महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,287

धारासूर मंदिर : कमनीय शिल्पांचा नजराना!

By Discover Maharashtra Views: 3898 2 Min Read

धारासूर मंदिर : कमनीय शिल्पांचा नजराना!

गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिर कमनीय शिल्पांचा नजराना असून मंदिराच्या बाह्यांगावरील सुरसुंदरींचे शिल्पांकन करतांना स्थपतींनी जणू कांही कलात्मकतेची मुक्त हस्ते उधळण करीत नवरस रूपस्वरुपिनी साकारल्या असे वाटते.!(धारासूर मंदिर)

चालूक्यकालिन शैलीच्या ११व्या शतकातील या मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे तर या मंदिराच्या समकालिन कुठल्याही मंदिराचे पंचभूम पध्दतीचे शिखर आज तरी अस्तित्त्वात राहिलेले नाही अपवाद आहे तो धारासूरचा…त्यामुळेच थोर इतिहास संशोधक डाॅ. गो.ब.देगलूरकरानी प्रकाशित केलेल्या “Temple architectur and sculpture of Maharashtra.” पुस्तकाच्या मुखपृष्ठावर या मंदिराला स्थान मिळालेले आहे..या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे मंदिराची रचना त्रीस्तर पध्दतीची असून  जमिनीपासून  १०फुट उंचीवर मंदिराचा मुलाधार आहे.एवढ्या उंचीवर बांधलेले हे मराठवाड्यातील एकमेव मंदिर असावे.

मंदिराच्या बाह्यांगावरील शिल्पांमध्ये विष्णूच्या पंचब्रह्म संकल्पनेतील श्रीधर,वामन, ऋषिकेश,  पद्मनाभ,दामोदर ही पाच शिल्प संध्यावंदनेतील क्रमानुसार पहायला मिळतात.शंख,चक्र,गदा,पद्म या विष्णू देवतेच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार  विष्णूची चतुर्विशती म्हणजे चोविस नांवे संभवतात.धारासूर मंदिराच्या अंकनभागावरील ३६शिल्पामध्ये विष्णूची पाच,मदन ,नृत्यगणेश व चामुण्डेचे  एकेक शिल्प वगळल्यास  २८ शिल्प सुरसूंदरींचे आहेत.साहित्यशास्त्रात सांगीतलेल्या नऊ रसां पैकी सहा रसांचा परिपोष या शिल्पांमध्ये पहायला मिळतो.नृत्य,गायन वादनाच्या उन्मादातील मृदंग वादक,तंतूवादक,वीणाधारी,बासरी वादक मर्दला,विरहकंठीता(पत्रलेखिका) पुत्रवल्लभा,शत्रुमर्दिनी,विषकन्या,  चामरधारीणी,भैरवी,आलसा,वसनभ्रमसा, डालमालिका,सिंहमर्दिनी,तोरणा,पद्मगंधा, दर्पना,आळतं म्हणजे  (मळवट) लावणारी सुंदरी  ,सर्पबंधा,कर्पुरमंजिरीचे शिल्प आहेत. एकूणच शिल्प शास्त्राला अनुसरून वरील स्त्री प्रतिमा अंकित केलेल्या दिसतात.

मंदिराच्या पुर्वेकडील मुखमंडपात दोन्हिबाजूस रुंद कक्षासन असून आरामखुर्चित  टेकून बसता येईल अशी आसनं व्यवस्था केलेली आहे.सभामंडपात  १२बाय १२आकाराची रंगशिळा असून बंदिस्त सभामंडपात हवा खेळती रहावी म्हणून जलवातायन(दगडी जाळ्या)बसवलेल्या आहेत.मंदिराचे वितान(छत) नउरंगी स्वरूपाचे दिसते.गर्भगृहद्वार पंचशाखांचे आहे. वैष्णवद्वारपाल,कीर्तीमुख, आहे.गाभा-यात सद्यस्थितीला शीवपिंड असली तरी या मंदिरातील केशवराज विष्णूची मुर्ती सुरक्षेच्या कारणाने नजिक एका मंदिरात ठेवण्यात आली आहे. केशवराजांची ही मुर्ती अतिशय देखणी लोभस असून त्यावर  दशावतार,अलंकार अतिशय रेखीव आहेत.

मुकूट,पादमुद्रिका,सुवर्णसुत्र,यज्ञोपवित, मेखला,उदरबंध,कटीबंध,चारी हातातील आयुधं अतिशय नजाकतीने कोरलेले आहेत.धारासूर येथील हे पुरातन वैभव  नष्ट होण्याच्या मार्गावर असून मंदिराच्या उत्तरेकडील कळसाचा भाग,मुखमंडप कोसळला असून गर्भगृह वगळता संपुर्ण सभामंडप एका बाजूस झुकला आहे.गावक-यांनी लाकडी टेकू(जिकन्या) देवून हा डोल-याचे संगोपन केले आहे.सभामंडपाच्या दगडी शीळा परस्परांवर रेलल्या आहेत.अतिवृष्टीत हे संबंध मंदिर कुठल्याही क्षणी जमिनदोस्त होवू शकते अशी भिती आहे…सदरील मंदिर राज्यपुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.

– श्रीकांतजी उमरीकर

Leave a Comment