महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,645

धर्मवेडे पोर्तुगीज भाग १

Views: 1358
5 Min Read

धर्मवेडे पोर्तुगीज भाग १ –

युरोपियन लोकांपैकी भारतात प्रथम प्रवेश करणारे पोर्तुगीज लोक, पोर्तुगीज भाषेत फिडलगी म्हणजे सभ्य गृहस्थ या त्यांच्या चमत्कारिक नावाचा अपभ्रंश करून भारतीय लोक त्यांना फिरंगी म्हणू लागले. पोर्तुगीजांपैकी प्रथम भारतात येणारा वास्को-डी-गामा, तो इ.स 1498 मध्ये पश्चिम किनाऱ्यावरील कालिकोट बंदरात आला, भारतात येताना वाटेत पोर्तुगीजांना जे देश लागले त्यांतील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची ठाणी पाहून त्यांनी ती जिंकून घेतली.(धर्मवेडे पोर्तुगीज)

इ.स 1504 मध्ये आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबार बंदरावर त्यांनी आपला अंमल बसविला, इ.स.1505 मध्ये मोझंबिक, किल्वा व सोफाला या तीन ठिकाणी त्यांनी किल्ले बांधले, त्यानंतर दोन वर्षांनी अरबस्तानातील मस्कतच्या (ओमान) सुलतानास त्यांनी शरण आणले इ.स.1506 मध्ये कोचीन घेऊन तेथे त्यांनी वखार बांधली व किल्ला बांधला, इ.स.1510 मध्ये त्यांनी गोवे घेतले व तिथून पुढे जाऊन इ.स.1511 मध्ये मलाक्का व इ.स.1518 मध्ये सिंहलद्वीपातील कोलोम्बो बंदर काबीज केले.

इ.स.1510 मध्ये गोव्यास पाय रोवल्यावर इ.स.1534 मध्ये मुंबई व वसई ही ठाणी व त्या भोवतालचा वांद्रे, ठाणे इत्यादी प्रदेश गुजरातचा सुभेदार बहादूरशहा याच्या कडून त्यांनी मिळविला. इ.स. 1535 मध्ये दीवे बेट घेऊन त्याची तटबंदी करण्यात आली व पुढे इ.स. 1559 मध्ये त्यांनी दमणही हस्तगत केले.

अशा रीतीने अर्ध्या शतकाच्या अवधीत पोर्तुगीजांनी आफ्रिका व आशिया या दोन खंडांत आपले हात-पाय पसरले, हा व्याप त्यांनी व्यापारासाठी वाढविला असला तरी व्यापारी ठाण्यावर आपली राजकीय सत्ता असल्याखेरीज व्यापार निर्धास्तपणे चालविता येणार नाही हे त्यांनी त्याच वेळी ओळखले होते.

आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून मलायापर्यंत अंतराअंतरावरील ठाणी घेण्यात व बंदरांची एक लांबच लांब साखळी गुंफण्यात त्यांचा स्पष्ट हेतू दिसत होता, तो असा की कोणतेही बंदर एकाकी व असहाय असे न राहता त्यांची प्रसंगविशेषी एकमेकास आरमाराची व सैन्याची मदत व्हावी, कारण त्या प्रत्येक ठिकाणी पोर्तुगीजांनी आरमार व सैन्य ठेवून आपल्या सत्तेस बळकटी आणली होती, इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या देशबांधवांना कार्यक्षेत्रही मिळवून दिले होते. इ.स.1517 साली चीन देशात जाऊन त्या देशाशीही ते व्यापार करू लागले म्हणजे समुद्रतीरावरील बहुतेक आशियाखंड त्यांनी व्यापले.

अलफान्सो अलबुकर्क याने इ.स.1510 मध्ये गोवे घेतले त्यापूर्वी ते विजापूरचा बादशहा आदिलशहा त्याच्या अमलाखाली होते. इ.स. 1569 पोर्तुगीजांनी 130 लढाऊ जहाजे व तिन हजार शिपाई यासह होनावर शहरावर स्वारी करून ते काबीज केले, गोव्याभोवतालचा अधिक प्रदेश जिंकून त्यांनी सासष्टी व बारदेश हे प्रांत आपल्या राज्यास जोडले. उत्तर कोकणातील चौल बंदर त्यांनी इ.स. 1508 मधेच घेतले होते, ते पूर्वी मूर्तजा निजामशहाचे असल्यामुळे ते परत घेण्याकरता निजामशहाने त्यावर इ.स. 1570 मध्ये 34 हजार घोडेस्वार, एक लक्ष पायदळ, 360 हत्ती व सत्तर तोफा यासह जबरदस्त हल्ला केला होता.

त्यानंतर उभयतात तह झाला त्यात राज्यरक्षणाच्या कामी एकमेकांनी एकमेकास साहाय्य करावे असे ठरले, हा तह बरीच वर्षे टिकला पण पुढे पुन्हा बेबनाव होऊन इ.स. 1592 मध्ये बुर्हाण निजामशहाने मोठ्या सैन्यानिशी चौलवर हल्ला केला, चौलचा किल्ला फिरंग्यांच्या तीन हजार सैनिकांनी लढविला व त्यांनी निजामशहाचा सेनापती फरहादखान याचे काही चालू दिले नाही, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की आदिलशहा, निजामशहा व गुजरातचा बहादूरशहा यांचे सामर्थ्य जमिनीवर केवढेही मोठे असले तरी जलचर असे फिरंगी त्यांना समुद्रावर फार भारी होते, त्यांच्या विरुद्ध आरमारी युद्ध करून त्यांना हरवण्या इतकी ताकद कोणाच्यात ही नव्हती. किंबहुना आफ्रिका व आशिया या दोन्हीही खंडात त्यांचा हात धरणारा कोणीही शासक नव्हता.

इ.स. 1570 अखेर पोर्तुगीजांच्या आशिया व आफ्रिका येथील सत्तेचा आराखडा घेतल्यास भारतात कालिकोट व कोचीन हे प्रांत होनावर, बर्सलोर (बसनूर), मंगळूर, काननूर ही कानडा प्रांतातील गावे व गावे, दाभोळ, चौल, मुंबई, करंजे, साष्टी बेट, वसई, ठाणे, माहीम, तारापूर इत्यादी ठिकाणे हे पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश त्यांनी संपादन केला होता, त्यापैकी बहुतेक ठिकाणी वखारी घालून तटबंदीही केली होती, पूर्व किनाऱ्यावरील चौलमंडल भागातील निगापट्टण,मच्छलीपट्टण व मलियापूर येथेही त्यांच्या वखारी होत्या, पश्चिमेस इराणी आखातात उर्मज व बसोरा यावर त्यांचा अमल होता, अरबस्तानात मस्कत आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर सोफाला, मोबिक व मोबासा ही बंदरे त्यांची होती, सिंहलद्वीपात व भारताच्या पूर्वेकडील बेटातही त्यांच्या वसाहती होत्या.

इतर काही परकीय शासकांप्रमाणे पोर्तुगीजांचाही मोठा दोष म्हणजे त्यांच धर्मवेड, आपला धर्म तेवढा चांगला व दुसऱ्यांचा वाईट अशी त्यांची अज्ञानमूलक समजूत होती, त्यांच्या या समजुतीमुळे त्यांच्या हातून अत्यंत निर्दयपणाची क्रूर व घोर कृत्ये घडली, पोर्तुगीज लोक भारतात व विशेषत: महाराष्ट्रात अप्रिय होण्यास व लोकमत त्यांच्या विरुद्ध बनण्यास त्यांची हीच जुलमी कृत्ये कारणीभूत ठरली.

क्रमश – धर्मवेडे पोर्तुगीज भाग एक.

विजय स.येडगे.
श्रीमानयोगी सेवा परिवार

धर्मवेडे पोर्तुगीज भाग २

Leave a Comment