महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,47,869

दुर्गाडी

By Discover Maharashtra Views: 4813 5 Min Read

दुर्गाडी.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या शहरातील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनी मराठा साम्राज्यातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटातुन वाहत येणारी काळ नदी या उपनदया येऊन मिळतात. या खाडीला भरपुर पाणी असल्याने पुर्वीच्या काळी या खाडीतुन मोठी गलबते सहजरीत्या ये-जा करत असत. याच उल्हास खाडीकिनारी कल्याण बंदर व शहर वसलेले आहे. कल्याण स्थानकात उतरुन बसने अथवा खाजगी वाहनाने १५ मिनीटात दुर्गाडी किल्ल्यावर जाता येते.

खाडीकडून कल्याण शहरात शिरताना शहराच्या प्रवेशद्वारावरच शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला दुर्गाडी किल्ला खाडी किनारी लहानशा टेकडीवर उभा आहे. किल्ल्याकडे जाताना अलीकडील चौकात असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपले लक्ष वेधुन घेतो. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले असुन त्याला लागुन असलेले बुरुज मात्र शिल्लक आहेत. या बुरुजात गणेशाची लहानशी संगमरवरी मुर्ती असुन हा दरवाजा गणेश दरवाजा म्हणुन ओळखला जातो. गणेश दरवाजाच्या डाव्या बाजुने जाणारी वाट टेहळणी बुरुजाकडे जाते तर उजव्या बाजूची वाट वर दुर्गादेवी मंदिरात जाते. टेहळणी बुरुजाकडून गडाच्या मागील भागात जाता येते पण तेथे जाण्यास मनाई आहे.

दुर्गादेवीचे मंदिर लहानसे असुन त्याचा जिर्णोध्दार पेशवे काळात कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला. मंदिरात देवीची ३ फुट उंचीची नवीन मुर्ती असुन देवीचा जुना तांदळा त्याच मूर्तीच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. मंदिराचा गाभारा छोटासा असुन कळस गोल घुमटाकार आहे. मंदिराच्या मागील बाजुस इदगाह असुन तेथे जाण्यास मागील बाजुने पायऱ्या आहेत पण सध्या येथे जाण्यास मनाई आहे. याखेरीज खाडीच्या बाजुला दोन मोठे भग्न बुरुज व थोडे तटबंदीचे अवशेष आहेत. गडावरील इतर अवशेष काळाच्या ओघात लुप्त झालेले असुन गडसंवर्धनासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न पहायला मिळतो. गडाला रस्त्याच्या बाजुने फेरी मारली असता तटबंदीत असणारे जुने घडीव दगड व त्यावर नव्याने केलेले बांधकाम तसेच जुन्या खाडीपुलावरून किल्ल्याची खाडीकडील बाजु पाहता येते. दुर्गाडी किल्ला व परिसर पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे.

सातवाहन काळात कल्याण बंदर म्हणुन प्रसिद्ध होते. मध्यपुर्व आशिया खंडात रोमपर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरात येणारे सामान तेथुन नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच पैठणकडे रवाना होत असे. अहमदनगरच्या निजामशाही अस्तानंतर हा भाग विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात आला. आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा २४ ऑक्टोबर इ.स.१६५७ मध्ये दिवाळी वसुबारसच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. यावेळी कल्याण शहराला संरक्षणासाठी भक्कम तटबंदी, ११ बुरुज व अनेक दरवाजे होते. ज्याचा गड त्याची जमीन’ आणि ज्याचे प्रबळ आरमार त्याचा समुद्र हा मंत्र महाराजांनी जाणला होता. कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबर जमिनीप्रमाणे समुद्रमार्गेही शत्रु आपल्यावर चाल करुन येऊ शकतो या जाणिवेतुन शिवाजी महाराजांनी आबाजी महादेवांना कल्याणच्या भुईकोटा शेजारी खाडीकिनारी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खणत असताना अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाले ही दुर्गादेवीची कृपा समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले. या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली. या कामाकरीता दुप्पट मोबदला देऊन पोर्तुगीजांचे सहाय्य घेण्यात आले.

गलबते बांधण्यासाठी ३४० पोर्तुगिज कारागीर येथे काम करत होते. पोर्तुगीज दुर्गाडीस गोद्रेलस म्हणत. महाराजांच्या या आरमाराची दखल फ्रेंच आरमाराने घेतली व डोंगरातील राजा आता समुद्रात उतरतोय तेव्हा तुमचे बस्तान कुठे ठेवायचे ते तुम्हीच ठरवा अशा आशयाचे पत्र वसईतील पोर्तुगीजांना लिहिले. त्यामुळे येथील कारागीर एका रात्री काम अर्धवट टाकुन पळुन गेले व उर्वरीत काम स्थानिक कारागिरांनी पुर्ण केले. या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना , वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीलाही दहशत बसविली. इ.स. १६८२साली मोगल सरदार हसनअली खान याने कल्याण जिंकले पण संभाजीराजांनी हल्ला करुन कल्याण परत ताब्यात घेतले. नंतर १६८९ मध्ये मोगलांनी परत कल्याण जिंकले. इ.स १७२८ मध्ये पोर्तुगिजांनी दुर्गाडी किल्ल्यावर हल्ला केला पण पेशव्यांचे किल्लेदार शंकरजी केशव,गंगाजी नाईक व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला यशस्वीपणे परतवुन लावला. मराठा आरमाराचा मुहुर्त करणारा अनेक लढायांचा व रोमहर्षक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला एकदा तरी पहायला हवा.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment