डाॅ आंबेडकर विचारधारा –
‘जे झगडतात त्यानाच यश येते. नैराश्याचे युग संपले आहे. नवीन युगास आरंभ झाला आहे. तुम्ही राजकारण व निर्बंध करण्याची सत्ता यात भाग घेऊ शकल्यामुळे आता तुम्हास सर्व काही शक्य आहे….. तुमचा उद्धार करण्यास कोणीही येणार नाही. तुम्ही मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करण्यास तुम्हीच समर्थ व्हाल. यापुढे तुमचे भवितव्य फक्त राजकारणात आहे. दुसऱ्या कशातही नाही. पंढरपूर, त्र्यंबक, काशी, हरिद्वार वगैरे ठिकाणी यात्रा करून किंवा एकादशी, सोमवार वगैरे उपवास करून किंवा शनिमहात्म्य, शिवलीलामृत, गुरूचरित्र इ. पोथ्यांची पारायणे करून तुमचा उद्धार होणार नाही. तुमचे वाडवडील हजारो वर्षे या गोष्टी करीत आले तरीही तुमच्या शोचनीय स्थितीत एक तसूभर तरी फरक पडला आहे काय? तुमचा उद्धार करण्यास आता एकच मार्ग आहे व तो म्हणजे राजकारण. कायदा करण्याची शक्ती… जप, तप, पूजा-अर्चा करणे यावरील लक्ष काढून राजकारणाची कास धरा. तुमच्या उद्धाराचा हाच एकमेव मार्ग आहे. तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की, एखादा समाज जागृत, सुशिक्षीत व स्वाभिमानी असेल तरच त्याचे सामर्थ्य वाढेल…(डाॅ आंबेडकर विचारधारा)
संदर्भ –
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर-धनंजय कीर
पृष्ठ-२४३
मूकनायक-डाॅ.गंगाधर पानतावणे
पृष्ठ-३२-३३
“जगणे हाच काही जगातील पुरुषार्थ नव्हे. जगण्याच्या नाना परी आहेत. काकबळी खाऊन कावळेही पुष्कळ वर्षे जगतात, परंतु त्यांच्या जीवितात पुरुषार्थ आहे, असे कोणीही म्हणणार नाही. आज नाही उद्या, निदान शंभर वर्षांनी तरी मुत्यू हा कोणासच चुकत नाही. तर मग त्याबद्दल डर किंवा रड कशाला? हे शरीर बोलून चालून नाशवत. आत्म्याच्या कल्याणार्थ जे काही जगात करावयाचे असते, त्यास नाशिवंत मनुष्यदेह हेच काय ते एक साधन असल्यामुळे ‘सन्मानाम् सततं रक्षेत दारैरपि धनैरपि’ बायका, मुले किंवा संपत्ती यापेक्षा आपल्या स्वतःचे पहिल्याप्रथम रक्षण करावे, असे शास्त्रात सांगितले आहे खरे. तथापि हा दुर्लभ पण नाशिवंत मानवदेह खर्ची घालून यापेक्षाही अधिक शाश्वत अशी एखादी वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी उदाहरणार्थ, देशासाठी, सत्यासाठी, ब्रीदासाठी,व्रतासाठी, यशासाठी, अथवा भूतमात्रासाठी अनेक महापुरुषानी अनेक प्रसंगी कर्तव्याच्या अग्नीत आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे.
डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर
(बहिष्कृत भारत : २५ नोव्हेंबर १९२७)
मूकनायक-डाॅ.गंगाधर पानतावणे
पृ-४४-४५
Credit – मऱ्हाष्ट धर्म