महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,670

देव वरणे : खानदेशातील एक दुर्मिळ कुळाचार

Views: 2846
8 Min Read

देव वरणे : खानदेशातील एक दुर्मिळ कुळाचार –

खानदेशात विवाह हा एक उत्सवच असतो. विवाहाची तयारी पूर्वी एक महिन्यांपासून सुरू व्हायची. नुसता हळदीचा समारंभच आठ दिवसांपर्यंत चालायचा. पूर्वी आठ मांडव, पाच मांडव, तीन मांडव, किंवा दोन मांडव अशी हळद असायची. म्हणजे आठ ,सात किंवा पाच दिवसांपर्यंत फक्त हळदच लावली जायची. आता कालौघात हळद समारंभ आटोपताच घेतात. लग्नाच्या एक दिवस अगोदर हळद समारंभ उरकतात. हळद लावल्यावर तेलन पाडणे व पोखणे हे विधी पार पाडले जातात. यामध्ये स्त्रियांचा सहभाग असतो. त्यानंतर पार पडतो तो म्हणजे “देव वरण्याचा विधी” ! देव वरणे : खानदेशातील एक दुर्मिळ कुळाचार.

देव वरणे हा कुळाचार खानदेशात विशेषतः अहिराणी भाषिक पट्ट्यात संपन्न होतो. वर किंवा वधू दोघांच्याही हळद समारंभात देव वरण्याचा कुलाचार आहे. विशेष म्हणजे सर्वच जातींमध्ये हा कुलाचार आढळतो.

हळदी च्या दिवशी रात्री सर्वांची जेवणे आटोपल्यावर तेलन पाडले जाते. पोखण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर अंगणात किंवा मोकळ्या जागेत मध्यभागी खाट किंवा बाज टाकली जाते. बाजेवर पांढऱ्या रंगाचे कोरे धोतर अंथरतात. धोतरावर मध्यभागी लाल मंद्रा किंवा कापड अंथरून त्यावर नागवेलीची पाने ठेवतात.

नागवेलीच्या पानांवर घरातील पूजेचे चांदीचे टाक त्यामध्ये खंडेराव, बहिरोबा, कानुबाई, रानुबाई, कुलदेवता, साखर चतुर्थीचा टाक( काही ठराविक घरातील देव्हाऱ्यात हा असतो.) हे सर्व मांडले जातात. भाऊबंदकीतील सर्व देव येथे एकत्र केले जातात. देवांचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे ठेवले जाते. या टाकांच्या जवळ पेटवलेला लोखंडी दिवा ठेवतात. विवाह समारंभात लोखंडाच्या दिव्याला विशेष महत्त्व असते. प्रत्येक देवघरात तो असतोच असतो. नसेल तर खास बाजारातून विकत आणला जातो.

खाटेच्या चारही दिशांना पेटवलेले चार कणकेचे दिवे ठेवतात. खाटेच्या एका दिशेला घरातील खास करून भाऊबंदकीतील सर्व स्त्रिया बसतात. दुसऱ्या दिशेला सर्व पुरुष मंडळी बसतात. सर्व भाऊबंदकी एकत्र येते. त्या सर्वांच्या हातात अक्षता म्हणजे तांदूळ दिले जातात. घराण्यातील किंवा गावातील ज्येष्ठ स्त्रिया गाणे म्हणायला सुरुवात करतात. त्यांच्यामागे बाकीच्या सर्व स्त्रिया  गाण्यातील प्रत्येक ओळींची पुनरावृत्ती करतात. त्यावेळेस हातातील अक्षता दोन बोटांच्या चिमटीने देवांच्या दिशेने वरल्या जातात. म्हणजे देवांवर अर्पण केल्या जातात. सर्व भाऊबंद देवांवर तांदूळ वाहतात.

“सक मोठी सकायी उठजा,
अंघोळ गंगानी करजा,
चंदन घासूनी लावजा,
गाय धोयी बांधजा ,
दूध दुधानी धोयजा,
दूध तापे गर्वे गर्वे ,
या दुधानी पिव्वी साय,
येना वास सर्वे जाय,
सर्वे वडील बोलती,
आमना वशीला नांदती, ( वंशपरंपरा)
कन्या पुत्र उजवती,
कोणा घरीचं सोबनं,(कार्य)
संजू घरीचं सोबनं (येथे घरातील कर्त्या पुरुषाचे नाव घेतले जाते.)
दामू बाबा ले नीवतं शे (येथे मृत असलेल्या वडील किंवा आजोबांचे नाव घेतले जाते.)

कुळातील सर्व प्रमुखांचा व त्यांच्या मृत व्यक्तींचा उल्लेख गाण्यातून केला जातो. त्यातून पूर्वजांना आमंत्रण दिले जाते. विवाहविधी कुठलीही बाधा न येता सुखपूर्वक पार पडावा, पूर्वजांनी संतुष्ट व्हावे म्हणून त्यांना आमंत्रण दिले जाते.

त्यानंतर कणकेचे चार दिवे बाजूला करून लोखंडी दिवा देव्हार्‍यात ठेवतात. लाल कापडातील देव अक्षता व नागवेलीच्या पानांसहित एकत्र बांधतात. काही ठिकाणी फक्त कुलदेवी व खंडेरावाचे टाक बांधतात. यावेळी घरातील मोठी वहिनी किंवा एखादी सवाष्ण  देवांचे गाठोडे स्वतःजवळ ठेवते. देव देण्याचा मान तिला असतो. ती सहजासहजी देव देत नाही. उखाणे घ्यावे लागतात.मग एकेक सवाष्ण नाव अर्थात उखाणा घेते.

“फाटेल कुर्चीना तुटकेल बाह्या,
ईस रुपया दी सन लिधा शेरभर लाह्या.
काया वावर मां टोच्यात हापूस न्या कोया,
अन तुका पाटीलनी मन्हावर भाकरपूरती माया ”

सगळीकडे एकच हशा पिकतो.
आता पुरुष मंडळींना नाव घ्यावे लागते .

“काया वावरमा कोथमिरनी काळी,
आन चाईसगावनी पोर माले पटनी व माळी”

मग काय , पुन्हा हशा!

असे हसतखेळत उखाणे घेतले जातात. तेव्हा  खंत्या व खंतीच्या हाती देव सोपवले जातात.

(हे जोडपे मुद्दाम भाऊबंदकीतील निवडले जाते.)

खंत्या खंतीच्या हाती देव आल्यावर बांबूच्या कोऱ्या डालकीत देव ठेवले जातात. डालकी डोक्यावर ठेवली जाते. अन खंत्या खंती वाद्याच्या तालावर देव नाचवतात. त्यानंतर प्रत्येक जोडपे पुढे येते. देव डोक्यावर ठेवून नाचवले जातात. सर्व भाऊबंदांना हा मान दिला जातो.

लग्नासाठी आलेल्या भावकीतील सर्व लेकी व जावई यांना देव नाचण्याचा विशेष मान दिला जातो. ज्यांना नाचता येते त्यांच्यासाठी ही खास पर्वणी असते. मात्र ज्यांना नाचता येत नाही त्यांची मात्र फजिती होते. देव डोक्यावर घेतल्यावर नृत्य करावेच लागते.

खानदेशातील अहिराणी भाषिक पट्ट्यात विशेषतः धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव पाचोरा, एरंडोल या भागात हा   कुलाचार सगळीकडे आढळतो. त्यामुळे या भागातील मुले-मुली नाचण्यात चांगलेच तरबेज असतात. मात्र तावडी व लेवा गणबोली पट्ट्यात हा विधी आढळत नाही त्यामुळे त्या भागातील मुले मुली नृत्य करताना संकोचतात.

देव नाचवताना कोऱ्या डालकीत दहाच्या किंवा वीस च्या नोटा देवांवर ओवाळणी म्हणून टाकतात. सर्वांचे सामुहिक नृत्य संपले की देवांचे गाठोडे मांडवात बांधतात. पूर्वी हा मांडव तूरकाट्या ओल्या करून त्यांना पीळ देऊन खास पद्धतीने विणला जायचा. आता तूरकाट्या पण नाहीत व  तसे विणकर पण नाहीत. त्याऐवजी स्तंभारोपण केले जाते.

स्तंभारोपण करताना अंगणात एक खांब रोवला जातो. त्याला मेढ म्हणतात. त्याला जांभूळ, आपटा किंवा शमी, आंबा, उंबर यांचे डहाळे, तूरकाट्या,  सुके पवना गवत, पिवळ्या वस्त्रांमध्ये ज्वारीचे पिवळे दाणे,  एक सुपारी, एक खारीक, एक नाणे एकत्र करून सर्व खांबाला बांधतात. अहिराणी भाषिक पट्ट्यात मेढ रोवली जाते तर तावडी व लेवा गणबोली भाषिक पट्ट्यात मांडव घातला जातो.

मांडव घालणे किंवा स्तंभारोपण करणे यातून एक गोष्ट जाणवते की प्राचीन काळापासून या लोकांनी देवांच्या प्रतिमा जशा जोपासल्या तसेच निसर्गातील वृक्षसंपदा व माळरानातील विपुल असलेले चराई गवत यांना देखील पूजेत स्थान दिले. कारण मुळात पशुपालक असलेल्या व नंतर कृषीवल झालेल्या या लोकांचे पशुधन हे निसर्गातील वनसंपदे वरच विसंबून होते. म्हणून कानुबाई व रानुबाईचे टाक त्यांनी देव्हाऱ्यात स्थापित केले.

लग्नानंतर मुलगी माहेरी आली की तिच्या हाताने देव सोडतात. त्यांना स्नान घालून देव्हाऱ्यात स्थापन करतात. मांडवावर दहीभात शिंपडतात. त्याला ” मांडव शांत करणे” म्हणतात.

“देव वरणे” या विधीतून एक सूचित होते की अभीर लोकांचे जे काही पूर्वापार कुलाचार असतील त्यातील हा एक महत्त्वाचा कुलाचार आहे. पशुधन विशेषतः गाईंचे त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. प्रत्येक घर दूध दुभत्यांनी संपन्न होते. म्हणून त्यांच्या गीतातून गायी, वासरे, दूध-दुभते यांचा उल्लेख येतोच येतो.आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. विवाहासारख्या महत्वाच्या विधीला पूर्वजांना आमंत्रण देण्याची ही प्रथा आहे. जेणे करून त्यांची कृपादृष्टी कुटुंबावर व नवदाम्पत्यावर रहावी.

या विधीत भाऊबंदकीचे सर्व देव एकत्र आणतात. सर्व भाऊबंदकी एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्र येते. जेणेकरून त्यांच्यातील मतभेद दूर व्हावेत. देवांना वरतांना सर्वजण मांडीला मांडी लावून बसतात. देवांना डोक्यावर घेऊन नृत्य करतात.

नृत्यातून आनंदाचा अविष्कार होतो. कुठल्याही प्रकारचे मनभेद व मतभेद किंवा खिन्नता, आपसातील हेवेदावे दूर होऊन पुन्हा गोडवा निर्माण व्हावा म्हणून देवांच्या साक्षीने हसत-खेळत नृत्य केले जाते. विवाह प्रसंगनिमित्ताने सर्व नात्यांची वीण घट्ट व्हावी, कटुता नाहीशी व्हावी म्हणून आभिरांचा नृत्याविष्कार पूर्वापार चालत आला असावा.

” देवांना मांडवात बांधणे” यातून एक गोष्ट लक्षात येते की संपूर्ण विवाह समारंभ निर्विघ्नपणे पार पडावा, म्हणून देवांवर भार सोपविणे. येणारी संकटे देवाने परस्पर झेलावीत, म्हणून त्याला साकडे घालणे, (जसे काही ठिकाणी संकटे दूर होईपर्यंत गणपतीला पाण्यात बुडवून ठेवतात तसे.) विवाहानंतर मुलाच्या किंवा मुलगी लग्नानंतर माहेरी आल्यावर तिच्या हाताने देव सोडतात. म्हणजे त्यांच्या वरचा भार हलका करतात. दहीभात शिंपडून मांडव शांत करतात. म्हणजेच देवाने विवाह समारंभात विघ्न येऊ दिली नाही, म्हणून त्यांचे एक प्रकारे आभारच मानले जातात.

खानदेशातील असा हा ” देव वरण्याचा ” आगळावेगळा कुलाचार आहे.

– संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

Leave a Comment