दुर्योधन मंदिर, दुरगाव, ता. कर्जत, अहमदनगर –
नगर जिल्ह्यातील राशीन मधील जगदंबा मंदिर आणि काळवीट अभयारण्य प्रसिध्द आहे. या दोन्ही ठिकाणांच्या जवळ अत्यंत वेगळे आणि आश्चर्यकारक मंदिर आहे. हे आहे दुर्योधन मंदिर! अहमदनगर जिल्यातील, कर्जत तालुक्यात असणारे दुरगाव हे एक छोटेसे गाव. दुरगावला नगरवरून मिरजगाव-कर्जत-दुरगाव असे जाता येते. या छोट्याशा गावात वसले आहे महाराष्ट्रातील एकमेव दुर्योधनाचे मंदिर, त्याच बरोबर इथे साधारण पंधराव्या शतकातील महादेवाचे मंदिर देखील आहे.(दुर्योधन मंदिर, दुरगाव)
दुर्योधनाचे हे मंदिर आगळेवेगळे आहे. मुख्य मंदिर महेश्वर महादेवाचे असून, मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी जिन्याने काही पायऱ्या चढून बऱ्यापैकी उंची असलेल्या आणि आतून पोकळ असलेल्या रंगीत कळसात दुर्योधनाची आकर्षक बैठी मूर्ती आहे. मूळ मूर्तीला आता चुन्याचा गिलावा केलेला दिसतो. ढग आले, पण पाऊस पडत नसेल तर अशा वेळी दुर्योधनाची मूर्ती देवळात कोंडतात. एका दंतकथेनुसार दुर्योधनाने पावसाळी ढगांना शाप दिला होता. तेव्हापासून ओथंबलेले ढग, जलसाठे यांच्यावर दुर्योधनाची दृष्टी पडली तर पाऊस पडत नाही, असा समज आहे. त्याला कोंडले म्हणजे पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे.
भीमाशी झालेल्या युद्धानंतर दुर्योधनाने अंत्यसमयी महेश्वराची म्हणजे शंकराची प्रार्थना केली म्हणून येथे महेश्वर अर्थात शंकराचे मंदिर आहे. शंकराचे मंदिर दगडी चौथऱ्यावर उभारलेले आहे. मंदिराच्या खांबावर जास्त कलाकुसर नसली तरी त्याच्या रचनेवरून ते पंधराव्या शतकातील असू शकतात असे अनुमान आहे. सभामंडपात नंदी आणि गाभाऱ्यात दोन शिवपिंडी आहेत. हे या मंदिराचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. महाशिवरात्र आणि अधिक महिन्यात इथे उत्सव भरतो.
महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात वसलेला आणि गावकऱ्यांनी जपलेला हा वारसा! श्रद्धा-अंधश्रद्धा या पलीकडे विचार करून महाराष्ट्रात असलेल्या एकमेव अशा दुर्योधन मंदिराला एकदा अवश्य भेट देऊन गावकऱ्यांनी जतन केलेला वारसा तुमच्या आमच्या सारख्या लोकांसमोर यावा हिच अपेक्षा!
©️ रोहन गाडेकर