महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,393

ज्योतिबा फुले आणि शिवसमाधीचा शोध

By Discover Maharashtra Views: 1377 9 Min Read

ज्योतिबा फुले आणि शिवसमाधीचा शोध :- मागोवा

छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याचे काही प्रसारमाध्यमांनवर दाखविले जाते. ज्योतिबा फुले यांचा मृत्यू २८ नोहेंबर १८९० रोजी झाला. ज्योतिबा फुले यांच्या हयातीत ज्योतिबा फुले रायगडावर गेल्याचे कोणतेही समकालीन संदर्भ आढळून येत नाहीत. परंतु त्यांच्या मृत्यूपच्यात ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जावून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्याचे नमूद करण्यात आले. त्यासंबंधीची चिकित्सा सदर लेखात करण्याचा प्रयत्न.(ज्योतिबा फुले आणि शिवसमाधीचा शोध)

महात्मा ज्योतीराव फुले यांचा अल्प परीचय :- श्री. पंढरीनाथ सीताराम पाटील :
श्री. पंढरीनाथ सीताराम पाटील यांचा जन्म २० सप्टेम्बर १९०३ रोजी झाला. म्हणजे ज्योतिबा फुले यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी जन्म झाला. १९३८ रोजी महात्मा ज्योतीराव फुले यांचा अल्प परीचय नावाने ज्योतिबा फुले यांचे चरित्र लिहिले. म्हणजे ज्योतिबा फुले यांच्या मृत्युनंतर ४८ वर्षांनी चरित्र लिहिण्यात आले.

पंढरीनाथ पाटील लिहितात “ सन १९२७ ते १९३० पर्यंत सतत तीन वर्ष फिरलो. ज्योतीरावांचा ज्या संस्थांशी अथवा स्थळांशी प्रत्यक्ष संबंध आला होता ति सर्व प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन पहिली आणि ज्यांच्या आयुष्यात ज्योतीरावांना भेटण्याचा अथवा त्यांच्या कार्याविषयी अन्य तऱ्हेचा संबंध आला होता , त्यापैकी त्यावेळी हयात असलेल्या लोकांना भेटलो . तसेच महाराष्ट्रातील सर्व मोठ्या लायब्रऱ्या चाळल्या “ म्हणजे चरित्र लिहिताना लोकांनी ज्या काही घटना सांगितल्या त्यांचा आधार चरित्र लिहिताना घेण्यात आला.

सदर चरित्रात लेखक लिहितात “ सन १८६८ मध्ये ज्योतीबांनी रायगडास जावून शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि सन १८७० साली त्यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा रचून तो त्या साली छापून प्रसिद्ध केला.
वरील माहितीच्या आधारे सदर चरित्र हे ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर १३ वर्षांनी जन्मलेल्या व्यक्तीने ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर ४८ वर्षांनी लिहिले. त्यात लोकांनी सांगितलेल्या लोककथांचा आधार घेण्यात आला त्यामुळे हे चरित्र एखाद्या कादंबरीप्रमाणे लिहिले गेले असे अनुमान करता येते.

बहुजन समाजाचे शिल्पकार :- भाई माधवराव बागल :
भाई माधवराव बागल यांचा जन्म १८ मे १८९६ रोजी झाला. म्हणजे ज्योतिबा फुले यांच्या मृत्युनंतर ६ वर्षांनी जन्म झाला. १९६६ रोजी बहुजन समाजाचे शिल्पकार या पुस्तकात ज्योतिबा फुले रायगडावर गेले व त्यांनी शिवसमाधीचा शोध लावला व त्यासंबंधीची एक कथा प्रसिद्ध केली. म्हणजे ज्योतिबा फुले यांच्या मृत्युनंतर ७६ वर्षांनी चरित्र लिहिण्यात आले.

सदर चरित्रात ज्योतिबा फुले यांनी स्वलिखित रायगडावरील हकीकत पुढीलप्रमाणे नमूद करतात “ शिवस्मारकाची कल्पना फुल्यांची , पण हे किती जणांना माहित आहे ? फुलेच स्वतः लिहितात “ पुण्यास आलो व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाण्यास निघालो . समाधीची जागा शोधण्यात २/३ दिवस गेले . घाणेरी व इतर जंगली झुडपे कुऱ्हाडीने तोडीत रस्ता काढावा लागला. शिवजन्म उत्सव साजरा करावा, म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली. हि सर्व हकीकत तेथील ग्रामभटास कळताच तो वर आला.

“कुणबट शिवाजीच्या थडग्याचा देव केला. मी ग्रामजोशी असता दक्षिणा , शिधा देण्याचे राहिले बाजूला . केवढा माझा अपमान !. “ असे म्हणून त्याने लाथेने समाधीवरील फुले उधळून दिली. ‘ अरे कुणबटा ! तुझा शिवाजी काय देव होता, म्हणून त्याची पूजा केलीत ? तो शूद्रांचा राजा. त्याची मुंजसुधा झाली न्हवती”

“ मी रागाने वेडा झालो .ज्यांच्या जीवावर पेशव्यांना राज्य मिळाले त्या शिवप्रभुंची पूजासामुग्री ह्या भटभिक्षुकांनी पायातील पादत्राणे लाथाडावी काय ? मी संतापवायुने वेडा होऊन गेलो” त्यांचे स्मारक म्हणून मी अल्प काव्य केले आहे ते त्यांना समर्पण करतो. “ ( २७ मे १९३८ , दीनबंधू )

शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध :- इंद्रजीत सावंत
सदर घटनेविषयी इंद्रजीत सावंत त्यांच्या शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध या पुस्तकात लिहितात . “ महात्मा फुलेंच्या रायगड भेटीची माहिती भाई माधवराव बागल यांनी दिनबंधुंचा संदर्भ घेऊनच लिहिली आहे. पण दुर्दैवाने ज्या अंकात दीनबंधूकारांनी हि माहिती दिली तो अंक आम्हाला उपलब्ध झाला नाही. “

ज्योतिबा फुले लिखित छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा सन १८६९ रोजी प्रसिद्ध झाला. पोवाड्याच्या अर्पण पत्रिकेतील उल्लेख कैलासवासी रावबहादूर रामचंद्र बाळकृष्णजी राणे परमहंस सभेचे अध्यक्ष , कस्टम खात्याचे माजी असिस्टंट कमिशनर आणि मुंबईचे जस्टीस ऑफ दि पीस ह्याच्या स्मरणार्थ हा लहानसा पवाडा त्याच्या कर्त्याने परम प्रितीने व आदराने अर्पण केला असे. सदर अर्पण पत्रिकेत ज्योतिबा फुले कुठेही स्वतः रायगडावर गेल्याचे किंवा शिवसमाधीच्या शोधाबाबत नमूद करत नाहीत.
वरील सर्व संदर्भांचा अभ्यास करता

ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या हयातीत लिहिलेल्या लेखांचे , पोवाडा , नाटक , पत्रव्यवहारांचे , भाषणाचे संकलन ” महात्मा फुले समग्र वाड्मय” या नावाने महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी १९६९ साली प्रथम प्रकाशित आजपर्यंत केले आहे. या पुस्तकाच्या सुधारित आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. सध्या सदर पुस्तकाची सुधारित सहावी आवृत्ती २००६ साली प्रकाशित झाली.

भाई माधवराव बागल यांनी १९६६ रोजी बहुजन समाजाचे शिल्पकार या पुस्तकात दिलेला ज्योतिबा फुले यांच्या रायगडभेटीचा महत्वपूर्ण उल्लेख १९६९ रोजी म्हणजे तीन वर्षांनी प्रकाशित महात्मा फुले समग्र वाड्मय या पुस्तकात आजपर्यंत का आलेला नाही ? . दिनबंधुंचा हा तत्कालीन अंक आजपर्यंत कोणत्याही इतिहास संशोधकास उपलब्ध का झालेला नाही ? . मग भाई माधवराव बागल यांनी कोणत्या संदर्भ साधनाचा आधार घेत रायगड वर्णनाची कहाणी नमूद केली. त्यामुळे भाई माधवराव बागल यांच्या लिखाणातील सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहते.

रायगड यात्रा – दर्शन – माहिती :- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या १९५१ साली प्रकाशित रायगड या पुस्तकात लिहितात “ सुप्रसिद्ध मराठी नट कै. यशवंतराव टिपणीस यांचे वडील बंधू कै. तात्या टिपणीस कट्टर शिवभक्त सन १८९६-९७ साली टिळकांची शिवाजी उत्सवाची चळवळ चालू झाली असताना त्यांनी एके दिवशी तो समाधीचा चौथरा हुडकून उकरून बाहेर काढला आणि तेथे भगवा झेंडा फडकत ठेवला.
ज्योतिबा फुले यांचा मृत्यू १८९० साली झाला. सदर पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे तात्या टिपणीस यांनी शिवसमाधीचा शोध १८९६ साली लावला असे लिहित आहेत. म्हणजे ज्योतिबा फुले यांच्या मृत्युनंतर ६ वर्षांनी शिवसामाधीचा शोध लागला.
प्रबोधनकार ठाकरे , भाई माधवराव बागल , पंढरीनाथ सीताराम पाटील हे सर्व लेखक ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाशी निगडीत होते. परंतु प्रबोधनकार ठाकरे शिवसमाधीचा शोधाचे श्रेय ज्योतिबा फुले यांना न देता तात्या टिपणीस यांना देतात .

महात्मा ज्योतीराव फुले :- धनंजय कीर
धनंजय कीर यांनी १९६८ साली लिहिलेल्या महात्मा ज्योतीराव फुले या पुस्तकात ते लिहितात “ ज्योतीरावानी रायगड किल्याला भेट देवून शिवाजीमहाराजांच्या अष्टकोनी समाधीवरील पालापाचोळ्याचा ढीग दूर केला आणि स्वच्छ केली.”
धनंजय कीर १९६८ साली त्यांनी लिहिलेल्या ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात ज्योतिबा फुले रायगडावर गेल्याचे नमूद करतात परंतु १९६९ साली “ महात्मा फुले समग्र वाड्मय “ या नावाने प्रकाशित महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई , पुस्तकात सदर घटनेची नोंद का करत नाहीत ? प्रथम आवृत्तीचे संपादक धनंजय कीर आणि स.ग.मालशे .

रायगडास भेट देणाऱ्या व्यक्तींच्या समकालीन नोदी.

  • सन १८१८ साली रायगड इंग्रजयांच्या ताब्यात गेल्यानंतर सन १८१८ पासून ते सन १८८१ पर्यत रायगडास कोणीहि भेट दिल्याची नोंद आढळून येत नाही.
  • जेम्स डगल्स हा इंग्रज अधिकारी इ स १८८२ साली रायगडावर आला त्याने शिवसमाधीचा नक्षा करुन ठेवला. जेम्स डगल्सने १८८३ साली त्याच्या “A BOOK OF BOMBAY “ या पुस्तकात शिवसमाधीच्या दुरावस्थेबद्दल शिवरायांचे वंशज सातारा आणि कोल्हापूर गादि तसेच पुण्याचे पेशवे याना दोष दिला. जेम्स डगल्स त्याच्या पुस्तकात लिहितो “ कालपर्यंत एकाच इंग्लिश स्त्रीने रायगडचा प्रवास केला होता ’’ परंतु ती स्त्री कोण , ती कशासाठी आली होती हे मात्र स्पष्ट करत नाही.
  • ३ एप्रिल १८८५ साली गोविंदराव बाबाजी जोशी यांनी रायगडास भेट दिली व १ जून १८८५ साली “रायगड किल्याचे वर्णन ” नावाचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी समाधीच्या दुरावस्ते बाबत लिहिले
  • सन १८८५ साली मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल गडावर आले त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या एका इंग्रजी अधिकाऱ्याने “our travels in poona and deccon “ या पुस्तकात रायगड भेटीचे वर्णन केले.

वरील समकालीन नोंदीत कोणीही ज्योतिबा फुले रायगडावर शिवसमाधीच्या भेटीसाठी आल्याचे नमूद करत नाहीत.
ज्योतिबा फुले यांच्या मृत्युपच्यात साधारण ३५ वर्षांनी ज्योतिबा फुले रायगडावर गेले अश्या कथा समाजमाध्यमातुन पसरू लागल्या. भविष्यात या विषयी तत्कालीन संदर्भ उपलब्ध झाल्यास रायगडावरील शिवसमाधीच्या शोधाचे श्रेय ज्योतिबा फुले याना द्यावे लागेल परंतु तूर्तास तत्कालीन संदर्भाची जोड नसल्याने ज्योतिबा फुले यांच्या अनुयायांनी रचलेल्या लोककथा किंवा दंतकथा असे म्हणावे लागेल.

लेखन आणि संकलन :- श्री. नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :-
महात्मा ज्योतीराव फुले यांचा अल्प परीचय :- श्री. पंढरीनाथ सीताराम पाटील
भाई माधवरावजी बागल निवडक लेखसंग्रह
शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध :- इंद्रजीत सावंत
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकातून
महात्मा फुले समग्र वाड्मय आवृत्ती सहावी
छायाचित्र साभार गुगल

Leave a Comment