महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,213

ढाकोबा

Views: 3871
4 Min Read

ढाकोबा –

सह्याद्रीतील गडकिल्ले फिरताना काही गिरीशिखरांना गड का म्हणावे असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. काही वेळेला त्या ठिकाणी असलेल्या एखाद-दुसऱ्या अवशेषावरून किंवा इतिहासातील ओझरत्या नोंदीवरून त्या गडाचे अस्तित्व सिद्ध होते तर काही वेळेला मात्र आपला प्रश्न अनुत्तरीतच रहातो. असाच एक अनुत्तरीत प्रश्न म्हणजे धाकोबा किल्ला. नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे दऱ्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी जुन्नर परिसरात दऱ्या घाटाच्या कडेवर माळशेज डोंगररांगेत या किल्ल्याची उभारणी केली गेली. घाटवाटांवर लक्ष ठेवणे हा या किल्ल्यांच्या उभारणीमागे मुख्य उद्देश होता असे सांगितले जाते पण ढाकोबा डोंगरावर गड असण्याचे कोणतेही अवशेष नसल्याने तसेच याचा इतिहासात कोठेही उल्लेख नसल्याने याला गड म्हणणे योग्य ठरणार नाही.

ढाकोबा हे फक्त गिरीशिखर आहे चुकीने त्याचा किल्ला म्हणून उल्लेख होतो. मुंबई-पुण्याहून इथे पोचण्यासाठी आंबोली हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. जुन्नर-आपटाळे-अंबोली हे अंतर साधारण २१ कि.मी आहे. जुन्नरहून अंबोलीला येण्यासाठी एसटीची सोय आहे. गावात शिरल्यावर समोरच ढाकोबा शिखराचा कातळमाथा आणि त्याच्या पोटात असणारी गुहा आपले लक्ष वेधुन घेते. गावातुन डोंगराच्या पायथ्याकडे जाताना वाटेत डाव्या बाजुला खडकात खोदलेला जुना पाणवठा दिसुन येतो. गावामागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गणपती मंदिरा मागुन एक वाट दऱ्या घाटाकडे जाते. या वाटेने थोडे चालल्यावर डावीकडे जाणारा फाटा फुटतो. या वाटेने काही अंतर पार केल्यावर वाटेत एक-दोन ठिकाणी खडकावर चढण्यासाठी खोबण्या कोरलेल्या दिसतात. या वाटेने दऱ्या घाट उजवीकडे ठेवून चालत राहील्यास थोड्याच वेळात एक नैसर्गीक गुहा दिसते. पावसाळ्यात गावकरी या गुहेचा वापर आपली जनावरे बांधण्यासाठी करतात. ढाकोबाची चढण चढून इथवर येण्यास एक तास लागतो तर ढाकोबाच्या पोटातल्या या गुहेपासून वर पठारावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

पठारावर आल्यावर डाव्या बाजूला एक साचपाण्याचा कोरडा तलाव दिसतो. या ठिकाणी दोन ठळक पायवाटा असुन त्यातील एक वाट डावीकडे धाकोबाच्या देवळाकडे जाते तर दुसरी वाट उजवीकडे थेट धाकोबाच्या पायथ्यालगत जाते. पायथ्याकडून ही वाट ज्या ठिकाणी खाली वळते तेथूनच एक वाट सरळ डोंगरावर म्हणजेच धाकोबावर जाते. आणि येथुनच डावीकडे डोंगरधारेवरून खाली उतरत धाकोबाच्या देवळाकडे जाते. हीच वाट पुढे दुर्ग किल्ल्याकडे जाते. येथून गडमाथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. ढाकोबाचा गडमाथा समुद्र सपाटीपासून ४१४८ फुट उंचावर आहे. ढाकोबा किल्ल्याची एक बाजू म्हणजे कोकणात उतरणारा सरळसोट कडा तर ढाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे दुर्ग. धाकोबा गडावर गड किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत मात्र टेहळणीसाठी यांचा उपयोग केला जात असावा. ढाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट, जीवधनची मागची बाजू दऱ्याघाट व पायथ्याशी असलेले उत्तर कोकण असा दूरवरचा परीसर दिसतो. धाकोबाच्या माथ्यावरून उतरल्यावर डाव्या बाजुची वाट खालील जंगलातुन डोंगरधारेवरून उतरत पठारावरील धाकोबाच्या देवळाकडे जाते.

धाकोबा मंदिर चौसोपी व कौलारू असुन आतील गाभाऱ्यावर लाकडी कोरीवकाम केलेले आहे. गाभाऱ्यात मुर्ती ऐवजी शेंदुर फासलेला तांदळा आहे. मंदीरासमोर एक लहानशी साधी दगडी दीपमाळ असुन समोरील भागात काही समाधी दगड, एक दगडी ढोणी व एक झीज झालेला नंदी उघड्यावर पडलेला आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक विहीर असुन त्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते त्यामुळे गडावर रात्री मुक्काम करायचा असल्यास हे मंदिर एकमेव ठिकाण आहे. मंदिर आवारात काही भग्न मुर्त्या असुन मंदिरामागील जंगलात दोन-तीन शेंदुर फासलेले दगड दिसतात. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास दिड तास लागतो.

कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे, त्यावर नजर ठेवणे. धाकोबा किल्ल्याचा उपयोग ही टेहळ्णीसाठी होत असावा. ठिकाण मोक्याचं असलं तरी इथं दुर्ग बांधलेला नाही. सह्याद्रीतील या शिखराला एकदा तरी भेट दयायला हवी.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment