शहाजीराजे यांचा मृत्यू –
(राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग २३)
महाराष्ट्रात शिवाजीराजांचे पराक्रम एकामागून एक प्रकट होऊ लागले. शहाजीराजे व त्यांचे पुत्र आपणास भारी आहेत अशी आदिलशहा दरबाराची खात्री झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातून तर शिवाजीराजांनी आदिलशाही अंमल पार उठवून दिला आणि कर्नाटकात शहाजीराजे व एकोजीराजे असाच पराक्रम गाजवणार असा अंदाज दिसू लागला. अशा स्थितीत शहाजीराजांना आळा घालता आला तर पहावा या इराद्याने मोठी फौज घेऊन आदिलशहाने स्वतः पश्चिम कर्नाटकात स्वारी केली.(शहाजीराजे यांचा मृत्यू)
एप्रिल १६६३ मधे अदिलशहा बंकापुरला गेला. बंकापूरचा किल्ला अब्दुल करीम बहलोलखान याच्या ताब्यात होता. बंकापूरचा किल्ला अब्दुल करीम बहलोलखान याच्या ताब्यात होता. तोही पुंडावा करून यजमानास जुमानत नव्हता. अली आदिलशहा बंकापुरावर गेला ‘ तेव्हा शहाजीराजे व बहलोलखान दोघेही अर्काटच्या पूर्व बाजूस मोहिमेवर होते. फक्त बहलोल खानाची आईच बंकापूरास होती.ती आदिलशहाला आत घेईना तेव्हा आदिलशहाने बहलोलखान व शहाजीराजांना निकडीचे बोलावणे पाठवले व ते येताच त्यांना अटक केली. शहाजीराजांना दुसऱ्यांदा अटक झाली व त्यांची दोन दिवसात सुटकाही झाली. नंतर आदिलशहाने त्यांना बेदनुर जिंकण्याची कामगिरी सांगून तिकडे रवाना केले.
बेदनुरकर नाईक आदिलशहाचा ताबेदार असून अलीकडे तो खंडणी वगैरे न पाठवता स्वतंत्रपणे वागू लागला होता. त्यास वठणीवर आणण्यासाठी शहाजीराजांना लढाईचा भरपूर सरंजाम देऊन बंकापूरला रवाना केले. शहाजीराजे चालून गेले तेव्हा त्यांच्यापुढे नायकांचा इलाज चालला नाही .त्याने शरण येऊन विजापूरची ताबेदारी पत्करली.तेव्हा बेदनूरचा कार्यभाग पुरा करून शहाजीराजे परत फिरले, शहाजीराजांचा हा विजय ऐकून आदिलशहा संतुष्ट झाला .त्यांनी मरातबाची पत्रे ,वस्त्रे ,भूषणे ,हत्ती, घोडे वगैरे पाठवून शहाजीराजांचा गौरव केला .
बेदनुराहून परत येत असता आसपासच्या बखेडखोर ठाण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुंगभद्रातिरी बसवापट्टणजवळ होदेगीरी ( जि.शिमोगा )या गावी शहाजीराजांनी मुक्काम केला. या ठिकाणी अनेक श्वापदे उठली .त्यावेळी शहाजीराजांना शिकार करावयची इच्छा झाली. घोड्यावर स्वार होऊन शहाजीराजे हरणाच्या पाठीस लागले .त्यावेळी घोड्याचा पाय वेलीच्या भेंडोळीत अडकून घोडा व शहाजीराजे पडले व गतप्राण झाले. तेथे एकोजी राजास बोलवून त्यांच्या हस्ते उत्तरक्रिया व सांगता केली. आदिलशहाकडून दुखवटा घेऊन मनसबदारीची वस्त्रे एकोजींच्या नावे झाली.
छत्रपती शिवाजीराजांचे संपूर्ण आयुष्यच निरनिराळ्या भयंकर अशा संकटाने ग्रासले होते. शिवाजी राजांची ही संकटे कधी बाहेरची तर कधी स्वराज्यावरील. शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करून त्याची विल्हेवाट लावून थोडी उसंत मिळते न मिळते तोच शिवाजीराजांना अत्यंत दुर्दैवी अशा संकटांना तोंड द्यावे लागले. शहाजीराजांचा मृत्यू म्हणजे शिवाजीराजांवर कोसळलेला आघात होता .राजांना अतिशय दुःख झाले .परंतु मृत्यूच्या आघाताने एक नवीनच संकट उभे राहिले. ते म्हणजे आई जिजाऊंनी सती जायचे जाहीर केले होते.
सती जाणे ही केवळ कल्पना देखील शिवाजीराजांना सहन होत नव्हती. जिजाऊ म्हणत की आता यापुढे माझ्या जगण्यात काही अर्थ नाही.मला आता जगण्यासारखे काहीच राहिले नाही. जिजाऊंवर जणू आकाशच कोसळले होते. अनेक संकटांशी सामना करताना शहाजीराजे खंबीरपणे जिजाऊंच्या पाठीशी नेहमीच उभे असत.हा सह्याद्रीसारखा कणखर आपला जोडीदार सोडून गेला. यावर जिजाऊंचा विश्वासच बसत नव्हता.जे काही झाले ते महाभयंकर व हताश करणारे होते .आयुष्यभर घोड्यावरून रपेट करणाऱ्या , मुलखगिरीवर आणि लढाईत वेगवान हालचाली करणाऱ्या एका पराक्रमी योद्धयाचा असा केविलवाणा अंत व्हावा ,हे मनाला पटणारे नव्हते. आऊसाहेबांचे सौभाग्य आणि सर्वस्व हरपले होते.शिवाजीराजांचा आणि स्वराज्याचा फार मोठा आधार नष्ट झाला होता.आईसाहेबांच्या करंडातील कुंकूच संपले होते.
रायगडावर जणू विजेचा लोळच आकाशात कोसळला.राजवाड्यात बातमी गेली.एकच रडारड सुरू झाली. किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला .आईसाहेबांची स्थिती ती काय सांगावी ? बावन्न – त्रेपन्न वर्षांपूर्वी सोन्या – मोत्याच्या अलंकारांनी झाकून गेलेली हसरी लाजरी ,कोमल जिजाऊ किशोरवयाच्या देखण्या शहाजीराजांचे हात धरून भोसल्यांच्या घरात आल्या होत्या. वाद्यांचा दणदणाटात वज्रचुडेमंडित सकल सौभाग्यसंपन्न जिजाऊ भोसल्यांच्या देव्हाऱ्यातील लक्ष्मी झाल्या होत्या .शहाजीराजांची लाडकी,आवडती राणी झाल्या होत्या.हसरा नवरा ,लाजरी नवरी, सुखाचा संसार सुरू झाला होता. पुढे स्वराज्यात वारे फिरले आणि सासरे – जावयांचे भांडण झाले.कार्ल्याहून कडूपणा आला , तरीही शहाजीराजांच्या आणि जिजाऊंच्या प्रेमातील साखर कणभरही कमी झाली नव्हती.
शिवबासारखा अलौकीक पुत्र जन्माला आला.संसाराची सार्थकता झाली .जीवन धन्य धन्य झाले. जिजाऊसाहेब खरोखरच सकल सौभाग्य संपन्न शोभू लागल्या होत्या. आलेली अरिष्टे तुळजाभवानीने आपल्या ढालीवर झेलली होती. सौभाग्य मंगळसूत्रावर पडलेल्या सुलतानाच्या तलवारी बोथट ठरल्या होत्या.प्राणघातक संकटातून शहाजीराजे सहीसलामत सुटले होते. जिजाऊसाहेबांचे कुंकू बळकट . जिजाऊसाहेबांची एकच हौस आता उरली की, भरल्या चुड्याबांगड्यानिशी भरल्या मळवटानिशी, खणा नारळाची ओटी घेऊन , हळदी – कुंकवाच्या सड्यावरून स्वर्गी जायचे.आता संध्याकाळ होत आलीच होती. औक्षाच्या चार घटका उरल्या होत्या. एवढा शेवटचा डाव जिंकायचा होता ; पण आईसाहेबांचा करंडा घरंगळला ! आई साहेबांचे सौभाग्य अडखळले मृत्यूने केलेला पराभव आई साहेबांना सहन झाला नाही. त्यांनी सती जाण्याचा निर्धार केला. सती जाण्याची कल्पनादेखील शिवाजीराजांना सहन होत नव्हती ,आणि जिजाऊंना तर जगण्यात काहीच स्वारस्थ उरले नव्हते.
महाराजांचे दुःख तर अपार होते.सह्याद्रिही उभा थरथरला होता. महाराजांवर दुहेरी कडा कोसळला होता .तीर्थरूपसाहेबांच्या मरणाची बातमी त्यांना समजली , तेंव्हा ते आईसाहेबांकडे धावले.महाराजांनी हंबरडा फोडला .सारी पृथ्वी डळमळते आहे .भयंकर झंझावात सुटला आहे , आणि आपण प्रेमाच्या दोन पंखापासून दूर अंधारात फेकले जात आहोत , असे महाराजांना वाटू लागले होते.
महाराजांचे दुःख अपार होते. निधड्या छातीचे शिवराय धाय मोकलून एखाद्या बालकासारखे आक्रोश करू लागले.दु:खाने हंबरडा फोडून त्यांनी आईसाहेबांच्या गळ्यास मिठी मारली होती .कारण आईसाहेब म्हणजे महाराजांचा प्राण होता. महाराष्ट्राच्या महापुरुषाचा तो आक्रोश ऐकून सह्याद्रीसुद्धा थरथरत होता.शोकाचा डोंब उसळला होता .आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती. एकुलत्या एक मुलाच्या हाकेनेही आई साहेबांची समाधी भंगू शकत नव्हती. रायगडाच्या भिंती , दरवाजे,बुरुज, दीनवाने झाले होते.सार्या स्वराज्याचे मावळे शोक करत होते .महाराज कळवळून विनवीत होते की ,आईसाहेब तुम्ही जाऊ नका .पण आहेसाहेबांचा निर्धार काही ढळेना.आई साहेबांची नजर मागे फिरत नव्हती. चौतीस वर्षे लेकराची घारीसारखी राखण करून त्या एकदम उठून निघून चालल्या होत्या. शिवबाला पोरका करून चालल्या होत्या.
शिवाजीराजांनी जिजाऊंना मिठी मारली आणि ते मोठमोठ्याने रडू लागले. आईसाहेब मी जे काही आजपर्यंत करू शकलो , ते केवळ तुमच्यामुळेच.मी आता कोणाच्या आधारावर तुमच्या मागे जगू ? यापुढे मला कोण सल्ला देणार ? कोण मार्गदर्शन करणार तुमच्या लाडक्या शिवबाला ? आईसाहेब तुम्ही सती जाऊ नका .माझे ऐका ! या तुमच्या लेकराची एवढी विनंती मान्य करा . त्याला पोटाशी घ्या , आपण सती गेलात तर मला मायेचे पांघरून कोण घालणार ? आबासाहेब गेले आम्ही पोरके झालो ! परंतु आपण गेलात तर सारे स्वराज्य पोरके होईल .आईसाहेब आजपर्यंत सारा स्वराज्याचा डोलारा केवळ तुमच्यामुळेच आम्ही उभा करू शकलो .
निर्वाणीचा प्रसंग आला होता. महाराज शोकसागरात अखंड बुडाले होते .त्यांनी इंद्राचे वज्रही भेदून जाणारी दुःखाची हाक मारली आणि एकदम आईसाहेबांच्या मांडीवरच बसून गळ्याला मिठी मारली. आईने आपल्याला सोडून जाऊ नये ,म्हणून महाराजांनी आकांत मांडला होता. मोठ्या प्रयासाने जिजाऊ साहेबांना सर्वांनी त्यांना सती जाण्याच्या निश्चयापासून माघारी वळवले.
तिकडे शहाजीराजांची समाधी एकोजी राजांनी होदिगरे येथेच बांधली. समाधीच्या पूजा-आर्चाची व्यवस्था करण्यात आली .नंदादीप तेवत राहू लागला. या सर्व खर्चाकरीता होदिगरेच्या शेजारील मरगटनहळ्ळी या गावाची सनद बादशहाने करून दिली. अशा रीतीने स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचे महाणिर्वान झाले.(शहाजीराजे यांचा मृत्यू)
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे.