महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,14,546

द्रोणागिरी | Dronagiri Fort

By Discover Maharashtra Views: 4453 6 Min Read

द्रोणागिरी | Dronagiri Fort

प्राचीन काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांना माहित आहे. पौराणिक कथेनुसार राम-रावणाच्या युध्द काळात बाण लागून लक्ष्मण मूर्च्छित पडला असता लक्ष्मणावर उपचारासाठी संजीवनी नावाची जडीबुटी आणण्यासाठी हनुमानाने हिमालयाकडे उड्डाण केले. हनुमान हिमालयातील एक डोंगरच उचलून लंकेकडे जात असता वाटेत डोंगराचा एक कडा तुटून तो अरबी समुद्राच्या जवळ पडला तोच आजचा द्रोणागिरी होय अशी आख्यायिका आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट या महत्वाच्या बंदरामुळे उरण गाव देशाच्या इतर भागाशी जोडलेल आहे.

मुंबई, ठाणे, पनवेल येथून उरणसाठी एसटी बसेस आहेत. पनवेल – उरण हे अंतर ३० किमी आहे. उरण एसटी स्थानकाच्या समोर द्रोणागिरी डोंगर पसरलेला आहे. एसटी स्थानका समोरच्या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत गेल्यास १० मिनिटात आपण डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या घरांपाशी पोहोचतो. येथून किल्ल्याला जाणारी वाट आहे. येथे समोर डोंगरउतारावर ट्रान्सफॉंर्मर आहे त्याच्या दिशेने चालायला सुरवात केल्यास हि वाट प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते. या वाटेने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात आपण कुंपणापाशी पोहोचतो. कुंपण ओलांडल्यावर उजव्या बाजुच्या दाट झाडीतून हळूहळू चढत जाणाऱ्या वाटेने आपण डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर पोहोचतो. येथे डावीकडुन डोंगरावर चढायला सुरुवात केल्यावर साधारण १० मिनिटात आपण एका अवशेषांपाशी पोहोचतो. येथे बहुधा टेहळणीची चौकी असावी. येथुन १५ मिनिटे चढून गेल्यावर आपला तुटलेल्या तटबंदीतुन गडाच्या माचीवर प्रवेश होतो.

पायथ्यापासून येथवर येण्यासाठी साधारण एक तास लागतो. गड माथ्यावर प्रवेश केल्यावर गडाच्या दरवाजापासुन इथवर आलेली व तशीच पुढे गेलेली उध्वस्त तटबंदी दिसते. हि तटबंदी पाहुन पुढे जाताना उजवीकडे एका घराचे जोते तर डावीकडे पावसाळी साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. पुढे पोलिस चौकी असुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ओएनजीसी च्या प्लाण्टवर लक्ष ठेवण्यासाठी येथे कायम पोलिस असतात. पोलिस चौकीच्या बाहेरच्या कट्ट्यावरून समोर निळाशार अथांग पसरलेला समुद्र, उजव्या बाजूला नरीमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडीया, घारापूरी तर, डाव्या बाजूला रेवस, मांडवा, व त्यामागील खांदेरी व उंदेरी हे किल्ले दिसतात. हे पाहुन पुढच्या प्रवासाला निघायचं.

पोलिस चौकीच्या मागिल बाजूस बालेकिल्ल्याची तटबंदी असुन त्या तटबंदीत एक छोटे कमान असलेले बालेकिल्ल्याचे मागील प्रवेशव्दार आहे. येथुन बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस पोर्तुगिजांनी बांधलेले चर्च आहे. अशी अजून २ चर्च किल्ल्यावर होती पण आज ती आढळत नाहीत व कोठे होती हे देखील कळत नाही. चर्चकडे पाहिल्यावर त्याची पोर्तुगीजकालीन स्थापत्यशैली जाणवते. चर्चचे प्रवेशव्दार १२ फूट उंच असुन त्याला खिड्क्या व झरोके आहेत. चर्चच्या शेजारी वेगळीच रचना असलेली गागौणी व गिजोणी नावाची दोन पाण्याची बांधीव टाकी आहेत. या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या कमानी असुन या कमानींच्या वरच्या बाजूस आडव्या लाद्या बसवलेल्या आहेत. यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याची वाफ कमी होत असे व केर-कचरा पाण्यात पडत नसे पण आज मात्र टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.

बालेकिल्ल्याचा आकार चौकोनी असुन बालेकिल्ल्याच्या चारही टोकावर चार बुरुज आहेत तर दरवाज्यावर रणमंडळ रचना आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी दगड एकमेकांवर रचून बनवलेली असुन त्यात चुना वापरलेला नाही. रणमंडळाच्या उत्तराभिमुख दरवाजाची कमान व बाजूचे बुरुज उध्वस्त झालेले आहेत. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या असुन खालच्या बाजूस मुख्य प्रवेशव्दार आहे. या दरवाजाची कमान अर्धवट असुन एका बाजूचा बुरुज उध्वस्त झालेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवड्या सुस्थितीत असुन त्यातील उजव्या देवडीत गणपती कोरलेला दगड ठेवलेला आहे. कधीकाळी हा दगड प्रवेशव्दाराच्या मध्यभागी असावा.

कमानीचे दगड एकमेकांत गुंफून मध्यभागी हा दगड बसविला जातो. मुख्य प्रवेशव्दार पाहून झाल्यावर दरवाजाकडे पाठ करून पायऱ्याच्या वाटेने वर चढायला सुरुवात करावी. पायऱ्या संपल्यावर डावीकडे जाणारी वाट पकडावी. या वाटेने सरळ गेल्यावर समोरच्या डोंगरावर दाट झाडीत एक भगवा झेंडा दिसतो त्या दिशेने चालायला सुरुवात करावी. या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटात आपण वेताळ मंदिरापाशी पोहोचतो. येथे अडीच फूट उंचीचा शेंदुर फासलेला दगड असुन त्यावर पत्र्याची शेड आहे. वेताळ मंदिर पाहून त्याच्या मागील बाजुच्या पायवाटेने काही अंतर पुढे गेल्यास गडावरील दुसरा साचपाण्याचा तलाव नजरेस पडतो.

गडाचा माथ्यावरील पसारा बराच मोठा असला तरी इतरत्र झाडीमुळे कोणतेही अवशेष नजरेस पडत नाहीत. तलावापासुन आल्या वाटेने परत फिरावे. येथे आपले गडदर्शन पुर्ण होते. किल्ल्याचा आवाका फार मोठा नसल्याने १ तासात किल्ला पाहून होतो.

प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिध्द आहे. त्याकाळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती. तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता. सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे. घारापुरी या राजधानी पासुन जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे. द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता.

इ.स.१५३० मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही तीन चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. डाऊर नगर भागात झालेल्या वस्तीचा विस्तार प्रचंड प्रमाणात वाढत असून द्रोणागिरी डोंगर गिळंकृत करण्याचे काम सध्या सुरु आहे. अलिकडच्या काळात या ऐतिहासिक डोंगराला परप्रांतीयांचा विळखा पडला असल्याने येथील ऐतिहासिक वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment