छत्रपती शिवरायांचे निधन कि विषप्रयोग ? भाग २ –
मागील लेखात (छत्रपती शिवरायांचे निधन कि विषप्रयोग ? भाग 1) आपण शिवाजी महाराजांच्या निधानाबाबत समकालीन व उत्तरकालीन स्वकीय व परकीय संदर्भ साधनातील नोंदी पहिल्या . सदर लेखात इ.स. १६७६ मध्ये शिवाजी महाराजांना विषबाधा झाली अशी अफवा पसरली होती त्याबाबत तसेच शिवाजी महाराजांनी विषावरील उतारे घेतले होते त्यासंबंधी तसेच इ.स. १६८० मध्ये रायगडावरील तत्कालीन परीस्थीती व रायगडावरील उपस्थित मंत्री व इतर लोक यासंबंधी माहिती घेऊ . छत्रपती शिवरायांचे निधन कि विषप्रयोग ? भाग २.
**११ नोहेंम्बर १६७५ रोजी सातारा स्वराज्यात दाखल झाला. शिवाजी महाराज साताऱ्यात आले आणि अचानक आजारी पडले. शिवाजी महाराजांच्या आजाराच्या बातम्या शत्रूच्या गोटात पसरल्या व अफवा उठू लागल्या त्या विषबाधेच्या . **
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १८०५ :- इंग्रज ११ जानेवारी १६७६ च्या पत्रात लिहितात “ नाना तऱ्हेच्या बातम्या येतात. शिवाजी मेला असे कित्येक बोलतात . फार आजारी आहे असे दुसरे बोलतात.
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १८११ :- इंग्रज ११ जानेवारी १६७६ च्या पत्रात लिहितात “ शिवाजीचे मृत्यूस्थान , त्याचा रोग , आणि पुरण्याची तऱ्हा आणि जागा अशा संपूर्ण तपशिलांसह शिवाजीचा मृत्यू व औधर्वदोहिक विधी याबद्दल गेले कित्येक दिवस बातमी ऐकू येते. शिवाजीच्या एका मुख्य ब्राम्हणाच्या मुलीशी संभाजीने व्यभिचार केला . तीला रात्री भेटण्यासाठी रात्री गडाखाली जाण्याचे त्याने न सोडल्यास त्याचा कडेलोट करण्याचा हुकुम शिवाजीने दिल्याचे ऐकुन संभाजीने त्याला विषप्रयोग केला असे कितेक बोलतात . तो आजारी होता आणि त्याचा आजार मुख्यत: त्याच्या डोक्यातील भयंकर कळांमुळे होता. ( कारण त्याचा मेंदू बहुतेक कुजला होता ) इतके आम्हाला खात्रीलायक माहिती आहे. डे. प्रेसि. च्या एका नोकराला सिद्दीसंबुळ कडून शिवाजी मेला असे कळले .दाभोळ , कल्याण , चौल वैगरे ठिकाणचे व्यापारी तसेच बोलतात . परंतु त्यावर फारसा विश्वास ठेवता येत नाही . कारण मोरोपंडित माहुलीखाली ससैन्य आहे. तो अद्याप तेथून हालला नाही.
** शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १८१३ :-** इंग्रज २४ जानेवारी १६७ ६ च्या पत्रात लिहितात “ शिवाजी मेल्याची बातमी आहे.
** शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १८३७ :-** इंग्रज ०७ एप्रिल १६७६ च्या पत्रात लिहितात “ शिवाजीच्या मरणाची बातमी अजूनही संशयित असली तथापि प्रचलित आहे. त्याच्या न्हाव्याने त्याला विषप्रयोग केल्यामुळे बरेच दिवसात तो बाहेर पडला नाही
निष्कर्ष :- इंग्रजांच्या पत्रातून आपणास जाणवते कि महाराज साताऱ्याला मुक्कामी असताना आजारी पडले त्यावेळी देखील विषबाधेच्या अफवा पसरलेल्या होत्या तसेच सदर विषबाधा हि खुद्द संभाजी महाराजांनी केली तसेच एका न्हाव्याने हि विषबाधा केली अश्या बिनबुडाच्या बातम्या पसरल्या होत्या .
लष्करी स्वारीकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युच्या खोट्या बातम्या :-
**शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २२५८ :- ** सुरतकर इंग्रज ७ मे १६८० च्या पत्रात लिहितात शिवाजीच्या मृत्यू बद्दल सर्व बाजूनी बातमी येत आहे. तथापि कित्येकांना अजून संशय आहेच. एखादा मोठा प्रयत्न करण्याचे पूर्वी अशीच बातमी त्याबद्दल पसरवली जाते. तेव्हा अधिक खात्री होईपर्यंत विश्वास होत नाही.
** शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २३११ जेस्वीट वृतांत :-** १६८० च्या अखेरीस शिवाजीच्या मृत्यूची बातमी आली. ह्यावेळी ती खरी ठरली. ह्यापूर्वी आपल्या मृत्युच्या बातमीमुळे बेसावध झालेल्या मुलखात चोरी व लुटालूट अनायासाने करता यावी म्हणून , त्याने लोकांना फसविण्याकरिता अनेक वेळा असल्या बातम्या पसरवल्या होत्या.
**निष्कर्ष :- ** एखाद्या मुलखावर लष्करी स्वारी करण्याकरता शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या बातम्या मुद्दामून पसरवल्या जात अश्या नोंदी आढळून येतात.
**शिवाजी महाराजांनी विषावरील उतारे घेतले होते त्यासंबंधीच्या नोंदी **
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १९३४ :- शिवाजी राजाकडून निरोप आणि पत्रे घेऊन एक ब्राम्हण आणि दोन इसम आले. त्यात त्याने काही पुष्टीकारक रत्ने ( cordiall stones ) व विषावर उतारे ( counterpoisons ) मागितले होते. शिवाजीला पाठवलेल्या औषधाच्या किमती पुढे दिल्या आहेत . एकंदर किमत ६० होण व २० फनाम झाली.
** शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १९४५ :- **आतापर्यंत दोनदा त्याला जरूर असलेल्या “ जहरी मोहरे “ वैगरे ११२ हिंदी होनाच्या मालाचा आम्ही नजराणा केला.
**शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक १९४६ :- ** राजे साहेबांचे पत्र व तश्रीफा पोहचल्या . आपण कृपाळू होऊन “ जहरी मोहरे “ इ. स्वीकारले. वस्तू आणि त्यांच्या उपयोगाबद्दलची माहिती ब्राम्हणाच्या हाती पाठवली आहे.
**निष्कर्ष :- ** छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड सावध असत त्यामुळे त्यांनी शत्रू पक्षाकडून आपणास धोका आहे हे ओळखून इंग्रजांकडून विषबाधेवरील औषधे मागवली होती.
**बुंदेल्याची बखरीतील एक नोंद **
शिवाजीने जालना प्रांतावर स्वारी केली त्यावेळी त्याच्या नियमाविरुद्ध त्याच्या शिपायांनी जान महमद नावाच्या एका साधूच्या अनुयायास फार छळले. असे म्हणतात कि त्याच्या शापाने शिवाजी आजारी पडून मृत्यू पावला.
निष्कर्ष :- उत्तरकालीन बुंदेल्यांच्या बखरीतील हे वर्णन म्हणजे तत्कालीन समाजात असलेली अंधश्रद्धा होय..
**रायगडावरील उपस्थित मंत्री व इतर लोक **
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यसमयी कारकून व हुजरे लोक होते, त्यामध्ये सभ्य , भले लोक बोलावून आणिले . सभासद बखरीत उपस्थीत लोकांची नावे आपणास आढळून येतात. सभासद बखरीत येणारी नावे पुढीलप्रमाणे “-
कारकून :- निळोपंत प्रधानपुत्र , प्रल्हादपंत , गंगाधरपंत , जनार्धनपंतांचे पुत्र , रामचंद्र नीळकंठ , रावजी सोमनाथ , आबाजी महादेव , जोतीराव , बाळप्रभू चिटणीस
हुजरे लोक : – हिरोजी फर्जद , बाबाजी घाडगे , बाजी कदम , मुधोजी सरखवास , सूर्याजी मालुसरा , महादजी नाईक पानसंबळ
यावेळी पंतप्रधान मोरोपंत पेशवे यावेळी फुलमरी परगण्यात होते. , सरनौबत हंबीरराव मोहिते कऱ्हाडच्या परिसरात होते , सुरनीस अण्णाजीदत्तो चौलच्या परिसरात होते महाराजांची दुख:द बातमी कळताच ते रायगडावर येण्यास निघाले व सहाव्या दिवशी रायगडावर पोहचले.
**रायगडावरील तत्कालीन परिस्थिती **
छत्रपतींच्या मृत्यूची बातमी गुप्त राखली जावी यासाठी रायगडाचे दरवाजे बंद करण्यात आले. राजाराम महाराजांनी मंत्राग्नी दिला. उत्तरक्रिया साबाजी भोसले यांनी राजाराम महाराज यांना जवळ बसवून केली. “ राज्याभिषेक पद्धती “ या ग्रंथानुसार मंचाकारोहण मृत राज्याच्या अग्नीसंस्कारापुर्वी काही कारणाने न झाल्यास श्राद्ध विधीनंतर सहा दिवसात करण्याचा पर्याय आहे. जेधे शकावलीतील नोंदीनुसार २१ एप्रिल १६८० वैशाख शुद्ध ३ तृतीयेस राजारामास अनाजीपंत सुरनीस यांनी मंचकी बसविले. संभाजी महाराज यावेळी पन्हाळगडावर होते . छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या मंत्र्यांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होते . त्यामुळे स्वराज्यात दोन गट पडले गेले व गृहयुद्धास सुरवात झाली.
इंग्रज त्यांच्या पत्रात लिहितात “ शिवाजीच्या प्रधानांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होता. अण्णाजी पंडित मुख्य प्रधान धाकट्याच्या बाजूचा होता. तर मोरो पंडित जेष्ठ पुत्र संभाजी यांचा पुरस्कृत करीत होता.”
शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते अत्यंत सक्षम होते . मोगल , निजाम, आदिलशहा , निजाम व इतर परकीय शत्रूच्या गोटातील खबरा शिवाजी महाराजाना मिळत असत . त्यामुळे शिवाजी महाराजांविरुद्ध काही कट रायगडावर झाला असता तर तो कट गुप्तहेर खात्याने पूर्णत्वास जाण्याआधी उधळून लावला असता.
**इतिहासकार विजयराव देशमुख लिहितात **“ विषप्रयोग झाल्याचे नमूद करणारा एकही समकालीन व विश्वसनीय पुरावा आढळत नाही. महाराजांच्या मृत्युनंतर जी गुप्तता राखली गेली व पुढे शंभूराजाना आपल्या पक्षाला सहानभूती प्राप्त होण्यासाठी जो काही पश्चात प्रचार करावा लागला असेल त्याचेच अपत्य म्हणजे हि विषप्रयोगाची कंडी होय !”(छत्रपती शिवरायांचे निधन कि विषप्रयोग)
संदर्भ :-
विजयराव देशमुख :- शककर्ते शिवराय
शिवकालीन पत्रसार संग्रह ,
सभासद बखर
शेडगावकर भोसले बखर ,
जेधे शकावली
छायाचित्र साभार गुगल
श्री. नागेश सावंत