महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,318

ढाक बहीरी

Views: 3680
4 Min Read

ढाक बहीरी

लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाक बहीरी ya किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. या किल्ल्याची आपल्या सारख्या रानावनात हिंडणा-या मंडळीना ओळख करून दिली ती म्हणजे ‘गो. नी. दांडेकर’ यांनी. पुण्याहून मुंबईकडे जाताना खंडाळा स्थानक गेले की उजव्या हाताला राजमाचीनंतर हा किल्ला लगेच ओळखू येतो. समुद्रसपाटीपासून हा किल्ला साधारण ८८० मीटर उठावलेला आहे. एक मोठा कळकराय नावाचा सुळका व गडावर दुसरा छोटा सुळका ह्याची नेमकी ओळख पटवतो. कळकरायच्या सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहक इथे येतात..

ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा २) ढाकचा किल्ला.
१) बहिरीची गुहा-ढाक किल्ल्यावरील कातळाच्या पोटात ३ लेणी खोदलेली आहेत. या गुहेत जायला काळ्या कातळावरची एक अनगड वाट आहे. गडाचा डोंगर व कळकरायचा सुळका ह्यामधील अरुंद घळीतून आपल्याला खाली उतरुन जावे लागते. चार पाच फूट रुंदीच्या ह्या घळीतून सुटी माती असलेल्या वाटेने आपल्याला ८-१० मीटर खाली उतरावे लागते. उतरताना समोरील दरीचे भीषण दर्शन होत असते.ह्या घळीतून खाली उतरले की काळ्या कातळावरुन आपल्याला ४० मीटर अंतर कापावे लागतात. इथे पाय घसरला तर दरीमधे थेट २०० मीटर खाली निश्चित.

पुढचे ८-१० मीटर कातळात खोदलेल्या पकडींच्या आधारे वर जावे लागते. इथे एका झाडाचे खोड उखळीत बसवले आहे. त्याची वरची बाजू मोकळी असल्याने आपल्या वजनाने ते सहजपणे झुलते. त्याच्या छाटलेल्या फांद्यांचा आधार घेत आणखी ८-१० मीटर कापता येतात.जणु काही इतक्यावर भागले नाही म्हणून ह्यापुढे एका वेलीच्या आधारे आणखी १० मीटर वर जावे लागते.इतक्या अडथळ्यांना पार केल्यावर आपण बहिरीच्या गुहेत पोहोचतो. इथेच बहिरोबाचे मंदिर आहे. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. पाण्याची २ मोठी टाक आहेत. या टाक्यांमध्येच गावकऱ्यानी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. इथून आजूबाजूच्या निसर्गाचे घडणारे दर्शनही फार विलोभनीय आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे.

२) ढाकचा किल्ला :- ह्या गडावर फार काही उल्लेखनीय घटना झाल्याचे सापडत नाही. तरी ह्या गडाचे भौगोलिक ठिकाण अगदी मोक्याचे आहे. भोर घाटातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्याकरता ही उत्तम जागा आहे. शेजारीच राजमाचीसारखा मोठा व बलदंड किल्ला असल्याने ढाकचे महत्व कमी असावे.ढाकच्या किल्ल्यावर पोहचायचे असल्यास ‘वदप’ गाव गाठावे.गडावरच्या अगदी मोजक्या गोष्टींमुळे किल्ल्याची ओळख पटते.त्याचा काही भाग अजून उभा असला तरी तटबंदी बरीचशी पडली आहे. किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची दोन- तीन टाकी आणि एक मंदिर आहे.इतर गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत किंवा दाट झाडाझुडपात लपल्या आहेत. किल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. माथ्यावरुन भोवतालचा परिसर मात्र फारच मनोहर दिसतो. राजमाची, कोरीगड, माणिकगड, कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, भिमाशंकर, सिद्धगड व इतर काही ठिकाणे इथून दिसतात. या किल्ल्याच्याच नैसर्गिक तटबंदीच्या कातळात ‘गडदचा बहिरी’ लपून बसला आहे. याच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे.

गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment