दिपाजी राऊत…
शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता.
प्रतापरावांनी साऱ्या सैन्यासमवेत जिवाच्या बाजीने घोडी हाकली अन् बहलोल खानच्या तळालाचं वेढा दिला. अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.
सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते, सिधोजी निंबाळकर यांसारख्या त्यातल्यात्यात अनुभवी तरुणांमध्ये दिपाजी राऊत हे अगदी तलवारीच नवखं पातं पण हेदेखील तिखट हत्यार चालवीत होते.
बेहलोलखान व त्याचे सरदारही जबर युद्ध खेळू लागले. त्याचा एक सेनानी सिद्दी मुहम्मद बर्की याने चांगलाच पराक्रम गाजवला. पण नंतर त्याचीही मात्रा चालेना अंधाराचा फायदा घेऊन तोदेखील निसटून जाऊ लागला. पण दिपाजी राऊतांनी पळता पळवता केलेल्या हल्ल्यात बर्की जबर जखमी झाला. दिपाजींची तलवार गर्जतच होती. घोड्यावर बसून दिपाजी घुमत होते समोर येईल त्याला गारद करीत होते अशातच त्यांचा सामना झाला तो सिद्दी मुहम्मद या सेनानीशी तसा हा सेनानी रापलेलाच त्याच्यामानाने दिपाजी नवखं सिद्दी मुहम्मद ने दिपाजींचा घोडा मारला, दिपाजी दुसऱ्या घोड्यावर स्वारं झाले; परंतू हा देखील घोडा सिद्दी ने मारिला त्यामुळे चिडलेल्या दिपाजींनी जमदाढीचा मारा करून त्याला ठार केले.
असे हे नवं उगवत पातं म्हणजे दिपाजी राऊत परंतू आपल्या इतिहासाला या एवढ्या प्रसंगाशिवाय दिपाजींचा दि सुद्धा माहीत नाही. हा माझा छोटासा प्रयन्त इतिहासाच्या पानातच हरविलेल्या मावळ्यांना शोधण्याचा.
बा रायगड परिवार