. ज्याने शिवाजी महाराजांना जीव गमवावा लागला.

निष्कर्ष :- ९१ कलमी बखरीतील “ तारीखे शिवाजी “ लेखनकाळ १७८० उत्तरकालीन फारसी भाषेतील बखर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जवळजवळ १०० वर्षांनी लिहिली गेलेली आहे. सदर बखर सोयराबाई यांनी शिवाजी महाराजांना विषप्रयोग केला असे सूचित करते परंतु ९१ कलमी बखरीमधील भारतवर्ष , राजवाडे ,साने , फॉरेस्ट या चार बखरींच्या प्रती या विधानास पुष्टी देत नाहीत .(छत्रपती शिवरायांचे निधन)

सप्तप्रकरणात्मक चरित्र ( चिटणीस बखर ) :- शके १५९६ पासून राज्याभिषेक जालियावरी शके १६०२ पर्यंत याप्रमाणे चरित्र करून असता काही दिवशी ज्वराची व्यथा जाहली . या उपरी आपली अवधी पांच सात दिवस इतकी राहिली म्हणोन सर्व मातबर सरकारकून व सरदार आदी करून जमा जमा करविले . यानंतर महाराजांनी आज्ञा केली की हा मृत्यु लोक ! मोठे मोठे अवतारादिक गेले.! होणारे अवश्यमेव उत्तरकाल तसे होताच असते. ! तुम्ही सर्व प्रराक्रमी आहात कळेल तसे प्रयत्न करून राज्य व धर्म रक्षावा . एक विचारे सार्वानीही चालावे म्हणून सांगून सर्वांचे समाधान केले. आणि बाहेर जवळ बसावे . अशी सर्वांस आज्ञा केली. आणि आपण श्रीगंगोदक आणून स्नान केले. प्रायश्चित्त विधियुक्त करून भस्मधारण रुद्राक्ष-तुलसिमाला धारण केले. आणि दर्भासनी बैसले. शत गोप्रदाने प्रत्यक्ष करून सहस्त्रगोप्रदाने द्रव्याद्वारा संकल्प केला. आणि श्रीदेवाजीचे नामस्मरण अविस्मरणे करून भगवद्गीता व सहस्त्रनामे यांचे पाठ करविले. ब्राम्हणांचे घोष ऐसे होत असता , शके १६० रौद्रनाम संवत्सरे , चैत्र शुद्ध पोर्णिमा , रविवार उत्तरायण ,दोन प्रहरी देहत्याग करून अवतार समाप्त “ श्रीराम “ ! ऐसे म्हणून केला.

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र ( चिटणीस बखर ) :- संभाजीराजांनी राजारामसाहेबास नजर बंद केले सोयराबाई साहेब याजपासी जाऊन बाईसाहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारले. “ तुम्ही राजलोभास्तव महाराजास विषप्रयोग करून मारिले असा आरोप शब्द लावून कोनाडा भिंतीस करून त्यात सोयराबाईसाहेबांस चीणोन दुध मात्र घालीत जावे सांगून “ आता पुत्रास घेऊन राज्य करावे “ असे बोलिले . त्यानंतर तीन दिवस तशीच होती . तिसरे दिवशी प्राण गेला कळल्यावर दहन केले.

निष्कर्ष :- चिटणीस बखरीचा लेखनकर्ता मल्हारराव चिटणीस शिवाजी महाराजांच्या चरित्रात शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक रित्या आजाराने झाला असे सांगतो परंतु संभाजी महाराजांच्या चरित्रात शिवाजी महाराजांचा मृत्यू सोयराबाई यांनी विष देवून घडवून आणला असा आरोप संभाजी महाराजांनी केला असे सांगतो . सोयराबाई यांना संभाजी महाराजांनी भिंतीत चिणून मारलेले नाही कारण सोयराबाई ह्या शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर किमान दीड वर्ष हयात होत्या ऑक्टोबर १६८१ मध्ये सोयराबाई मृत्यू पावल्या.

उत्तरकालीन चिटणीस बखर लेखनकाळ १८१०. बखर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जवळजवळ १३० वर्षांनी लिहिली गेलेली बखरीतील परस्पर विरोधी विधाने व सोयराबाई यांना संभाजी महाराजांनी चिणून मारले अशी रचलेली भाकड कथा या आधारे हि बखर विश्वसनीय नाही.

