महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,462

सदाशिवरावभाऊ पेशव्यांच्या तोतयाची विलक्षण हकीगत

By Discover Maharashtra Views: 1497 8 Min Read

१७७९ साली निर्माण झालेल्या सदाशिवरावभाऊ पेशव्यांच्या तोतयाची विलक्षण हकीगत –

पानिपतच्या युद्धाचा प्रत्यक्षदर्शी आणि शुजाउद्दौल्याच्या सेवेत असलेला पंडित काशीराज याने पानिपत युद्धाचा ‘आँखो देखा हाल’ फार्सी भाषेमध्ये ‘अहवाल-ए-जंग-ए भाऊ व अहमदशाह दुरानी” या नावाने लिहिला. या फार्सी ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद लेफ्टनंट कर्नल जेम्स ब्राऊन याने इ.स. १७९१ मध्ये केला. आपल्या या ग्रंथाच्या टीपांमध्ये लेफ्टनंट कर्नल ब्राऊन याने १७७९ साली निर्माण झालेल्या सदाशिवरावभाऊ पेशव्यांच्या तोतयाची एक विलक्षण हकीगत दिली आहे. ती पुढील प्रमाणे –

स्वतःची ओळख ‘सदाशिवराव भाऊ‘ अशी करून देणारा हा मनुष्य सर्वप्रथम इटावा येथे आला आणि त्याने लाला बालगोविंद नावाच्या एका व्यापाऱ्याला आपण ‘भाऊ’ असल्याचे सांगितले. हा लाला बालगोविंदचे खऱ्या सदाशिवरावभाऊंशी मित्रत्वाचे संबंध होते. भाऊ सारख्या दिसणाऱ्या या माणसाला पाहिल्यावर लाला बालगोविंद इतका विस्मयचकित झाला की हा खरा भाऊच असल्याची त्याची खात्री पटली आणि त्याने या भाऊंच्या तोतयाचा मोठा आदरसत्कार केला. भाऊंच्या या तोतयाचे दिसणे, त्याचे वय, इतकेच नव्हे तर त्याच्या अंगावरच्या खुणा देखील हुबेहूब भाऊंच्या अंगावरील खुणांप्रमाणे होत्या ! त्यामुळे हा भाऊच आहे अशी त्याला पाहणाऱ्यांची खात्री पटू लागली, परंतु तरीदेखील त्याचा स्वभाव आणि लकबी भाऊ सारख्या नसल्याने लोकांच्या मनात संशय उत्पन्न झाला.

लाला बालगोविंद याने हा संशय या तोतया भाऊसाहेबांपाशी बोलून दाखवताच त्याने बालगोविंदला सांगितले की, “पानिपतच्या युद्धानंतर शत्रूचा पाठलाग चुकवून मी जखमी अवस्थेत कुमांऊच्या पर्वतांमध्ये आश्रयाला गेलो आणि तिथे पाच वर्षं फकीरांच्या एका तांड्यात राहिलो. त्यांच्या बरोबर साधना आणि तपश्चर्या केली, त्यामुळे माझ्या स्वभावामध्ये आणि लकबींमध्ये बदल झाला असणे सहज शक्य आहे.” यानंतर तो काही काळ रोहीलखंडात राहिला आणि बैरागी फकिराच्या वेशात त्याने रोहीलखंडातील अनेक ठिकाणांना भेट दिली असे त्याने लाला बालगोविंद याला सांगितले. “या सर्व ठिकाणी भ्रमंती केल्यानंतर मी आता येथे आलो आहे आणि मी ‘भाऊ’ आहे हे जाहीर कसे करावे हे तू मला सांग. ” असे तो बालगोविंदला म्हणाला. त्याचे म्हणणे ऐकल्यावर लाला बालगोविंदला उत्तरला की, “सदाशिवराव भाऊंच्या ओळखीचे बरेच मराठी लोक बनारस येथे आहेत, तेव्हा तुम्ही प्रथम तिथे जावे हे उत्तम. ”

लाला बालगोविंदचा सल्ला ऐकून हे तोतया भाऊसाहेब बुंदेलखंडातील छत्रकोट येथे गेले आणि तिथून त्यांनी बनारस येथे असलेल्या मोरजी भट, रामचंद्र गोटकर आणि गणेश भट यांना भाऊंच्या ( म्हणजे स्वतःच्या ) नावाने पत्रे लिहिली आणि सांगितले की, “मी (म्हणजे भाऊ) छत्रकोट येथे आलो आहे तेव्हा तुम्ही ताबडतोब मला येथे येऊन भेटा. ”

तोतया भाऊसाहेबांचं हे पत्र मिळताच मोरजी भट, रामचंद्र गोटकरांचा मुलगा आणि भाऊंचा जुना नोकर असलेला गणेश भट हे तिघेही छत्रकोट येथे जाण्यासाठी निघाले. छत्रकोट येथे आल्यानंतर त्यांनी या तोतया भाऊसाहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली आणि नंतर ते आपल्या मुक्कामावर आले. दुसऱ्या दिवशी परत ते या तोतया भाऊसाहेबांना भेटायला गेले तेव्हा तोतया भाऊसाहेबांनी त्यांना सांगितले की, “मी पानिपतच्या युद्धापूर्वी तुमच्याकडे काही लक्ष रुपये ठेवायला दिले होते. आता मी भाऊ आहे हे सिद्ध करण्यासाठी मला जो खर्च करावा लागणार आहे त्यासाठी मला त्या पैशांची आवश्यकता आहे, तेव्हा तुम्ही त्यातले काही रुपये मला द्या.” त्याचे हे बोलणे ऐकल्यावर हे तिघे जण ताबडतोब तिथून उठून निघून गेले आणि हा खरा भाऊ नसून तोतया आहे हे ते सगळीकडे सांगू लागले. आपण तोतया आहोत असे हे सगळीकडे सांगतायत हे समजल्यावर या तोतया भाऊसाहेबांनी त्यांच्यावर कृतघ्न असल्याचा आरोप केला आणि, “मी बनारसला येऊन खरा भाऊ असल्याचे सिद्ध करेन” असे त्यांना सांगितले. या नंतर हे तिघेही बनरास येथे निघून आले.(सदाशिवरावभाऊ पेशव्यांच्या तोतयाची विलक्षण हकीगत)

तोतया भाऊसाहेब या तिघांचा पाठलाग करीत बनारस येथे पोहोचले आणि तिथे त्यांना “खरे भाऊ” मानणाऱ्या धोंडो भट याच्या घरी ते उतरले. या ठिकाणी अनेक मराठी लोक आणि गावातील श्रेष्ठी त्यांना पाहायला जमले. या सर्वांनी त्यांना बघितल्यावर हेच खरे भाऊसाहेब आहेत याची या लोकांना इतकी खात्री पटली की त्यांनी या तोतया भाऊसाहेबांना मोठमोठ्या रकमा कर्ज म्हणून दिल्या ! काही मराठ्यांनी तर हेच खरे भाऊसाहेब आहेत याची खात्री पटून त्यांच्यासोबत भोजन देखील केले ! खऱ्या भाऊसाहेबांनी शहरातील चार-पाच प्रमुख व्यापाऱ्यांना आपण काही रक्कम दिली होती असे या तोतया भाऊसाहेबांचे म्हणणे होते, ते मात्र त्यांना भेटायला आले नाहीत. हे समजल्यावर तोतया भाऊसाहेब इतके चिडले की त्यांनी मोरजी भट, रामचंद्र गोटकर आणि गणेश भट यांना निरोप पाठवला की, “तुम्ही बऱ्या बोलाने माझे पैसे दिले नाहीत तर मी बळाचा वापर करून ते तुमच्याकडून वसूल करेन !” असे म्हणून त्यांनी गावात सैन्य म्हणून माणसं जमवायला सुरवात केली. स्वतः करता एक पालखी आणि दोन-चार घोडी देखील त्यांनी मिळवली आणि हा सगळा सरंजाम घेऊन ते आपल्या ऋणकोंच्या दारात जाऊन दहशत माजवू लागले. हे तोतया भाऊसाहेब एके दिवशी आपल्याला उचलून नेतील की काय अशी भीती त्यांच्या ऋणकोंमध्ये पसरली.

यावेळी थॉमस ग्रॅहम हा इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या तर्फे बनारस येथे रेसिडेंट होता. त्याने बनारस मधील अनेक लोकांकडे हा माणूस खरा भाऊ आहे किंवा कसे ? याची चौकशी केली, तेव्हा त्या लोकांनी हा खरा भाऊ नसून, निश्चितपणे त्याचा तोतया आहे असा अभिप्राय दिला. तोतया भाऊंबद्दलची ही चौकशी चालू असताना, तोतया भाऊला खरा भाऊ म्हणून मान्यता देणाऱ्या धोंडो भटाची आणि त्याला ज्याने अनेकदा पैसे पाठवले होते त्या राजा चेतसिंगाची काही तरी गुप्त बोलणी सुरु आहेत हे ग्रॅहमच्या लक्षात आले. ग्रॅहमला त्या जिल्ह्याच्या राजकारणातल्या अनेक भानगडी माहिती होत्या आणि त्या उघड होऊ नयेत असे चेतसिंग याला वाटत असल्याने ग्रॅहम त्याच्या डोळ्यात खुपत असे. या निमित्ताने आपला काटा काढायचा चेतसिंगाचा डाव असावा आणि याचसाठी त्याची धोंडोभटाशी गुप्त बोलणी सुरु असावीत असा संशय ग्रॅहमला आला, त्यामुळे ग्रॅहमने चेतसिंगाला या तोतया भाऊशी त्याचा काय संबध आहे याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले. त्यावर चेतसिंगाने , ” मला या प्रकरणाबाबत काहीही माहिती नाही, तुम्ही स्वतःच त्याला (म्हणजे तोतया भाऊला) समक्ष बोलावून त्याची चौकशी का नाही करत?” असे उत्तर त्याला दिले. त्यावर ग्रॅहमने एकदा तोतया भाऊला बोलावणे पाठवले, परंतु हा आपला अपमान आहे असे सांगून तोतया भाऊ त्याला भेटण्यास गेला नाही.

तोतया भाऊ आपले ऐकत नाही हे पाहून ग्रॅहमने त्या परिसराचा कारभार पाहणाऱ्या चेतसिंगाला याबाबत सांगून त्याची मदत मागितली. यावर चेतसिंगाने बनारसच्या अमीर आणि कोतवाला सोबत काही शिपाई पाठवून तोतया भाऊला अटक केली आणि त्याला ग्रॅहम समोर हजर केले. ग्रॅहमने त्याला काही प्रश्न विचारले ज्याची उत्तरं तो (म्हणजे तोतया भाऊ) समाधानकारकरित्या देऊ शकला नाही त्यामुळे तो तोतया आहे याची खात्री ग्रॅहमला पटली.

हा तोतया भाऊ बराच काळ बनारस येथील अमीनाच्या कचेरीत कैदी म्हणून होता. पुढे त्याला चुनारगढ येथे हलवण्यात आले. पुढे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स चुनारगढ येथे असताना या तोतया भाऊला भेटला आणि त्याची हकीगत ऐकल्यावर त्याला सोडून देण्याचे आदेश दिले. पुढे हा भाऊ बनारस येथे परत आला आणि लवकरच तेथे मरण पावला.

आता येथे विशेष सांगण्यासारखी गोष्ट ही की ज्याने पानिपतची लढाई प्रत्यक्ष पहिली होती आणि खऱ्या भाऊला आणि मेल्यानंतर त्याचे शव देखील पाहिले होते तो काशीराज पंडित तेव्हा जिवंत होता आणि लाला बालगोविंद प्रमाणे तो देखील या तोतया भाऊला बघायला आला होता. त्याला बघितल्यावर काशीराजाने अभिप्राय दिला :-

” हा हुबेहूब खऱ्या भाउप्रमाणे दिसतो आणि याच्या अंगावरच्या खुणा देखील मी भाऊच्या अंगावर पाहिलेल्या खुणांशी तंतोतंत जुळतात. परंतु याचा स्वभाव आणि लकबी मात्र खऱ्या भाऊंपेक्षा वेगळ्या आहेत !”

संदर्भ

१) An Account of the Battle of Paniput, and of the events
leading to it.—Written in Perfian by Ca’si Raja Pundit,
who was prejent at the Battle* – English Translation by Lieutanant Colonel James Brown

सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a Comment