महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,459

ऋण सह्याद्रीचे…

Views: 3789
3 Min Read

ऋण सह्याद्रीचे…

सह्याद्री हा महाराष्ट्र्राचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्याला याच सह्याद्रीत स्वर्गसुख अनुभवण्यास मिळते. डोंगर, झाडे, नद्या, धरणे, दऱ्या, कातळ, प्राणी, फळे, फुले इत्यादी संपत्तीने परिपूर्ण असा हा सह्याद्री. ह्याच सह्याद्रीत अगदी ताठ मानेने जगणारे आणि इतिहासाचे मुक साक्षीदार म्हणजेच आपले हे गडकिल्ले. आजही हे गडकिल्ले आपल्याला त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष देत आणि सोबत बदलत्या नैसर्गिक हवामानाला टक्कर देत खंबीरपणे  उभे आहेत. कित्येक युद्ध, लढाई या सह्याद्रीने आपल्या अंगावर घेतली आहेत.. भ्रमंती करताना कधी कधी खरच जाणवते कि हा सह्याद्री आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो… सह्याद्रीचा मंद वारा जणू आपल्या कानात काहीतरी गुणगुणत आहे असा भास होतो…

चार पुस्तके वाचून कोणी गडकिल्ले अभ्यासत नाही किंवा कोणी अभ्यासक होत नाहीत. महाराष्ट्राचा अपरिचित इतिहास आजही या गड किल्ल्यांमध्ये अबोला धरून बसला आहे. इतिहासाची खरी ओळख करून घेणे आणि इतिहासा बद्दलचे प्रेम जपणे हे केवळ सह्याद्रीत फिरून शक्य होते. म्हणूनच आपण ह्या सह्याद्रीचे  ऋणी लागतो. बँकेचे ऋण आपण पैशाच्या स्वरूपात देऊन फेडू शकतो. परंतु ह्या निस्वार्थी सह्याद्रीचे कसे? तो कधी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे  शुल्क घेत नाही? तर आपण त्याचे ऋण कसे फेडायचे?

यावर उपाय म्हणजे, आपण सर्वच ट्रेकिंग म्हणा किंवा भटकंती म्हणा, कोणत्या ना कोणत्या प्रकारे ह्या सह्याद्रीत उतरतोच.. परंतु आपण त्याला काही मोबदला देत नाही.  याउलट आपले गडकिल्ले हे ह्याच सह्याद्रीत त्यांचे अस्तित्व टिकवत ऊन, पाऊस आणि वारा यांचा मारा सोसत उभे आहेत. आपले देखील एक कर्तव्य बनते कि ह्या गडकिल्ल्यांसाठी काहीतरी करावे. कारण कालचे गडकिल्ले हे आजच्या सह्याद्रीचे अभिमान आहेत इतकेच नव्हे तर ते रक्तरंजित अशा स्वर्णइतिहासाचे मुकसाक्षीदार देखील आहेत.

ज्यावेळी आपल्याला आधाराची गरज होती त्यावेळी ह्याच गडकिल्ल्यांनी आपले स्वराज्य अबाधित ठेवले एवढेच नाही तर परकीय सत्ते पासून होणारे आक्रमण परतवून लावले. आता याच गडकोटांना आपल्या आधाराची गरज आहे.  ढासळत्या बुरुजांना आधार देण्यासाठी ते आपल्याकडे  एका  सकारात्मक आशेने पाहत आहेत. आपण तेवढे तर नक्कीच करू शकतो?

आज महाराष्ट्रात लहान – मोठे शेकडो ट्रेकिंग ग्रुप आहेत. हे ग्रुप काही शुल्क आकारून ह्या गडकोटांची आणि सह्याद्रीची सफर घडवून आणतात, परंतु सर्वच ग्रुप हे गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करतातच असे नाही.  परंतु जे करत नाहीत त्यांनी ह्या गोष्टीचा विचार जरूर करावा, कि व्यापार म्हणून जर का सह्याद्रीकडे पाहत असाल तर त्या व्यापारातून आलेला नफा हा त्याच सह्याद्रीसाठी खर्ची करावा. कारण उद्या जर का हे सर्व गडकिल्ले अस्तित्वात नसतील तर तुम्ही कोणाला सोबत घेऊन जाणार भटकंती करण्यासाठी? तुम्हाला मिळणारा नफा हा कालांतराने तोट्यात बदलून जाणार, नाही का?

म्हणूनच  इतिहासाचे हे मुकसाक्षीदार असलेले गडकिल्ले आणि त्यांचे ढासळत चाललेले तट – बुरुज यांना आधार देऊ, यांचे संवर्धन करू आणि त्यांना पुन्हा बोलके करू….. . फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण सर्व ह्या गडकोट्यांच्या संवर्धनास हातभार लावू.

लेखनसीमा

– मयुर खोपेकर

1 Comment