महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,483

देवगिरी

By Discover Maharashtra Views: 4280 15 Min Read

देवगिरी

बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरी च्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचा समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लम-२ या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.पुढे सिघंण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली.पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले.मात्र, १२९६मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.

१२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली. अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवत नेली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स.१३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती.

सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.औरंगाबादपासून साधारण १५ किमीवर असलेला हा किल्ला देवगड किंवा धारागिरी ह्या नावांनी देखील ओळखला जातो. भारताच्या व विशेषकरुन दख्खनच्या इतिहासात ह्याला अढळ स्थान आहे. किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत.या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे.

सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘ कालाकोट ’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्‌द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. पायथ्यापासून साधारण १८० मीटर उंच अशा टेकडीवर चहूबाजूंनी तासलेल्या कातळाने हा संरक्षित केलेला आहे. मुख्य किल्ल्याला एका मोठ्या खंदकाने वेढले आहे व त्याला पार करण्यासाठी एका पुलाचा वापर करावा लागतो. त्यानंतर एका भीषण काळोख्या भुयारी मार्गाने जात आपल्याला माथ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या गाठता येतात. अतीशय अनगड असलेला हा किल्ला छुप्या वाटा, भला मोठा खंदक, भुयारी मार्ग, ताशीव कातळकडे ह्या सगळ्याचे एक उत्तम उदाहरणच होईल. त्याला मूळ सात तटबंद्या होत्या ज्यांचा परीघ चार किमीच्या वर भरेल. दुर्ग बांधणी शास्त्राचे हे एक अनोखे उदाहरण असल्याने प्रत्येकाने आवर्जून पाहावे असेच आहे.

आज आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो, त्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस खंदक खोदलेला दिसतो. हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने फिरवलेला आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. त्यावरुन आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो. या दोन तटबंदीमधील अंतर १०० फुटांपेक्षा जास्त असावे. याच्या मध्येच किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. याला अर्धा फुट लांबीचे खिळे बाहेरुन लावलेले आहेत. आतल्या बाजूस काटकोनात शिरल्यावर पहारेकर्यां च्या देवड्या आहेत. या द्वारातून आत शिरल्यावर आपण एका चौका सारख्या भागात येतो. हा चौक म्हणजे गडाचा दुसरा आणि पहिला दरवाजा यामधील जागा. या चौकात उजवीकडे पहारेकर्यां च्या ५ ते ६ खोल्या आहेत. त्यावर सध्या गाड्यांवर वर असणारी तोफ ठेवलेली आहे. समोरच्या काही खोल्यांमध्ये ‘सुतरनाळ ’ या प्रकारच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात. जर शत्रु या चौकात चुकुन आला तर तो संपूर्णपणे मार्यााच्या टप्प्यात येइल अशी सर्व योजना येथे केलेली दिसते.

दुसर्यां दरवाजाच्या पायथ्याशी गरुडाचे शिल्प आहे. या दरवाज्याला सुध्दा पहारेकर्यां च्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसर्याा प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आणि बाजूच्या तटबंदीवर जातो. येथून ज्या चौका मधून आपण आलो तो चौक दिसतो. समोरील तटबंदीपाशी काही शिल्पे ठेवलेली दिसतात. या अवशेषांवरुन आपण असा अंदाज करु शकतो की, ही सर्व शिल्पे मंदिराची असावीत आणि नंतरच्या काळात या सर्व शिल्पांचा तटबंदी, बुरुज याला लागणार्याअ दगडांसाठी करण्यात आला. किल्ला फिरत असतांना आपल्याला अनेक ठिकाणी असे शिल्प असणारे दगड तटांमध्ये, बुरुजांमध्ये बसविलेले आढळतात. हे पाहून झाले की किल्ल्याच्या दुसर्याु दरवाज्यातून आत शिरायचे. या दरवाजाच्या कमानीच्या बाजूला दोन पुरुषभर उंचीचे जोते आहेत.

समोर जैन मंदिरे आहेत, एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवी कडे एक वाट जाते. या वाटेत एक भली मोठी तोफ पडलेली दिसते. थोड्याच अंतरावर कमानी आणि विटांनी बांधलेली विहिर आहे.विहीरीत उतरण्यासाठी पायर्यांनची सुध्दा व्यवस्था केलेली दिसते. याच्या मागील बाजूस कमानींच्या काही इमारती आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी दरवाजापाशी यायचे आणि समोरची वाट धरायची. त्याच्या पुढच्या, म्हणजे तिसऱ्या दरवाजातून आत गेले की उजव्या हाताला काही अंतरावर एक ७० मीटर उंच मिनार दिसतो. त्याच्या पायाचा घेर साधारण साठ फुट भरेल. वरती जायला पायऱ्यांची वाट आहे व त्यामधे चार ठिकाणी मोकळी जागा आहे.काही इतिहासकारांच्या मते हा मिनार एका प्राचीन अवकाश वेधशाळेचा भाग आहे. इतर काही इतिहासकारांच्या मते चित्तोडच्या विजयस्तंभाप्रमाणे हा मिनार कुठल्यातरी लढाईतील विजयाचे प्रतीक आहे.

काही जणांच्या मते इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला. पण सबळ पुराव्यांअभावी ह्याच्या बांधकामाचे श्रेय कोणाचे आहे ते निश्चितपणे कळत नाही. सध्या या मनोर्यायमध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या मिनारच्या मागच्या बाजुस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे, मशिदी होत्या. काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा दिसते. यापैकी एका इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. इथे सुंदर बगीचा देखील बांधला आहे. मुख्य वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर उजवीकडे काही खोल्या दिसतात. या खोल्यांच्याच बरोबर विरुध्द दिशेला म्हणजेच मुख्य वाटेच्या डावीकडे काही पायर्याय आहेत. या पायर्या् चढून गेल्यावर समोर लांबी-३८ मी * रुंदी-३८ मी * खोली- ६६मी. असलेला हौद आहे. एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे. या हौदाच्या आकारावरुन संपूर्ण किल्ल्याची पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते. याला हत्ती तलाव नावाने ओळखतात.ह्या टाक्याला लागुन एक भारतमातेचे मंदिर आहे. या मंदिराकडे जाणार्याय वाटेवर अनेक शिल्पांचा खच पडल्याचे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने आहेत.या मंदिराच्या आत शिरल्यावर त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते. याच्या प्रांगणाचे छत गायब आहे. मात्र सर्व खांब शिल्लक आहेत. त्यावर कौले किंवा झापे घालून एखाद्या पडवीसारखे उतरते छप्पर घालत असावे.

एकंदर मंदिराच्या अवशेषांवरुन ते यादवकालीनच असावे असे वाटते. मंदिराच्या आत मध्ये ‘भारतमातेची’ भव्य मुर्ती आहे. आता हळूहळू मुख्य देवगिरी कडे वाटचाल करायला सुरुवात करतो. समोरची तटबंदी दिसते ती ‘कालाकोट’ ची. या तटबंदीला जाण्या अगोदर उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला डावीकडे ठेवत थोडे पुढे गेले की अनेक पडझड झालेल्या वास्तू नजरेस पडतात. कालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते, या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहे. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे याचे नाव ‘दिंडी दरवाजा’ याची लाकडी दारे अजुनही शिल्लक आहेत. पुढे पुन्हा पहारेकर्यांरच्या देवड्या, मग पायर्या् लागतात.

या सर्व पायर्याआ चढून गेल्यावर वर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो, याचे नाव ‘चिनीमहाल’. हा वाडा दुमजली असावा, असे त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदीखाना म्हणून केला गेला. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे, इथे आणखी एक वाडा आहे, याचे नाव ‘निजामशाही वाडा’. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुध्दा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्याद लेण्यांकडे जाते. या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत. लेणी पाहून पुन्हा निजामशाही राजवाड्यापाशी जाता येते. वाड्याच्या समोरच बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, हीचे नाव मेंढा तोफ. या तोफेची लांबी २३ फुट आहे ही तोफ चौफेर फिरवता येइल अशा पध्दतीने बसविलेली आहे. या तोफेवर असणार्याट लेखात तिला ‘किल्ला शिकन’ म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ म्हटलेले आहे. या तोफेच्या मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे याला मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज केवळ या तोफेसाठीच बनविलेला असावा असे वाटते. या बुरुजावरुन देवगिरी किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक दिसतो.

हा खंदक डोंगरातच कोरुन काढलेला आहे. याची रुंदी २० मी आहे. खंदक ओलांडून जाण्यासाठी पूलाचा वापर करावा लागतो. येथे सध्या दोन पूल आहेत. यापैकी एक जमिनीच्या पातळीवर लोखंडी पत्र्यापासून बनविलेला, तर दुसरा खाली दगडांचा बनविलेला. यापैकी दगडांचा पूल जुना आहे. खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी येथे दोन बंधारे सुध्दा बांधलेले आहेत. शत्रु किल्ल्याची अगोदरची अभ्येद्य तटबंदी फोडून पुलाजवळ आला की, बंधार्या.तून एवढे पाणी सोडण्यात येइ की तेव्हा हा दगडांचा पूल पाण्याखाली जात असे जेणेकरुन शत्रुला किल्ल्यात प्रवेश करता येत नसे. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा शेदोनशे फुट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार आहे. वाट एवढी निमूळती आहे की, दहा बाराच्या संख्येच्या वर येथे माणसे उभी सुध्दा राहू शकत नाहीत. येथून पुढे जाणारी वाट कातळातच खोदलेली आहे. वाट एका चौकात येऊन संपते.

