शूर वीरांची भूमी देवघर गाव –
आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक प्राचीन वारसा लाभला आहे, ही भूमी साधू संतांच्या पद स्पर्शाने आणि अनेक वीरांच्या पराक्रमाने नेहमी पावन,समृद्ध म्हणून ओळखली जाते. आजवर या भूमीत विविध कालखंडात प्रत्येक घरात एक तरी वीर जन्माला आलाच,ज्यांनी सम काळखंडाप्रमाणे या भूमीचं रक्षण केलं,अगदी या भूमी साठी आपलं सर्वस्व पणाला लावले. प्रसंगी आपले प्राण ही दिले,यांच्या त्या तेजस्वी पराक्रमाला इथली माणस, इथली माती आजही विसरली नाही, त्यांच्या विरमरण पश्चात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी गावागात मोक्याच्या जागी,म्हणजे मंदिरे,प्रांगण,गावची वेस,गावच्या मध्यभागी कातळ शिल्पात त्या विरांच्या पराक्रमाचे प्रसंग कोरून ठेवण्यात आले.(देवघर गाव)
विरांचा पराक्रम सांगणाऱ्या या कातळ स्मृतीशिल्पांना आपण विरगळ असे संबोधतो, त्याच प्रमाणे या विरांसोबत त्यांची जी पत्नी सती जात असे,त्या घटने संदर्भात उभारलेल्या कातळ शिल्पास सतिशीळा असे म्हंटले जाते.
महाराष्ट्रात अस एक गाव नसेल की त्या गावात सतिशीळा- विरगळ घडली नसेल. पण या विरगळ- सतीशिळा बद्दल समाजात खूप गैरसमज,अज्ञान, दिसून येते, हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे पुढील काळाची गरज आहे. इतिहासातील असाच एक संदर्भ सांगणारे गाव म्हणजे आपल्या म्हसळा शहरातील देवघर हे होय या संदर्भात आज आपण थोडी माहिती घेणार आहोत,
मुंबई हुन कोकणाकडे येताना मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव वरून उजव्या हाताकडून आत अनेक पर्यटक दिवेआगर, हरिहरेश्वर,किंवा मुरुड जंजिरा पर्यटनासाठी येत असतात,आपण माणगाव पासून २४ किलोमीटर आसपास आत आले असता, घोणसे घाट उतरल्या नंतर काही अंतरावर आपल्याला म्हसळा तालुक्यातील देवघर हे गाव लागेल.
गावाच्या दर्शनी प्रवेशद्वार जवळच खालील अंगाला साई बाबांचं एक सुंदर मंदिर आहे, अनेक लोक त्या ठिकाणी आवर्जून भेट देतात,. आपण गावच्या त्या प्रवेश द्वारातून आत जवळपास ६०० मिटर चालत गेले असता तिथे आपल्याला दोन रस्ते दिसतात एक सरळ मार्ग हा देवघर कोंड या दिशेने जातो, तर त्याच मार्गाने वर आपल्याला श्री दत्त मंदिराकडे ही जाता येते. मात्र पहिला मार्गावर आपल्याला स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिर दृष्टीस पडेल.
डोंगर उताराच्या या जागेत पावसाळी खूप सुंदर धबधबे वहात असतात, त्यामुळे अनेक स्थानिक लोक इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यास दरवर्षी आवर्जून या ठिकाणी येत असतात. मंदिरातील परिसर अत्यंत शांत आणि हिरव्या गार झाडीत नटलेला पाहून मन अगदी प्रसन्न होऊन हात. तुम्ही या ठिकाणास कोणत्या ही ऋतु मध्ये भेट द्यावी तिथली शीतलता तुम्हाला अगदी मन प्रसन्न करून सोडले यात शंका नाही.
मंदिराची रचना पहाता, हे पूर्ण मंदिर लाकडी खांब व भिंती द्वारे मजबूत बांधलं गेलं आसून कौलारू पद्धतीत आहे ,मध्यंतरी काळात काही भागांत नवीन केलेलं बांधकाम आपल्याला लगेच ओळखता येईल,मंदिराच्या मेन गेट मधून आत गेल असता प्रथम एक जांभ्या दगडात उभारलेली सुंदर दिपमाळ दिसते.आणी मंदिरात प्रवेश केला असता,स्वयंभू श्री अमृतेश्वराच मुख्य शिवलिंग असून गाभाऱ्यात प्रथम गणेश मूर्ती आणि एक असे जुने दोन शिवलिंग आहेत, व एक जुना आणि नवीन जीर्णोद्धार करून बसवलेले असे दोन नंदी चे शिल्प आहे, या नंदी च्या बाजूला काही छोट्या आणि मूर्ती ही आपल्याला पहायला मिळतील.
मंदिराच्या बाहेर १९ व्या पूर्व शतकातील तुळशी रुंदावन जवळ अंदाजे इसवी सन ११ व्या शतकातील शिलाहार कालीन दोन मोठे नंदी आणि एक चतुर्भुज सतीशीळा अगदी सुस्तिथीत उपलब्ध आहे,या सतीशिळेवर चार वीरांचे युद्ध प्रसंग कोरलेले आहेत.
त्यातील चित्रे पाहून हे चार वीर सैन्यातील उच्च कामगिरीवर असावे,किंवा एकच वीर चार युद्धात आपला पराक्रम गाजवून मरण पावला असावा,व त्याची पत्नी,किंवा त्याच्या चार पत्नी त्याच्या बरोबर अग्नीत जळून सती गेल्या असाव्यात असा पूर्व अंदाज अश्या विरगळ संदर्भात बांधला जातो. ही एक चतुर्भुज विरगळ इतर विरगळीनपेक्षा खूप कमी प्रमाणत आढळते,यावरील कोरीव काम अत्यंत सुंदर,सुबक आणि स्पष्ट आहे.
मंदिराच्या उजव्या बाजूस आणि दोन भव्य विरगळ एका चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत,यातिल चित्रे व्यवस्थित नसल्याने नक्की कोणत्या प्रसंगातील असतील हे सांगणे थोडे कठीणच, त्याच्या बाजूला काही भग्न स्वरूपातिल विरगळींचे तुकडे देखील ठेवले आहेत यात,काही रक्षक, तर पति पत्नी,वीराला स्वर्ग प्राप्ती देणाऱ्या अप्सरा,अश्याप्रकारे शिल्प कोरल्याचे थोड्या प्रमाणात दिसत आहेत.
या चौथऱ्याच्या समोर आणि एक चौथरा असून त्यावर थोडं मोडक्या स्वरूपातील एक चौरस शिवलिंग ठेवण्यात आले आहे, या शिवलिंगा वर सुंदर नक्षीकाम केल्याचे दिसून येईल, मात्र नक्षी कामाचा काही भाग हा जमिनीत घट्ट केल्याने पूर्ण शिवलिंग आपल्याला पहाता येत नाही.
मंदिर आवार परिसरात जुन्या मंदिराच्या दगडी खांबाचे काही अवशेष आपल्याला दिसतील. मंदिराचा परिसर आणि वास्तू अवशेष पहाता, हे मंदिर खूप जुने असल्याचं स्पष्ट होत. आजही दर महाशिवरात्री ला याठिकाणी खूप मोठा उत्सव आणि जत्रे चे आयोजन केले जाते अनेक भक्त श्रद्धेने या ठिकाणास भेट देत असतात.
बदलत्या काळानुसार आपल्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या विरगळ आणि सातीशीळा योग्य रित्या संवर्धन करून जपणे आवश्यक आहेत,म्हणजे येणाऱ्या पुढील पिढीला ही यांच्या माहितीतून प्रेरणा मिळत राहील यात शंका नाही.
अमृतेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर वर गेलेला डांबरी रस्ता देवघर कोंड या गावात जातो, वाटेत एका उंच टेकडीवर, श्री गुरुदेव दत्तांच छान मंदिर आहे, विशेष म्हणजे इथल्या टेकडी च्या मध्यभागी कातळावर गुरुदेव दत्तांच्या पावलांचे ठसे आहेत, या संदर्भात स्थानिक लोकांकडून काही कथा सांगितल्या जातात.
इसवी १४ व्या शतकपासून म्हसळा श्रीवर्धन मुरुड मिळून हबसाण प्रांत इत्यादी भाग अनेक वर्षे जंजिरेकर सिद्धी नवाब च्या ताब्यात असल्याने या विभागात हिंदू शैलीतिल वारसा सांगणा-या गोष्टी फारच कमी आढळतात,जे आहेत त्या अश्याच काही ठिकाणी अभ्यासा वाचून निपचित पडून आहेत,या ठिकाणी योग्य उत्खनन,अभ्यास केले असता अश्याच अनेक गोष्टी या जमिनीतून प्राप्त होतील हे निश्चितच,आज या विषयावर अभ्यास करणार्यांनी या ठिकाणाला नक्की भेट द्यावी,जेणेकरून आणि काही ऐतिहासिक बाबींचा उलगडा होऊ शकेल, त्याच प्रमाणे स्थानिक ग्रामस्थांनी येथील मंदिरांची योग्य काळजी घेऊन ते आजवर उत्तम जोपासले यात शंकाच नाही.
विरगळ आणि सतिशीळा यांच्या माहिती साठी मला श्री अनिल दुधाणे सर यांच्या मार्गदर्शनाची खूप मदत झाली.त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
माहिती संकलन :- प्रतिक भास्कर भायदे