धार मंदिर समूह, लोणार, बुलढाणा –
गंगा भोगावती (धार) – गंगा भारतीयांचं आदरस्थान. जीवनदायीनी गंगा जेथेही वाहते तेथे आजुबाजुच्या प्रदेशाला “सुजलाम सुफलाम” करत फुलवित जाते. या मातेसमान प्रवित्र गंगेच्या ऋणातून ऊतराई होण कठीणच. माती, आकाश, जल, पशु यांची कृतज्ञता मानणारी आपली भारतीय संस्कृती म्हणुनच आपल्या पूर्वजांनी जेष्ठमासाच्या शुक्लपक्षात प्रथमतिथी एकमेपासुन ते दशमीपर्यत गंगेचे पूजन करण्याची प्रथा भारतात साजरी केल्या जाते.(धार मंदिर समूह)
लोणार सरोवराचे सौन्दर्य जिच्यामुळे आबादित आहे अशी ही गंगा भोगावती ( धार ) तीर्थ किंवा अखंड वाहणारी कपीला संगम तीर्थ, धारेचा ऊल्लेख “स्कंदपुराण”, “विदर्भाचा इतिहास” यामध्ये ही येतो.
छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक प्रसंगी लोणारच्या कपिलातिर्थाचे / धाराचे पाणी छत्रपतींच्या अभिषेकासाठी लोणार वरून नेण्यात आले होते. हा आमच्या लोणारच्या इतिहासात कोरलेला सुवर्णक्षण / अभिमाना चा क्षण आहे..
देवगिरी चे राजे क्रुष्णदेव व महानुभावाचे संत ‘चक्रधर स्वामी’ यांची प्रथम भेट येथे झाली याची नोंद ‘लीळाचरित्र’ मध्ये येते..
शुक्राचार्य शाळा मंदिराकडे असणाऱ्या खाचेतून वर चढले असता धार मंदिर समूह लागतो. वर्षाचे बाराही महिने येथील गोमुखातून पडणारी संतत धार हे या धारा मंदिराचे वैशिष्ठ. हेच गोडे पाणी पुढे विवराच्या पाण्याला जाऊन मिळते. धार पडणार्या कुंडाला “धार कुंड” किंवा गोमुख म्हटले जाते. बाजूलाच दुसरा कुंड आहे त्याला ब्रम्ह कुंड म्हटले जाते.
धारेसामोरील वडाच्या झाडाखालील जागा महानुभाव पंथीयांच्या चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली असल्याचे सांगण्यान येते. देवगिरीचे सम्राट कृष्णदेवराय यांचे गर्वहरण केल्याची कथा देखील लीळा चरित्रात दिलेली आहे.
सम्राट कृष्णदेवरायाने ओतलेल्या संपत्तीकडे ढुंकूनही न पहाता चक्रधरस्वामी मठात निघून गेले. या महापुरुषाचा हा निस्वार्थी पणा पाहून सम्राटाला आपली चूक उमगली आणि ते चक्रधर स्वामींना शरण गेले अशी ती कथा आहे. धार मंदिर समूहात शिव, विष्णू, गणपती, जगदंबा अशी काही मंदिर आहेत.
संदर्भ – वर्हाडाचा इतिहास (कै. या.मा. काळे)
माहिती साभार – डाॅ. वर्षा मिश्रा