देखणा द्वारपाल –
प्राचीन मंदिरांवर विविध शिल्पे आढळून येतात ती केवळ सहज म्हणून कोरलेली नसतात. त्यांची एक परिभाषा असते. ते शिल्प तिथेच का कोरले याचे विशिष्ट कारण असते. छायाचित्रातले हे जे शिल्प आहे ते द्वारपालाचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतानाच्या दरवाज्याची जी चौकट असते त्यावर अतिशय कलात्म नक्षीकाम असते. त्याला द्वारशाखा म्हणतात. या द्वारशाखा एक दोन तीन अगदी माणकेश्वर मंदिर (ता. भुम जि. उस्मानाबाद) इथे तर तब्बल सात द्वारशाखा आहेत. या द्वारशाखेच्या तळाशी द्वारपालाचे शिल्प कोरलेले असते. देखणा द्वारपाल हे शिल्प होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपालाचे आहे.
या द्वारपालाच्या हातात डमरू आणि त्रिशुळ आहे. यावरून हा शैव द्वारपाल असल्याचे अनुमान काढता येते. म्हणजे हे मंदिर शैव देवतेचे आहे हे ठरवता येते.
आक्रमकांच्या भितीने बहूतांश मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती भक्तांनी मुळ जागेवरून दूसरीकडे नेवून ठेवल्या. मग बराच काळ लोटल्यावर सगळं काही स्थिरस्थावर झाल्यावर रिकामा गाभारा पाहून स्थानिक भाविकांनी घडवायला सोपी म्हणून महादेवाची पिंड आणून बसवली. मग मंदिर मुळ कुठल्या देवतेचे? हे ओळखणं अवघड होवून बसले. अभ्यासकांनी हे दाखवून दिले की जी मुख्य देवता मूर्ती आहे त्या अनुषंगाने द्वारपाल, ललाटबिंबावरील देवता, बाह्य भागातील देककोष्टकांतील देवता यावरून काही अनुमान काढता येते.
गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी जी प्रणाल असते तिलाही अर्थ आहे. तिथे गोमुख कोरले आहे किंवा मकर प्रणाल आहे याचेही अर्थ आहेत.
अतिशय देखणी अशी ही शैवद्वारपालाची मूर्ती आहे. आजूबाजूला इतर भक्तगणांची शिल्पे आहेत. सर्वच नृत्याच्या ललित मूद्रेत आहेत. भोवती सुरेख नक्षी आणि किर्तीमुखही कोरलेले आहे.
मंदिराचा मुख्यमंडप आणि गाभारा यांना जोडणार्या जागेला अंतराळ असा शब्द आहे. या ठिकाणी अंधारच असल्याने इथली शिल्पकला दूर्लक्षीत राहते. प्राचीन मंदिरात गेलात तर गर्भगृहाच्या द्वारशाखा आवर्जून बारकाईने न्याहाळा. खुप सुंदर कलाकृती इथे दिसतील.
फोटो सौजन्य. Travel Baba
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद