शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी –
शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर अफझलखान वध, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, उंबरखिंडीतली लढाई म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी तलवार गाजवली त्या त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जितकी तलवार चालवली तितकीच किंवा त्यापेक्षा अंमळ जास्तच आपली मुत्सद्देगिरी वापरली. आग्र्याहून सुटका हे तर त्यातलं एक फार मोठं उदाहरण. शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी यातलीच एक अपरिचित गोष्ट आज मी आपल्याला सांगणार आहे.
हा लेख व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
१२ ऑगस्ट १६६६ ला प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची ‘मुस्तकिरुल खिलाफत अकबराबाद’ म्हणजे आग्र्याला भेट झाली. या भेटीआधी औरंगजेबाने शिवरायांचा अपमान करायचा फार प्रयत्न केला आणि ज्यावेळी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांकडून सतत मार खाणाऱ्या महाराजा जसवंतसिंगाला त्यांच्या पुढच्या रांगेत उभं असलेलं पाहिलं त्यावेळी त्यांच्या रागाचा ज्वालामुखी फुटला. महाराष्ट्राचा खरा स्वाभिमान त्या ठिकाणी प्रकटला. पुढचा प्रसंग उभ्या महाराष्ट्राला माहितेय. त्या दिवशीचा दरबार संपला.
दुसऱ्या दिवशी १३ मे १६६६ ला तीन लोकं औरंगजेबाला भेटले. एक होता जाफरखान दुसरा महाराजा जसवंतसिंग आणि तिसऱ्या एक ताई होत्या जहाँआरा बेगम. कोण होते हे सगळे आणि या सगळ्यांना शिवरायांनी औरंगजेबाचा अपमान केल्याचं दुःख झालं होतं का? तर तस अजिबात नाहीये वझीर जाफरखान याची बायको म्हणजे शाहिस्तेखानाची बहीण. अर्थातच बायकोने प्रेशर टाकलं म्हणून जाफरखान महाराजांची चुगली करायला औरंगजेबाकडे आला. आता जहाँआरा बेगमचं शिवरायांनी काय घोड मारलं होतं? तर या बाईंना सुरतेचं उत्पन्न मिळत असे आणि तीच सुरत शिवरायांनी तीन वर्षांपूर्वी लुटली होती म्हणून या बाईंच्या पोटात दुखत होतं. महाराजा जसवंतसिंगचा तिळाएव्हढा इगो दुखावला होता म्हणून तोही.
राजस्थानी रेकॊर्ड्सनुसार या तिघांशी बोलल्यानंतर औरंगजेबाने शिवरायांना कैद करायचं किंवा मारायचं असा निर्णय घेतला. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय? तर खरी गम्मत पुढेच आहे.
या नंतर बरोब्बर ६ दिवसांनी सभासद बखरीनुसार शिवाजी महाराज वझीर जाफरखानाला भेटले. जाफरखानाच्या बायकोची तर पारच तारांबळ उडाली. तिला सारखं वाटे जसं आपल्या भावाची बोटी मोडली तसं हा सीवा आता आपल्या नवऱ्यालाही मारून टाकणार. या भेटीत शिवरायांनी काय मुत्सद्देगिरी केली हे इतिहासाला ठाऊक नाही, पण दुसऱ्याच दिवशी वझीर जाफरखानाने शिवाजी महाराजांचा अर्ज औरंगजेबाकडे दिला. म्हणजे जो जाफरखान ६ दिवसांपूर्वी शिवरायांना मारून टाका सांगत होता तोच आज औरंगजेबाला त्याच शिवरायांचा अर्ज देत होता.
या नंतर १५-१६ दिवसांनी ५ जून १६६६ ला औरंगजेब दरबारात बसला होता तेव्हा राजस्थानी रेकॉर्ड्स नुसार एक हशम त्याच्या कडे तक्रार घेऊन आला आणि म्हणाला की शिवाजी महाराज आणि रामसिंगची माणसं सारखी आग्र्यात येतायत. या तक्रारीवरती औरंगजेब चिडला आणि त्याने सिद्दी फौलादला हुकूम दिला कि आत्ताच्या आता जा आणि शिवाजी महाराजांना पकडून मारून टाक. पुन्हा एकदा या १५-१६ दिवसात शिवाजी महाराजांनी काय जादूची कांडी फिरवली माहित नाही पण हे हुकूम औरंगजेबाने देताच त्याची मोठी बहीण जहाँआरा बेगम मध्येच बोलली आणि म्हणाली ‘कि मिर्झा राजे जयसिंग यांना तू सीवाच्या सलमातीचं वचन दिलयंस. ते आपले प्रामाणिक नोकर आहेत जर तू सीवाला मारलस तर त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल?’ गम्मत बघा हा हीच बाई २० दिवसांपूर्वी स्वतःच सांगत होती कि मारा त्या काफराला आणि आता हिला अचानक राजकीय शहाणपण आलं.
अर्थात ही शिवरायांची यशस्वी मुत्सद्देगिरी होती की त्यांनी औरंगरंजेबाच्या जवळच्या या दोन वजनदार व्यक्तिमत्वावरती आपली छाप पडली. मुत्सद्देगिरी करताना तुम्ही काय बोलता, कसं बोलता, काय मागता, कसं मागता अश्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या सर्वात अर्थातच मुत्सद्देगिरीत महाराज अतिशय निपुण होते. म्हणूनच शिवाजी माहाराजांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात.
शिवरायांचे कैसे बोलणे।
शिवरायांचे कैसे चालणे।
शिवरायांचे सलगी देणे।
कैसे असे।
धन्यवाद
संदर्भ:
१. राजस्थानी रेकॉर्ड्स
२. सभासद बखर
Suyog Shembekar