धनुर्धारी श्रीराम मंदिर –
खुन्या मुरलीधर मंदिराकडून टिळक रस्त्याकडे जाताना, रस्त्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे. तर समोर पुणे विद्यार्थी गृहाची इमारत आहे. या इमारतीमध्ये समोरच धनुर्धारी श्रीराम मंदिर आहे. हि शाळा असल्यामुळे इथे मुक्त प्रवेश नाही.
प्रभु श्रीराम हे पुणे विद्यार्थी_ गृह या संस्थेचे आराध्यदैवत आहेत. श्री रामचंद्राच्या कृपेने श्री. के. वि. लिमये यांनी दिलेल्या देणगीतून या मंदिराचे बांधकाम झाले. मंदिरासमोरील असलेला सभामंडप ४४ x ३३ फूट लांबी-रुंदीचा असून, श्रीमती राधाबाई कृष्णाजी भिडे यांनी आपले पति कृ.ना. भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून १९४१ मध्ये बांधण्यात आला. मुख्य मंदिर १५x१०x१५ फूट लांबी, रुंदी, उंचीचे मंदिर असून मंदिराला २६ फूट उंच कळस आहे. त्या काळात मंदिर बांधण्यासाठी अंदाजे ३,२००/- रुपये खर्च आला. इ.स. १९३४ मध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. मूर्ती धनुर्धारी, संगमरवरी आणि पश्चिमाभिमुख आहे. मंदिरास प्रदक्षिणामार्ग आहे.
मंदिरातील या मूर्ती रामरक्षेतील ‘तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ’ या १७ व्या श्लोकाच्या आधारे पांडुरंग चिमाजी पाथरकर यांनी करून दिल्या. त्या वेळी १,०००/- रुपये खर्च आला. विद्यार्थ्यांच्या पुढे अशी विद्यार्थिदशेतील मूर्ती पाहिजे म्हणून विश्वामित्र ऋषींबरोबर यज्ञरक्षणासाठी निघालेल्या धनुर्धारी राम-लक्ष्मणाची मूर्ती स्थापन केली.
रामाच्या मूर्तीची उंची अंदाजे अडीच फूट असून, चार फूट उंचीच्या दगडी चौथऱ्यावर बसवलेल्या आहेत. रोज देवास पूजाअर्चा असते. रामनवमीच्या दिवशी सकाळी ११ ते १२.३० पर्यंत कीर्तन करून रामजन्म केला जातो. प्रसाद म्हणून सुंठवडाही दिला जातो.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता : https://goo.gl/maps/g7EBLtHdEXn3oMER8
आठवणी इतिहासाच्या