महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,735

दुर्गाडी आणि नीरबावी

Views: 1375
4 Min Read

दुर्गाडी आणि नीरबावी –

ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात. तसेही ऋषिमुनी आता शोधूनही सापडत नाहीत, पण नदीचे मूळ शोधण्यातली मजा काही वेगळीच असते. थंडीचे आगमन होऊ लागले की भटक्यांना वेध लागतात ते नवनवीन ठिकाणी जाण्याचे. थंडीच्या पहाटे निघून भोर वरंध परिसरात भटकंती करावी. हिरडस मावळाचा हा सगळा प्रदेश. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आणि निसर्गतः तेवढ्याच समृद्ध अशा या हिरडस मावळात कधीही आणि कुठेही हिंडायला नेहमीच आनंद मिळतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी सर्वबाजूंनी वेढलेला असा हा सगळा प्रदेश. या सगळ्याच्या मधून वळणे घेत नीरा नदी वहात असते. तिचे सान्निध्य आणि आजूबाजूचे डोंगर आपला सगळा प्रवास रमणीय करतात. दरवेळी वरंध घाटात जाताना डावीकडे एक डोंगर नेहमी खुणावत असतो. दुर्गाडी त्याचे नाव. त्यावर असलेले एक मंदिर आणि त्यावरचा झेंडा रस्त्यावरूनही स्पष्ट दिसत असतो.(दुर्गाडी आणि नीरबावी)

पुण्याहून भोरमार्गे हिर्डोशी हे अंतर अंदाजे ७५ कि.मी. इतके भरते. हिर्डोशीच्या पुढे १४ कि.मी. गेले की शिरगाव येते. गाव काहीसे पुढे आहे पण डावीकडून एक रस्ता येऊन इथे मुख्य रस्त्याला मिळतो. हाच तो दुर्गाडी फाटा. इथून डावीकडे वळल्यावर जेमतेम दीड कि.मी. वर डाव्या हाताला एक सुंदर छोटेखानी मंदिर दिसते. परिसर अत्यंत रम्य. एका बाजूने नीरा वाहते. मंदिराला समोर मंडप घातला आहे. आवारात काही वीरगळ, काही थडी पडलेली. जननीचे देऊळ असे ग्रामस्थ सांगतात. मंदिरात एक देवीची मूर्ती आणि बाजूला अशाच काही इतर मूर्ती. या मंदिरापाशी गाडी लावायला भरपूर जागा. मंदिराच्या समोरच रस्ता ओलांडला की एक पायवाट डोंगरावर चढते.

ही वाट दाट रानातून उंचउंच चढत जाते. वाटेत सोनकी सारख्या फुलांचे गालिचे सर्वत्र पांघरलेले दिसतात. दरीच्या उजवीकडे पिंपळवाडीच्या मंगळगडाचे सुंदर दर्शन होते. ही वाट अशीच सरळ जाऊन एका कड्याच्या पायथ्याशी येते. इथे छोटेसे बहिरीचे ठाणे आहे. तिथून एकदम अंगावरची चढण चढून गेल्यावर आपण माथ्यावर पोचतो. समोरच देवीचे सुंदर मंदिर आणि त्याच्या समोरची पडवी आपले स्वागत करते. मंदिरात सिंहावर बसलेल्या अष्टभुजा देवीची देखणी मूर्ती. भन्नाट वारा सुटलेला, आणि इथून दिसणारा आसमंत केवळ अप्रतिम. तोरणा, राजगड, मंगळगड, तिकडे लांब मकरंदगड, कावळ्या किल्ला आणि कोकणाचा नजरा आपली नजर खिळवून ठेवतो. मंदिरापासून एक पायवाट माथ्यावर जाते. पण माथ्यावर काहीच अवशेष नाहीत. मंदिराच्या खालच्या अंगाला खांब असलेले पाण्याचे मोठे टाके आहे.

दुर्गाडीचे नयनरम्य दर्शन झाल्यावर वेध लागतात ते नीरा नदीचे मूळ बघायचे. दुर्गाडीवरून खाली उतरले की मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळायचे. लगेच १ कि.मी. वर शिरगाव लागते. गावात आत गेल्यागेल्या एक मोठे घर दिसते. या घराच्या मागे असलेल्या शेतातून एक पायवाट जंगलात जाते. त्या वाटेने चालू लागल्यावर ती वाट पुन्हा एका टेकडावर चढते. वरंध मार्गावरच्या वाहनांचे आवाज अगदी जवळ ऐकू येऊ लागतात. एक ओढा आपल्याला आडवा जातो.मग वाट एका खोलगट भागात उतरते आणि समोर दिसते दगडामध्ये बांधलेले सुंदर कुंड. कुंडाला आत उतरण्यासाठी ८ पायऱ्या केलेल्या आहेत. आत निवळशंख पाणी नजरेस पडते. हीच ती नीरबावी ! नीरा नदी या कुंडातूनच उगम पावते. कुंडाला एका अंगाला गोमुख केलेले असून त्यातून पाण्याचा प्रवाह अव्याहत वहात असतो. आजूबाजूला गर्द झाडी आणि नीरव शांतता. इथे मंदिर मात्र नाही याचे आश्चर्य वाटते. पण हा परिसर अत्यंत रमणीय. इथून पाय काही निघत नाही.

आशुतोष बापट

Leave a Comment