महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,320

रोज एवढे मटण खातोय तरी कोण ?

By Discover Maharashtra Views: 1363 4 Min Read

रोज एवढे मटण खातोय तरी कोण ?

रायगडावरील वृद्ध खाटकाला पडलेला प्रश्न –

हा  प्रसंग आहे  शिवाजी  महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळचा. इंग्रज डॉक्टर आणि प्रवासी डॉ. जॉन फ्रायर याने हा प्रसंग आपल्या प्रवासवर्णनात लिहिला आहे. हेन्री ऑक्झिंडन , इतर इंग्रज प्रतिनिधींबरोबर राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झाला होता. या सर्वांचा मुक्काम रायगडावर असताना घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाचे वर्णन फ्रायरने  आपल्या प्रवास वर्णनात केले आहे . रोज एवढे मटण खातोय तरी कोण ? या मजेशीर प्रसंगाची हकीगत त्याच्याच  शब्दात ऐकू  !

” रायरी (रायगड ) वरील आमच्या  शिष्टमंडळाच्या मुक्कामादरम्यान घडलेला  एक  प्रसंग मी  येथे  सांगू  इच्छितो . इथल्या  लोकांचे  जेवण  अत्यंत  साधे  आहे आणि ते  तयार करण्यासाठी  फारसा खर्च देखील येत नाही. इथल्या लोकांचा परमोच्च आवडीचा पदार्थ  म्हणजे खिचडी ( फ्रायर  या  पदार्थाला  cutchery असे  म्हणतो ! )  हा खिचडी  नावाचा पदार्थ  तांदूळ आणि डाळ एकत्र  करून , हे मिश्रण  लोण्यामध्ये शिजवून तयार केला जातो. या खिचडीवरच  या लोकांचे देह पोसलेले असतात. परंतु आमच्या सारख्या तिन्हीत्रिकाळ मांस खाण्याची सवय असलेल्या इंग्रजांचा फार काळ पर्यंत मराठयांची ही खिचडी खाऊन निभाव लागणे अशक्य होते , त्यामुळे  आम्ही राजाला ( शिवाजी महाराजांना ) आमच्या समूहातील लोकांना पुरेल एवढे मांस रोज देण्याची विनंती केली. आमची ही विनंती मान्य करून शिवाजी महाराजांनी , गडावर  थोड्याफार प्रमाणात असलेल्या मुसलमानांसाठी (फ्रायर Moors असा शब्द वापरतो . Moors म्हणजे मुसलमान ) मांस पुरवणाऱ्या खाटकाला , आम्ही गडावर असे पर्यंत आम्हालाही  लागेल तेवढे बोकडाचे मांस (दुसऱ्या  कोणत्याही प्राण्याचे  मांस गडावर येत नसल्यामुळे ) पुरवत जावे अशी आज्ञा केली .

शिवाजी महाराजांच्या या आज्ञेप्रमाणे हा खाटीक आम्हाला रोज बोकडाचे मांस पुरवू लागला . आम्हाला प्रत्येक दिवसाला साधारण पणे अर्धा बोकड लागत असे . आमच्या या दररोजच्या मागणीमुळे या खाटकाचा धंदा फारच जोमाने चालू लागला ! त्याला या गोष्टीचे एवढे आश्चर्य वाटले की , ” एवढे मटण रोज खातंय तरी कोण ? ”  हे पाहण्याकरता वृद्ध असलेला हा खाटीक , गड चढण्याचे कष्ट  सोसून एके दिवशी आम्हाला पाहायला आला ! गेल्या काही वर्षात त्याच्याकडून इतके मांस कोणीच विकत घेतले नव्हते ! याचे कारण म्हणजे या प्रदेशातील लोक फारच  कवचित मांसाहार करतात; शिवाय हिंदू लोक ( फ्रायर येथे Gentiles असा शब्द वापरतो . Gentiles याचा अर्थ यहुदी नसलेले लोक असा होतो, सामान्यपणे इतिहासामध्ये हिंदूंना हा शब्द वापरतात ) अजिबातच मांस खात नाहीत आणि मुसलमान किंवा पोर्तुगीज लोक मांस चांगल्याप्रकारे उकडल्याशिवाय किंवा शिजवल्याशिवाय खात नाहीत . आपल्याप्रमाणे ( इंग्रजांप्रमाणे ) मांस फक्त भाजून असे क्वचितच कोणी खात असेल ! पण मला असे वाटते की मांस खाण्याची आपली ही पद्धत चुकीची आहे. खास करून या उष्ण देशामध्ये मांस नीट शिजवून खाल्ल्यास त्याचा पोटाला त्रास होणार नाही , परंतु आपला स्वभाव सतत धावपळ करण्याचा असल्यामुळे , आपण हे मांस शिजवण्याबीजावण्याच्या भानगडीत पडत नाही . पण माझ्या मते  आपली पोटं बिघडण्यामागचे हेच कारण असावे हे अनुभवी लोकांच्या लक्षात येईल !”

– डॉ जॉन फ्रायर

ता.क :- वरील वर्णन वाचून , त्या काळातील मराठे अजिबातच मांसाहार करत नसावेत असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे नाहीये. हिंदू लोक सुद्धा थोड्याफार प्रमाणात मांसाहार करत होते. पण युरोपियन माणसाच्या मांसाहार करण्याच्या तुलनेत हे प्रमाण अगदीच नगण्य होते.

संदर्भ :-

१) Travels in India in the Seventeenth Century :- Dr.John Fryer’s account of India

चित्रे :-

१) डॉक्टर जॉन फ्रायर

लेखक :-  सत्येन सुभाष वेलणकर, पुणे.

Leave a Comment