शिवदिग्विजय बखर ( लेखनकाळ १८१८ ) बखरीत येणारे वर्णन “ :- अशी ऐश्वर्यलक्ष्मी विराजमान , त्याठाई बाईसाहेबांचे बुद्धीस अविचार बुद्धी उत्पन्न जाहली आणि विषप्रलये करून महाराजास व्यथीत केले. महाराजास जहराचे झेंडू येऊन , एकाएकी घाबरे व्हावे , हातपाय टाकावे , बोलणे चालणे राहिले ! डोळे फिरवावे असे जाल्यामुळे वैद्य चिकित्सक बोलाविले . त्यास दाखविले. ते जवळ राहिले. अंतर्माळा शोषील्या . नाडी सुटल्या , जहरी विष कशात घातले ,केव्हा सेविले ? निद्रस्थानात उपद्रव जाला. बाईस विचारता त्याजला कर्तव्य , त्या सांगतात अशी गोष्ट कशी घडते ? तेंव्हा बाईंचे म्हणणे “ बाहेरून आले , पलंगावरी येऊन निजले , मी जवळ बसले. मला जीवात कसेसे वाटते , मला बोलवत नाही ,घाबरे होऊ लागले. माझे मनात ( आले ) जेवण जेवून आले ,यास विडा घेत्ल्यावारी लागतो हि सवई मागेपासोन आहे म्हणून गुळ चांगला आणून देऊ लागले, घेतला नाही . पाणी घेतले नाही . तेंव्हा फार हैराण होऊ लागले म्हणून तुम्हा सर्वास बोलावयास सांगितले.

निष्कर्ष :- उत्तरकालीन शिवदिग्विजय बखर लेखनकाळ १८१८. बखर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जवळजवळ १३८ वर्षांनी लिहिली गेलेली. जदुनाथ सरकार म्हणतात “ हि बखर कादंबरीमय अवांतर गप्पा असलेली आहे.” बखरकाराने या बखरीत विषप्रयोगाचा उल्लेख प्रदीर्घ आणि तपशीलवार अतिरंजीत असा कादंबरीच्या थाटात केलेला आहे. ( बकरकाराने केलेले संपूर्ण वर्णन लेखात देणे शक्य नाही )

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २२५३ :- २८ एप्रिल १६८० मुंबईतील इंग्रज सुरतेतील इंग्रज अधिकाऱ्यास पत्र लिहितात “ शिवाजी राजा मेला अशी खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली आहे . १२ दिवस आजारी पडून रक्तातीसाराने तो मेला असे म्हणतात . त्याला मरून आज तेवीस दिवस झाले .

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २२८६ :- २३ ऑक्टोंबर १६८० डाक रजिस्ट्रारमधील डच्यांच्या पत्रातील नोंद “ गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे कि “ शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून विषप्रयोग झाला असावा ( ? ) . त्याचा कनिष्ठ पुत्र गादीवर बसावयाचे घाटत होते त्याला तुरुंगवास प्राप्त झाला आहे. आता शिवाजीचा जेष्ठ पुत्र राज्य करीत आहे.

निष्कर्ष :- इंग्रज अधिकारी यांचे पत्र हे तत्कालीन असून शिवाजी महाराजांच्या निधनानंतर २५ दिवसांनी लिहिले गेलेलं आहे. त्यात ते आजारी पडल्याने मृत्यू झाला असे लिहितात . डच्यांच्या पत्रातील नोंद हि जवळजवळ साडे सहा महिन्यानंतर ऐकीव माहितीवर असून ते शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झाला असावा अशी शंका प्रदर्शित करत आहेत.

मराठ्यांची बखर ग्रांट डफ ( लेखनकाळ १८२९ ) :- यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला . तो प्रकार असा “ शिवाजी रायगडी असता त्याला गुडघी म्हणून रोग झाला , तो प्रतीदिवशी वृद्धिंगत होत चालला . मग त्याच्या योगे करून मोठा ज्वर आला . ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.

निष्कर्ष :- मराठ्यांच्या इतिहास लिहिणाऱ्या ग्रांट डफ याने देखील छत्रपती शिवरायांचे निधन हे आजरी पडून झाल्याचे नमूद केले आहे.

मोगल दरबारातील इटालियन व्यक्ती निकोलाओ मनुची त्याच्या Storia Do Mogor ( असे होते मोगल ) या पुस्तकात लिहितो :- तो ( शिवाजी ) सारखा मोहिमेवर चहूकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन १६७९ मध्ये मरण पावला

औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तेदखान “ मासिरे आलमगिरी “ यात लिहितो :- “ दख्खनमधून बातमी आली की शुक्रवार २४ रबि-उस-सानी १०९१ ला सिवा प्रवास करून परतल्यावर घोड्यावरून उतरला. उष्णतेमुळे त्याला दोनदा रक्ताची उलटी झाली. त्यामुळे तो मेला. “

समकालीन मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना “ तारीखे दिल्कुशा “ यात लिहितो :- “ शिवाजी आजारी पडला काही दिवसांच्या आजारानंतर तो मरण पावला “

समकालीन मोगल इतिहासकार खाफिरखान “ मोगल साम्राज्याचा इतिहास “ यात लिहितो :- “ शिवाजीने बालाघाटीतील समृद्ध व्यापारी पेठ जालना यावर स्वारी केली , याच वर्षी तो आजारी पडून मेला.”

निष्कर्ष :- वरील समकालीन मोगल इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन हे आजारी असल्याने झाल्याचे नमूद करतात.

पोर्तुगीज नोंद :- लिस्बनच्या नासिओनाल ग्रंथ संग्रहातील समकालीन पौर्तुगीज लेखात असे लिहिले गेले आहे कि “ शिवाजीस गळू ( Anthrax ) होऊन मरण आले. “

निष्कर्ष :- आंथ्राक्स हा आजार गायी, घोडे यांना होतो तसेच या आजाराने बाधित असलेल्या जनावराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होऊ शकतो .

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २३०२ :- १३ डिसेंबर १६८० हुगळीतीलतील इंग्रज मुंबईतील इंग्रज अधिकाऱ्यास पत्र लिहितात “ शिवाजी आतापर्यंत इतक्या वेळा मेला आहे कि कित्येकाना तो अमर आहे असे वाटू लागले आहे . त्याने आपल्या हयातीत नेहमी ज्या प्रकाराने व ज्या यशाने आपले राज्य चालविले तितक्या तह्रेने चालविणारा त्याच्या पाठीमागे त्याचा कोणीच लायक वारस नाही असे समजतात . तेंव्हा आजपर्यंत भरभराटीत असलेल्या त्याच्या कारभाराला उतरती कळा लागली आहे असे अनुभवाने ठरेपर्यंत त्याच्या मृत्युच्या खबरीवर कोणीच विश्वास ठेवील असे वाटत नाही .

निष्कर्ष :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ८ महिने उलटून गेले तरी शत्रूस विश्वास वाट न्हवता . त्यामुळे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही कपोकल्पित भाकडकथा रचल्या गेल्या

वरील सर्व समकालीन व उत्तरकालीन मराठी साधनांचा तसेच परकीय मोगल , पोर्तुगीज, इंग्रज व डच यांच्या नोंदी यांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन हे आजारी पडून ज्वराची व्यथा व रक्तसार यामुळे झालेले दिसून येते. मराठी साधनातील विषप्रयोगाच्या नोदी ह्या उत्तरकालीन साधनातील आहेत. हि साधने शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर १०० ते १२० वर्षांनी लिहिली गेली . यातील भाकडकथा यांना कोणताही समकालीन संदर्भ नाही. डचांनी त्यांच्या पत्रात ऐकीव माहितीवर विषप्रयोगाची शंका उपस्थीत केली आहे या शंकेस कोणताही आधार नाही .

ब्राम्हण मंत्र्यांनी शिवाजी महाराज यांचा खुन केला असा जावईशोध लावणाऱ्या इतिहासकारांना सांगावेसे वाटते कोणतेही संदर्भ ब्राम्हण मंत्र्यांनी विषप्रयोग केला असे नमूद करत नाहीत . संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात आपणास शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील ब्राम्हणमंत्री कार्यरत असताना दिसून येतात . त्यामुळे ब्राम्हण मंत्र्यांनी शिवाजी महाराज यांचा खून केला हा आरोप समूळ नष्ट होतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खून कोणत्याही व्यक्तीने केला असता छत्रपती संभाजी महाराजांनी त्यास जिवंत सोडले असते का? त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले असेत का ?(छत्रपती शिवरायांचे निधन)

या विषयावरील संपूर्ण पुरावा पुढे ठेवला आहे . लेखकांना न्हवे , तर त्यांना ग्रस्त करणाऱ्या संशयपिशाच्याना म्हणावेसे वाटते “ त्रस्त समंधानो , आत तरी शांत व्हा ! “ :- सेतू माधवराव पगडी

श्री. नागेश सावंत

संदर्भ :- सभासद बखर.
९१ कलमी बखर ( भारतवर्ष , साने ,राजवाडे , फॉरेस्ट , सरकार ).
सप्तप्रकरणात्मक चरित्र.
छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र ( चिटणीस बखर )
शिवदिग्विजय बखर.
शिवकालीन पत्रसार संग्रह २.
मासिरे आलमगिरी.
श्री छत्रपती नी त्यांची प्रभावळ :- सेतू माधवराव पगडी.
पौर्तुगीज मराठे संबंध :- पांडुरंग सखाराम पिर्लुस्कर

छायाचित्र साभार गुगल

Leave a Comment