देशमुख गढी, मोहोळ –
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या तालुक्याच्या गावी देशमुखांची भव्य गढी होती. सद्यस्थितीत गढीतील वाड्याचे अवशेष पहायला मिळतात आणि एका बुरूजाचे अवशेष आहेत. तसे जुना वाडा ढासळल्यामुळे त्याची काष्ठशिल्प वापरून जुन्या ढाच्याचा नवीन वाडा उभारला आहे. मोहोळ हे गाव सोलापूरपासून ३५ कि.मी अंतरावर आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरच हे गाव आहे. वाड्यातून दोन भुयार होती एक ३ कि.मी आणि एक ४ कि.मी अंतराचे होते. गढीमध्ये मोठी तळघरे होती ज्याचा उपयोग अन्नधान्य आणि रसद साठविण्यासाठी होत असे. देशमुख गढी मध्ये बारव होती ज्याची मोट उंटाने चालवत असत.
शहाजीराजांच्या परगण्यातील सरदार विठोजी देशमुख यांनी इ.स. १६५९ मध्ये मोहोळमध्ये वैभवशाली गढी उभारली होती. पुणे परागण्याचा कारभार इमानेइतबारे विठोजी देशमुख करत होते त्याचे इनाम म्हणून त्यांना शहाजीराजेंनी मोहोळ आणि आसपासची १६० गावे दिली. त्यांना ५,००० सैनिकांची फौज दिली होती. ती फौज सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूरची भवानी माता, पंढरपूरचे विठ्ठल रूक्मिणी मंदिर या परिसराचे रक्षणाचे काम करत असे.
इ.स १६६५ मध्ये इंदापूरजवळील युद्धात विठोजी देशमुख यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नंतर त्यांच्या पत्नी साळाबाई यांनी मोहोळचा कारभार बघितला. त्यांच्या कार्याची महती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोचली आणि त्यांनी राज्याभिषेकानंतर साळाबाईंना मान म्हणून पालखी आणि २ उंट हा नजराणा दिला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रज मराठा युद्धानंतर गढीची खूप मोठ्या प्रमाणात नासधूस केली.देशमुख गढी, मोहोळ. इ.स. १८१८ मध्ये इंग्रज मराठा युद्धानंतर गढीची खूप मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
टीम – पुढची मोहीम