महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,861

श्रीकृष्णा नदीचे दिव्य आणि मौजे धोमची (वाई) पाटीलकी

By Discover Maharashtra Views: 1562 8 Min Read

श्रीकृष्णा नदीचे दिव्य आणि मौजे धोमची (वाई) पाटीलकी –

काही ऐतिहासिक संदर्भ अक्षरशः खिळवून ठेवतात.त्यांचा अर्थ लागेपर्यंत चैन पडू देत नाहीत.दुसऱ्या एका अभ्यासासाठी काही संदर्भ पहात होतो.त्यातच १६९७ मधला एक महजर हाती लागला.हा महजर तसा इतिहास अभ्यासकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.तो वाचता वाचता जवळ जवळ दोन तीन पिढ्या चालणारी एक गोष्ट किंवा एका खटल्याची गोष्ट समोर आली.हा महजर चांगला चोवीस ते पंचवीस पानांचा आहे.त्यामुळे तो वाचताना प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावताना मी स्वत: त्या खटल्याचा भाग आहे की काय असं क्षणभर का होईना वाटून गेलं.त्यातून हा महजर वाईशी संबंधित असल्यामुळे मी जास्तच खोलात शिरलो यात काही शंका नाही.संपूर्ण महजर इथं मांडणं शक्य नाही.पण तो खटला चालू असताना घडलेल्या घडामोडी किंवा त्या कागदपत्रांत नमूद केलेली घटना आणि त्यांचं ऐतिहासिक महत्त्व याविषयी नक्कीच लिहायचा प्रयत्न करतो.

न्यायव्यवस्था हा कुठल्याही राज्याचा एक प्रमुख भाग आहे.इतिहासाच्या निरनिराळ्या टप्य्यांवर या न्यायदानाची प्रक्रिया थोड्याफार फरकाने बदललेली आढळते.साधारण सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्रात न्यायदानासाठी गोत किंवा दिवाण या संज्ञा वापरल्या जात असत.गोत प्रणालीमध्ये परगण्याचे देशमुख,देशपांडे,वतनदार,मिरासदार,बारा बलुतेदार यांचा समावेश होता.तर दिवाण या प्रणालीमध्ये राजमंडळ,मोकाशी,मजालसी,हवालदार यांचा समावेश असे.गोतसभेसमोर एखादा वाद गेल्यावर दोन्ही पक्षकारांना हजर करत असत.एखाद्या ठराविक दिवशी न्यायसभा भरवून दोन्ही पक्षकारांकडून तकरीर किंवा करीना लिहून घेतल्या जात असत.गोतसभेने न्याय दिल्यानंतर दोघांकडूनही ‘राजीनामा’ अर्थात सभेने दिलेला निर्णय मान्य असल्याचे लिहून घेतले जात असे.जर दोन्ही पक्षकारांकडे पुरेसे पुरावे नसतील तर त्यांना निरनिराळ्या प्रकारची दिव्य करावी लागत.

रवादिव्य,अग्निदिव्य,चण्याचे दिव्य,वातीची क्रिया,नदीची क्रिया,सत्याची क्रिया हे त्या दिव्यांचे प्रकार.या दिव्यांमध्ये जो खरा उतरेल त्याच्या बाजूने निकाल देऊन गोतसभा महजर करून देत असे.महजर म्हणजे अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत केलेला कागद किंवा दस्तऐवज.यामध्ये वादाचा तपशील,साक्षीदारांच्या साक्षी,त्यांची नावे,गोतांनी दिलेला निर्णय या साऱ्यांची माहिती नमूद केलेली असे.यावर गोतांच्या सह्या,सरदार,देशमुखांचे शिक्के,राजांची मुद्रा हे सगळे उमटवले जात असे.या न्यायालयीन प्रक्रियेचे शुल्क म्हणून ज्याच्या बाजूने निकाल लागला आहे त्याला शेरणी भरावी लागत असे.आणि जो पक्षकार हरला आहे त्याला ‘गुन्हेगारी’ म्हणून काही रक्कम भरावी लागत असे.

असंच एकदा वाईजवळच्या धोमच्या पाटीलकीचा प्रश्न उभा राहिला.धोमचा मुकादम नरसोजी अम्बोला याने तक्रार नोंदवली की बाळाजी बारुहुकर याने कपटाने आपली पाटीलकी बळकावली आहे.धोम किंवा एकंदरीतच वाई प्रांत त्यावेळी चंदन-वंदन किल्ल्यांच्या अखत्यारीत येत होता.साहजिकच अम्बोला आणि बारुहुकर दोघांचे जुने दावे संबंधित अधिकाऱ्यांनी तपासले.नरसोजीचा आजा इंद्रोजी याच्या कारकिर्दीत हे प्रकरण पहिल्यांदा समोर आलं होतं.त्यावेळेस तानाजी बारुहुकर याने पाटीलकी आपली आहे असा दावा लावला.प्रसंगी पुराव्यांच्या कमतरतेपायी इंद्रोजीला दिव्य करावे लागले.यामध्ये इंद्रोजी खरा ठरला आणि त्याने पुढची चाळीस वर्ष पाटीलकी सांभाळली.इंद्रोजीच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा जानोजी अम्बोला पाटील झाला.दरम्यानच्या काळात वाई प्रांताचा सुभेदार म्हणून अफझलखानाची नेमणूक झालेली होती.मग तानाजी बारुहुकराचा मुलगा विठोजी याने अफझलखानाच्या हवालदाराला फूस लावून पाटीलकी दोघांमध्ये निम्मी निम्मी वाटून मिळावी असा दावा केला.खरी कथा इथे सुरु होते.या निम्म्या पाटीलकीला जानोजीने साफ नकार दिला.मग पुन्हा एकदा प्रश्न गोतसभेसमोर आला.

पुन्हा एकदा जानोजीला दिव्य करावे लागले.या दिव्यामध्येही जानोजी खरा ठरला.परंतु,विठोजीने अफझलखानाच्या हवालदाराला शंभर होन लाच देऊन हे दिव्य खोटे ठरवले.स्वत: हवालदाराने दिव्य खोटे ठरवले म्हणल्यावर त्याच्यापुढे प्रतिकार कुणीही केला नाही.साहजिकच ही गोष्ट जानोजीला मान्य नव्हती.म्हणून त्याने हवालदारासोबत भांडण काढले.रागारागाने हवालदाराने जानोजीला कैद केलं.पुढे अफझलखानाचा वध झाल्यानंतर त्याने ज्या लोकांना बंदिवान केलं होत त्यांना सोडून देण्यात आलं.यामध्ये जानोजीचीदेखील सुटका झाली.यावेळी जानोजीने पुन्हा पाटीलकीसाठी दावा मांडला.या दरम्यान दियानतराव वाई प्रांतात होता.दियानतराव एक आदिलशाही सरदार होता.त्याच्या कानी हे भांडण गेल्यावर पुन्हा एकदा गोतसभा भरवण्यात आली.

कागदपत्रांत आलेल्या उल्लेखावरून ही गोतसभा धोमच्या नृसिंहमंदिरात भरवण्यात आली.गोतसभा चालू असतानाच एक गाय तिथे आली आणि ती जानोजीला चाटू लागली.या घटनेवरून जानोजीला निर्दोष ठरवणार इतक्यात विठोजीने स्वत:च्या खास मंडळींना उभे करून ‘कृष्णादिव्य’ घेतो असं सांगितलं.कृष्णादिव्य हा नदीक्रियेचा एक प्रकार.म्हणजे नदीत उभं राहायचं आणि नदीची शपथ घेऊन आपण जे म्हणतो आहे ते खरं आहे असा दावा करायचा.गोतसभेने या दिव्याला परवानगी दिली.परंतु,दिव्य करणाऱ्या साक्षीदारांकडून ‘दसरात्री पंचरात्री’ लिहून घेतल्या.म्हणजे नदीच्या क्रियेचा परिणाम पुढच्या दहा/पंधरा दिवसांमध्ये जर नकारात्मक झाला तर ते साक्षीदार खोटे ठरणार.या खास मंडळींना विठोजीने उभं केलं होतं त्यामुळे त्यांचही म्हणणं होतं की,जानोजी अम्बोला मागीलवेळेस दिव्याला पात्र ठरला नव्हता म्हणून तो खोटं बोलतोय.महजरातील पुढच्या वर्णनानुसार ‘पाच जणांचे घरी खून होवूनु क्रिया लागली.’ म्हणजे त्या पाचही साक्षीदारांच्या घरी नंतरच्या पंधरा दिवसात काही ना काही नकारात्मक घटना घडली.याचा अर्थ पाचही साक्षीदार आणि विठोजी बारुहुकर खोटे ठरले.हाच मुद्दा घेऊन जानोजी पुन्हा गावच्या देश्मुखाकडे गेला.परंतु,त्याचे तोंडही विठोजीने गप्प केले असल्याने त्याने जानोजीस हाकलून लावले.जानोजी परांगदा झाला.या साऱ्याचा सूड म्हणून विठोजीने जानोजी अंबोल्याचा भाऊ आणि भावाचा जावई यांचा खून केला.

आता प्रकरण खूपच अटीतटीचं झालं होतं.मराठ्यांनी वाई पुन्हा एकदा जिंकून घेतलं.यावेळी मात्र दाद मागण्यासाठी जानोजीने थेट प्रतापगड गाठला.प्रतापगडावर किल्लेदार मोरोपंत पिंगळे होते.मोरोपंतांनी योग्य तो निवाडा करण्यासाठी गावच्या देशमुखांना आज्ञा केली.ज्या दिवशी थळपत्र देणार त्या दिवशी जानोजीच्या आईचा मृत्यू झाल्याने त्याला येता आले नाही.पुढचे एकवीस दिवस गोतसभेने वाट पहिली.पण जानोजी आला नाही म्हणून त्याला गैरहजर असं नमूद करण्यात आलं.थोडक्यात खटला hold वर ठेवला.त्या दिवशी द्यावयाचा महजर देशमुखाने स्वत:कडे ठेवला.दरम्यानच्या काळात बऱ्याच घटना घडलेल्या असू शकतात.परंतु,त्यांची फारशी कुठे नोंद दिसत नाही.या दरम्यान जानोजीचादेखील मृत्यु झालेला असावा कारण या घटनेनंतर थेट नरसोजी म्हणजे जानोजीचा मुलगा कागदपत्रे घेऊन पाटीलकी सिद्ध करण्यासाठी आलेला आहे.नरसोजीने दावा केला म्हणल्यावर पुन्हा एकदा गोतसभा भरवण्यात आली.परंतु,यावेळी दोन्ही पक्षकारांकडून ‘आम्ही खोटे ठरल्यास आमची गर्दन मारावी’  असे लिहून घेण्यात आले.

नव्याने नेमलेल्या गोतसभेने सर्व साक्षी पुरावे तपासले.यावेळी मात्र नरसोजीच्या बाजूने अनेक साक्षीदार उभे राहिलेले दिसतात.या सर्व साक्षीदारांनी कृष्णादिव्य केल्याची नोंद आहे.या साक्षीदारांमध्ये काही नावे इतिहासात अजरामर झालेली आहेत.यातील एक नाव म्हणजे ‘सर्जेराव जेधे’ अर्थात कान्होजी जेध्यांचे सुपुत्र.बाजी जेध्यांना म्हणजेच सर्जेराव जेध्यांकडे वाईजवळच्या वेलंग गावची देशमुखी होती.साहजिकच आसपासचे गावकरी,तिथले वाद विवाद याविषयी जेधे सर्वकाही जाणून होते.या वादाचा लवकर तोडगा निघावा म्हणून कदाचित जेधेंनी सर्व गोष्टी पारखून मध्यस्थी केलेली असू शकते.या दरम्यान वाईवर मुघलांची सत्ता येऊन पुन्हा रामचंद्रपंत अमात्यांनी वाई जिंकलेली होती असेच म्हणावे लागेल.आषाढात सुरु झालेला हा खटला श्रावणात निकालात काढू असं गोतसभा ठरवत असतानाच,ज्या झाडाखाली पक्षकार उभे होते त्या झाडावर वीज पडली.सुदैवाने कुणाला कुठली इजा झाली नाही.परंतु,झाडावर पडलेली वीज ही देवाची वाणी आहे असं मानून गोत मंडळींनी ताबडतोब निर्णय देण्याची तयारी दाखवली.इतक्या साऱ्या खटाटोपानंतर अखेरीस नरसोजीला न्याय मिळाला आणि मौजे धोमची पाटीलकी त्याच्या नावाने झाली.इतर मह्जरान्प्रमाणे या महजरातही शेवटच्या ओळींमध्ये शपथ दिली आहे. ‘नरसोजी बिन जानोजी अम्बोला याने लेकराचे लेकरी पटेलगी खाऊनु सुखरूप असावे.यास पेस्तर जो कुणी इस्कील करि त्या हिंदूस वाराणसीत गोहत्या केल्याचे शफत आहे आणि आणि मुसलमानास मकेत सोर मारिल्याचे.’ याचा अर्थ असा होतो की, ‘जानोजीचा मुलगा नरसोजी अम्बोला याने आपल्या वंशाजांसह पाटिलकी सांभाळावी.यावर जर कुणी पुन्हा विरोध करेल तर त्या हिंदूस वाराणसीला गोहत्या केल्याचे पातक लागेल आणि मुसलमानास मक्केला सुवर मारल्याचे पातक लागेल.’

ही झाली धोमच्या पाटीलकीची कथा.या महजरावर तारीख आहे ३१ जुलै १६९७.त्या काळातील अनेक गावांचा उल्लेख या कागदपत्रांत आहे जी गावे आजही वाई तालुक्यात आहेत.वेलंग,ओझर्डे,पसरणी,धोम,सिद्धनाथवाडी या गावांचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे.यावरून असं दिसतं की सिद्धनाथवाडी हा भाग त्यावेळी एक वेगळे गाव म्हणून प्रचलित होता.कालांतराने पेशवाईच्या काळात सिद्धनाथवाडी वाई कसब्यामध्ये समाविष्ट करण्यात आले.तत्कालीन समाजाच्या समजुती,श्रद्धा अशा अनेक गोष्टी यातून समोर येतात.आपण त्या वाचायच्या आणि इतिहासाची अजून कुठली पाने उलगडता येतील का हे पहात पुढे चालत राहायचं.

( खाली नमूद केलेल्या संदर्भ ग्रंथाव्यतिरिक्त या महजराचा कुठे उल्लेख आला असल्यास किंवा त्याविषयी कुणी काही लिहिले असल्यास वाचायला आवडेल.🙏🤗)

संदर्भ :
शिव-चरित्र-साहित्य – खंड १५. ( संपादक:अनुराधा कुलकर्णी,अजित पटवर्धन).
मराठी विश्वकोश.

फोटो – त्रिशुळेश्वर मंदिर,वाई.

©साभार आदित्य चौंडे.

Leave a Comment