समोर गुहे सारख्या अंधार्याद खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा ‘भुलभुलय्या किंवा अंधारी मार्ग. या भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार लेण्यासारखेच दिसते. या द्वारावर पुढे काही किर्तीमुखेही आहेत ह्याला दुर्गशास्त्रातील एक अभूतपूर्व चमत्कारच म्हणायला पाहिजे. ही अंधारी आपल्याला दोन भागात ओलांडावी लागते. पहिला भाग साधारण ६० फुट लांब आहे व दुसरा ५५ फुट लांब. पहिला भाग ओलांडायला आता एक पर्यायी पायऱ्यांची वाट केली आहे. दुसरा भाग मात्र जुन्या मार्गानेच ओलांडावा लागतो.अंधारीच्या ह्या भागात प्रकाशाविना जाणे जवळपास अशक्यच आहे. बाहेर प्रखर ऊन असतानाही इथे आतमधे डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही इतका अंधार असतो. हे कमी म्हणून की काय ह्या भुयाराला उजव्याबाजूचे वळण देऊन मधे मधे पायऱ्या व अडथळे घातले आहेत. काही ठिकाणी फसवे मार्ग खोदले आहेत. अशा ठिकाणी माणूस प्रकाशाच्या दिशेने जातो. पण ह्या फसव्या वाटा आक्रमकाला थेट खालच्या खंदकात पोहोचवतात.अंधारीच्या मधे एक उघडीप आहे. त्यातून आक्रमकांवर उकळते तेल, दगड व अशा इतर गोष्टी फेकल्या जात.

अगदी शेवटी ह्या अंधारीमधे गवत पेटवले जात असे. ह्यामुळे पूर्ण भुयारात गरम धूर साठून आतले सगळे लोक त्यानेच मरत.अंधारी ओलांडून माथ्यावर जाताना डाव्या हाताला एक छोटे गणेश मंदिर लागते.येथुन १५० पायर्याय चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात. मोघल सुभेदाराची राहण्याची ही जागा होती. इमारत खुप प्रशस्त आहे. डावीकडील जिन्याने वर गेले की इमारतीचा पहिला माळा लागतो. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्जा असे सर्व प्रकार पहावयास मिळतात. बारदरीच्या उजवीकडे एक दरवाजा आहे, तो आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या थोडे पुढे चालत गेल्यावर एक भला मोठा बुरुज लागतो. याच्या पोटात एक गुहा सुध्दा आहे. त्यात डावीकडच्या बाजूस जनार्दनस्वामींच्या पादुका आहेत. तर उजवीकडे कोपर्यायत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यावर लाकडात बसविलेली ‘काला पहाड’ नावाची तोफ सुध्दा आहे.

गुहेपासून सुमारे १०० पायर्या चढून गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर पोहचतो, यावर एक तोफ आहे. जिची लांबी २० फुट आहे. हीचे नाव दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ आहे. या बुरुजावरुन किल्ल्याचा संपूर्ण घेरा नजरेस पडतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. अनेक शाह्यांनी यावर राज्य केले, पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात.

राष्ट्रकुटांच्या वंशातल्या वल्लभ राजाने आठव्या शतकात हा गड बांधला असे म्हटले जाते. नंतर यादवकुलीन भिल्लम यादव ह्याने इथे त्याची राजधानी स्थापली. त्याच्याच वंशातला रामचंद्र यादव सिहासनावर असताना अल्लाउद्दीन खिलजीने सन १२९४ साली ह्यावर आक्रमण केले. त्याच्या मुलाने, म्हणजे शंकरदेवाने खिलजीला रोखून धरण्याचे खूप प्रयत्न केले. पण ते कामी न आल्याने रामचंद्रदेवाला खिलजीशी अत्यंत अपमानास्पद तह करावा लागला. त्यानंतर सन १३०७ व सन १३१२ मधे मलिक कफूरने ह्यावर आक्रमण केले. दोन्ही वेळेस पूर्ण परिसर धुळीस मिळवला गेला.पुन्हा चार वर्षांनी, म्हणजे सन १३१६ मधे कुतबुद्दीन मुबारक ह्याने देवगिरीवर तलवार उगारली. ह्यावेळी रामचंद्रदेवाचा जावई, हरपालदेव ह्याने त्या मुसलमानी वावटळीला थांबवायचा अयशस्वी यत्न केला. त्याची कातडी सोलून त्याच्या मृतदेहाला देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आले. किल्ला व्यवस्थित फिरण्यास सात आठ तास लागतात.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment