महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,527

दुर्गभांडार | Durgbhandar Fort

By Discover Maharashtra Views: 4367 10 Min Read

दुर्गभांडार | Durgbhandar Fort

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक स्थान व गोदावरी नदीचा उगम असलेला येथील ब्रह्मागिरी पर्वत भाविकांनी कायम गजबजलेला असतो. या ब्रह्मगिरीला लागुनच दक्षिणेकडे दुर्गभांडार(Durgbhandar Fort) हा ब्रह्मगिरीचा उपदुर्ग किंवा जोडकिल्ला आहे. दुर्गभांडारवर जाणारी वाट हि ब्रह्मगिरी वरूनच जात असल्याने आपल्याला सर्वप्रथम ब्रह्मगिरीवर जावे लागते. सातवाहनकाळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा व्यापारी मार्ग त्रिंबक डोंगररांगेतून जात असल्याने त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला बांधला गेला व किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असु नये या उक्तीनुसार त्याला लागुन असलेला डोंगर म्हणजेच दुर्गभांडार किल्ला बांधला गेला. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असल्या तरी त्र्यंबकेश्वर गावातुन पायरी मार्गाने वर येणारी वाट आपल्या सोयीची आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराकडून ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आल्यावर तेथील पाय-यानी आपला गडप्रवास सुरु होतो. तळापासून साधारण ५०० पायऱ्या चढुन आल्यावर काहीशी सपाटी लागते. पुढे काही अंतरावर वाटेच्या डाव्या बाजुला एक मोडकळीस आलेले दगडी बांधकामातील मंदीर दिसते. मंदिरासमोर वाटेच्या बाजुला दोन उध्वस्त बुरूज असुन त्यांच्या शेजारी काही तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील हे पहाऱ्याचे मेट आहे. या मेटावरून पुढे आल्यावर उजव्या बाजुला एका चौथऱ्यावर दगडी बांधकामातील एक दुमजली धर्मशाळा असुन धर्मशाळेच्या वरच्या मजल्यावर जाण्याकरता बाहेरील बाजुस जिना आहे.

धर्मशाळेच्या मागील बाजुस दगडी बांधकामातील ७०-८० फुट खोल पायऱ्या असलेली बारव असुन तिच्या काठावर एक दगडी ढोणी व झिजलेला शिलालेख दिसुन येतो. येथुन पुढील वाटेवर सुरवातीला बांधीव दगडी पायऱ्या असुन नंतरची वाट व पायऱ्या मात्र कातळात कोरून काढल्या आहेत. दीड फुट उंचीच्या या पायऱ्यावर आधारासाठी लोखंडी कठडे रोवले आहेत. येथुन पंधरा मिनिटे चढाई केल्यावर खडकात खोदलेली पहारेकऱ्याची गुहा लागते. या गुहेतील खोलीत सध्या ब्रह्मदेवाची मुर्ती विराजमान आहे. या वाटेवर मोठया प्रमाणात माकडं असुन ती खाण्यासाठी पर्यटकांना त्रास देत असल्याने जवळ शक्यतो काठी बाळगावी. येथुन पुढील वळणावर खडकात खोदलेली दहा फुट उंचीची हनुमानाची मुर्ती असुन पुढील भागात वाटेवरील दुसरी गुहा समोर येते. या गुहेत शिरण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूने लहानसा दरवाजा कोरलेला असुन दरवाजाच्या दोन्ही बाजुस दोन ऋषींच्या मुर्ती कोरल्या आहेत. या गुहेचा कड्याकडील भाग संपुर्ण उघडा असुन गुहेत दोन कोरीव मुर्त्या ठेवलेल्या आहेत. येथुन काही अंतर पुढे गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा समोर येतो. दरवाजाच्या अलीकडे उजव्या बाजुला दोन कातळशिल्पे आहेत. या दरवाजातून काही पायऱ्या चढुन वर गेल्यावर गडाचा दुसरा कातळात कोरलेला दरवाजा समोर येतो. या दरवाजातून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण ब्रह्मगिरीच्या गडमाथ्यावर पोहोचतो.

पायथ्यापासुन येथवर येण्यास एक तास लागतो. येथुन समोरील वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या दिशेने जाते. या वाटेने गडाच्या मधील उंचवट्यावर येऊन उजवीकडील वाटेने जटाशंकर मंदिराकडे निघावे. या ठिकाणी शंकराने जटा आपटून गंगानदी भूतलावर आणली अशी कथा आहे. मंदिराच्या मागील बाजुस खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. येथुन एक लहान पायवाट उत्तर टोकावरील दुर्गभांडार किल्ल्याकडे जाते. फार कमी लोकांना हे अखंड कातळात कोरुन बनवलेले अनोखे दुर्गशिल्प ठाऊक आहे. या वाटेवर खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके असुन तटाला लागुन व टोकावरील बुरुजावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात.सुमारे वीस मिनिटे ही चिंचोळी पाऊलवाट पार केल्यावर ब्रह्मागिरीच्या मूळ डोंगरापासून सुटलेला गोल आकाराचा छोटेखानी दुर्गभांडार किल्ला दिसायला लागतो. किल्ल्याच्या खालील बाजुस भंडारदुर्ग व ब्रह्मगिरी या दोन किल्ल्यांना जोडणारा चिंचोळा मार्ग दिसतो. त्रिंबकगडाच्या अगदी टोकावरच दुर्गभांडारवर जाण्यासाठी खडकात खोदलेला सुंदर पायरीमार्ग आहे पण अगदी जवळ जाईपर्यंत तो दिसुन येत नाही. येथे कातळात ६ ते ८ फुट रुंदीचा १०० फुटापेक्षा जास्त खोल चर खोदलेला असुन त्यात उतरण्यासाठी दीड फुट उंचीच्या जवळपास ५५ पायऱ्या कोरलेल्या आहेत. पायऱ्यांच्या सुरवातीलाच एक हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे.

या पाय-या उतरून खाली गेलो की एक लहान दरवाजा दिसतो. हा दरवाजा खुप मोठया प्रमाणात मातीत गाडला गेला असल्याने येथुन वाकुनच बाहेर पडावे लागते. हा दरवाजा पार केल्यावर आपण ब्रह्मगिरी किल्ल्यातुन बाहेर निघुन दुर्गभांडारला जोडणाऱ्या चिंचोळ्या मार्गावर पोहचतो. हा मार्ग म्हणजे सुमारे ३५० फूट लांब आणि जेमतेम ८ ते १० फूट रुंद अशी नैसर्गिक भिंत असुन भिंतीच्या दोन्ही बाजुस सरळसोट ५०० फुटांचा कडा आहे. हि वाट पार करताना जरा जपुनच जावे लागते. हि वाट पार केल्यावर पुन्हा एकदा आधी पार केलेल्या दरवाजाप्रमाणे दुसरा लहान दरवाजा लागतो. दुर्गभांडारचा हा दरवाजा देखील मोठया प्रमाणात मातीत गाडला गेला असल्याने गुडघ्यावर ओणवं होऊन आत शिरावे लागते. यातुन आत शिरल्यावर परत एकदा कातळात कोरलेली पन्नास पाय-यांची उंच चढण लागते. या पायऱ्या चढुन आपण दुर्गभांडारच्या माथ्यावर पोहोचतो. निमुळत्या आकाराचा दुर्गभांडार समुद्रसपाटीपासून ३९८० फूट उंचावर असुन ५ एकर परिसरात दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दुर्गभांडारचा माथा म्हणजे एक लहानशी टेकडी असुन ब्रह्मगिरीच्या एका सोडेसमोर दुर्गभांडार किल्ला उभा आहे.

माथ्यावरील पायवाटेने फिरायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम खडकात खोदलेल्या पाण्याच्या दोन टाक्या दिसुन येतात. यातील एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. टाक्याकडून पाच मिनिटात आपण गडाच्या टोकाशी असणाऱ्या संपूर्णपणे कातळात कोरलेल्या बुरुजावर जाऊन पोहोचतो. बुरुजावरुन समोर हरिहर (हर्षगड) आणि बसगड दिसतो तर खाली उजवीकडे कडय़ाच्या पोटात ब्रह्मगिरी, गंगाद्वार व निवृत्तीनाथांच्या समाधीस्थळाचं दर्शन होते. येथुन परत फिरल्यावर उजव्या बाजुच्या उंचवट्यावर गेले असता दोन घरांचे चौथरे दिसुन येतात. येथुन अंजनेरी, हरिहर, बसगड, त्रिंगलवाडी असा दूरवरचा परिसर दिसतो. गडमाथा लहान असल्याने व जास्त काही अवशेष नसल्याने अर्ध्या तासात आपली गडफेरी पुर्ण होते. स्थापत्यशास्त्र व अनोखी भौगोलिक रचना असलेला दुर्गभांडारची रचना त्रिंबकगडच्या संरक्षणासाठी केली असावी. दुर्गभांडारवरून ब्रह्मगिरीच्या पायऱ्या चढुन वर आल्यावर आल्या वाटेने परत न जाता कड्याच्या डावीकडील वाटेने ब्रह्मगिरीच्या माचीकडे जाता येते पण नव्यानेच भटकंती करणाऱ्यानी हि वाट टाळावी कारण दोन ठिकाणी हि वाट अतिशय अरुंद आहे. देवदर्शन व साहस असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी ब्रह्मागिरी- दुर्गभांडार भटकंती एकदा तरी करायला हवी.

दुर्गभांडार हा ब्रह्मगिरी किल्ल्याचा जोडकिल्ला किंवा उपदुर्ग असल्याने याचे वेगळे असे संदर्भ सापडत नाहीत. ब्रह्मगिरी किल्ल्याचे जे संदर्भ तेच दुर्गभांडार किल्ल्याचे संदर्भ. ब्रम्हगिरी किल्ल्याची बांधकाम शैली पहाता हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असावा पण गडाचा इतिहास ज्ञात होतो तो यादव काळापासून. इ.स.१२७१ -१३०८ या काळात या परिसरावर राजा रामदेवराय यादव याची सत्ता होती. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले असता निवृत्तिनाथांना ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन घडले अशी कथा आहे. पुढील काळात किल्ला बहमनी राजवटीच्या अमलाखाली आला. सन १४८५ मध्ये बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमदने सन १४८७ साली हा किल्ला ताब्यात घेतला पण नंतर तो मोंगलाकडे गेला. इ.स.१६२९मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. शाहजानने हा परिसर परत घेण्यासाठी आठ हजारांचे घोडदळ पाठवले. इ.स.१६३३ मध्ये त्रिंबकगडचा किल्लेदार मोगलांकडे गेला.

१७ जुन १६३६ रोजी मुघल व आदिलशाहीने एकत्र येऊन निजामशाही जिंकली व निजामशहाला कैदेत टाकले त्यावेळी शहाजीराजांनी निजामाचा एक वंशज मुर्तुजा याला निजामशहा म्हणून घोषित करून स्वतः वजीर बनले. इ.स.१६३६ मध्ये उत्तरेच्या प्रचंड फौजांपुढे शहाजीराजांचा माहुली येथे पराभव झाला व त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला गेला. इ.स.१६७० मध्ये मराठयांनी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबकगड जिंकला. १६८२ च्या सुमारास सुमारास खानजमानचा मुलगा मुझ्झफरखान याच्या मोगली फौजेने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळल्या. १६८३च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा फितुर होऊन मुघल सरदार अनामतखान याला जाऊन मिळाला. त्रिंबकगडच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा त्याचा प्रयत्न फसला व मोगलांनी त्यालाच कैद केले. इ.स.१६८४ च्या नोव्हेंबर महिन्यात अक्रमखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या वाडया जाळुन तेथील जनावरे पळवली. १६८२ ते १६८४ या काळात मोगलांचे गड जिंकण्याचे सर्व प्रयत्न फसले. इ.स. १६८८च्या ऑगस्ट महिन्यात मोगल सरदार मातबरखानाने किल्ल्याला वेढा घातला.

औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो त्रिंबकच्या किल्ल्याभोवती मी चौक्या बसविल्या असुन सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये रसद व लोकांचे येणेजाणे बंद आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील. यावर औरंगजेब त्याला लिहिलेल्या प्रोत्साहनपर पत्रात म्हणतो त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा तुमच्या कामाचे चीज होईल. यावर मातबरखान औरंगजेबाला पत्रातून किल्ला कसा घेतला ते कळवितो. गुलशनाबाद म्हणजेच नाशिकच्या ठाण्यात आपले सैन्य कमी असल्याने मी त्रिंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ ला गडाचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले व किल्ला ताब्यात आला. याशिवाय मातबरखान कळवितो या मोहिमेत औंढाचा किल्लेदार श्यामसिंग याचा मुलगा हरिसिंग याने मोठी कामगिरी केल्याने त्याला तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन त्रिंबकगड सांभाळण्यास ठेवले आहे. साल्हेरचा किल्ला ताब्यात घेतांना जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी. यावर पाठविलेल्या फर्मानात औरंगजेब लिहितो कि तुमची अर्जी पोहोचली. आपण त्रिंबकगड जिंकून त्रिंगलवाडी किल्ल्याला वेढा घातल्याचे कळले. आपण पाठविलेल्या त्रिंबकच्या चाव्या मिळाल्या असुन तुमची कामगिरी पसंत आहे. तुमच्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात आली असुन तुम्हाला खिलतीचा पोशाख झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये देण्यात येत आहे.

पुढे १६९१च्या सुमारास येथील अधिकारी मुकर्रबखान बादशहास लिहीतो त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला असुन त्याचा मुलगा लहान व कर्जबाजारी आहे. त्याच्यावर सावकाराचा तगादा चालू असुन त्याला त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा अन्यथा किल्ल्यावर संकट कोसळेल. इ.स.१७१६ मध्ये शाहू महाराजांनी या किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली पण ती फेटाळली गेली. इ.स.१७३० साली कोळयांनी बंड करून किल्ला घेतला व पुढे १८१८पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment