महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,574

मराठेशाहीतील दसरा

By Discover Maharashtra Views: 1624 10 Min Read

मराठेशाहीतील दसरा –

हिंदू धर्मियात अनादी काळापासून कुठलेही कार्य प्रारंभ मुहूर्त पाहून करण्याची प्रथा आहे.कार्य सुरळीतपणे,विनाविघ्न पार पडण्यासाठी अनुकूल मुहूर्त बघितला जातो वा प्रतिकूल मुहूर्त असल्यास कार्य लांबणीवर सुद्धा टाकण्यात येते.शास्त्रकारांनी याशिवाय असे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत कि त्या दिवशी कुठलेही कार्य हाती घेण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही,ते विशिष्ठ मुहूर्त कार्यसिद्धीस अनुकूल असतात.गुढीपाडवा,अक्षय्य तृतीया आणि विजयादशमी म्हणजेच दसरा हे तीन पूर्ण व दिवाळी पाडवा हा अर्धा असे ते साडेतीन मुहूर्त आहेत.(मराठेशाहीतील दसरा)

ह्या साडेतीन मुहूर्तांपैकी दसऱ्याचा मुहूर्त प्रदीर्घ सैनिकी पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रासाठी विशेष महत्वाचा राहिला आहे.दसरा सण साजरा करण्यामागील पौराणिक पार्श्वभूमी बघता हा सण दुष्टांचे निर्दालन करून सुष्टांचे राज्य आणण्यासाठी साजरा करण्यात येतो. देवी ने अन्यायी महिषासुर राक्षसास नऊ रात्री युद्ध केल्यानंतर दहाव्या दिवशी मारले,प्रभू रामचंद्रांनी युद्धाच्या दहाव्या दिवशी रावणाचा शेवट करून लंकेचे राज्य बिभिषणाच्या हाती सोपविले,बारा वर्षांचा अज्ञातवास संपल्यावर आपल्या हिश्शा चे राज्य मागण्यास कौरवांकडे गेलेल्या पांडवानी अज्ञातवासात जातेवेळी शमी वृक्षावर लपवून ठेवलेली दैवी शक्तीने भारीत शस्त्रे शमी वृक्षावरून काढली,हे सगळे दिवस विजयादशमीचेच होते. यावरून दसरा सणाचा युद्धाशी किती निकटचा संबंध आहे ते दिसून येयील.

आजच्या पोस्ट मध्ये मराठेशाहीत हा उत्सव कसा साजरा होत होता याची चर्चा आहे. या दिवशी पांडवानी कौरवांशी लढण्याची वेळ आलीच तर हाताशी शस्त्रे असावीत म्हणून शमी वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रे काढली होती.क्षात्र परंपरा असलेल्या आपल्या राज्यात पण ह्या दिवशी मराठ्यांचे सैनिक,सरदार आपल्याकडील हत्यारे साफसूफ करून त्याची विधिवत पूजा करत असत.ह्या दिवशी घोडे शृंगारून थाटामाटाने,वाजत गाजत गावाच्या शीवे नजीक असलेल्या शमी वृक्षाची पूजा करून शमीची पाने एकमेकांना सोने म्हणून देत.घरी परतल्यावर औक्षणा चा कार्यक्रम होत असे.त्यावेळी हे सोने ओवाळणी म्हणून दिले जाई. शिवकाळात छत्रपतींच्या राजधानीत विजयादशमीचा दरबार भरवला जाई.दरबारात छात्रापातीना मुजरे व नजराणे पेश केले जात.छत्रपती पण आपल्या सरदारांचे पोषाख,वस्त्रे देऊन सत्कार करीत.या वेळी परमुलुखावरील नव्या मोहिमांची रीतसर घोषणा होई.

मराठेशाहीतील बहुतेक सर्व लष्करी मोहिमांचे नियोजन वर्षभरात होऊन प्रत्यक्ष मोहिमेस दसऱ्याच्या दिवशी प्रारंभ होत असे.आधी ठरल्या प्रमाणे पाचारण करण्यात आलेले सरदार आपापली पथके,सैन्य घेऊन दसऱ्याच्या आधी काही दिवस सातारा,कोल्हापूर,पुणे,नागपूर आदी ठिकाणी गावाबाहेर डेरे टाकीत. पुण्यश्लोक शाहू महाराज हयात असेपर्यंत शाही दसरा सातारा येथे होई.नंतरच्या काळात मराठ्यांचे सत्ता केंद्र साताऱ्याहून पुण्याला सरकल्यावर दसरा संमेलन शनिवारवाड्यात होऊ लागले.दसऱ्याच्या दिवशी छत्रपती,पेशवे,वा त्यांच्या प्रतिनिधींकडून निरोपाचा विडा घेऊन सर्व सरदार आपल्या सैन्यासह कूच करायचे.एकोणीसाव्या शतकात इंग्रजांनी बहुतेक सर्व देशी सत्तांचा पाडाव केला होता.तरी पण दसरा सण पारंपारिक पद्धतीने साजरा होई.आजही पूर्वीच्या मराठा संस्थानात दसरा पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटाने साजरा होतोय.विशेषतः कोल्हापूर, सातारा,ग्वाल्हेर,इंदोर इ.ठिकाणचे शाही दसरे प्रसिद्ध आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठ्यांनी हाती घेतलेल्या काही मोहिमांची थोडक्यात माहिती करून घेऊ या.

सुपे परगणा.—हा परगणा शहाजी राजांच्या पुणे जहागीरीतला असून त्यांच्या तुकाबाई नावाच्या द्वितीय पत्नीचा भाऊ ( छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र मामा ) संभाजी मोहिते याने बळकावला होता.मामा बऱ्या बोलणे सुपे जहागीरीवरचा ताबा सोडत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटी त्या साठी लष्करी मोहीम कादाहावी लागली.इ.स.१६५६ च्या दसऱ्याचा मुहूर्त बघून महाराजांनी सुप्यावर हल्ला चढवून मामास परास्त करून बंगलोरला शहाजी राजांकडे सन्मानपूर्वक रवाना केले.

बंकापुर ( कर्नाटक )- १० ऑक्टोबर १६७३ ह्या दिवशी दसऱ्याच्या सुमूहर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पंधरा हजार मावळ्यांची फौज घेऊन आदिलशाह व मोगलांच्या संयुक्त आघाडीला मराठी हिसका दाखविण्यासाठी कर्नाटकाकडे प्रस्थान केले.बंकापुर लुटून मराठी फौजा कडवाड ( कारवार ) प्रांतात घुसल्या.सतत तीन महिने मराठे कर्नाटकातील आदिलशाहच्या मुलखात धुमाकूळ घालत होते.या मोहिमेत मराठ्यांनी बरेचसे मिळाले आणि गमवावे पण लागले.सर्जाखानाशी लढताना विठोजी शिंदे चंदगड इथे मृत्यू पावला.महिमाजी शिंद्यांनी सर्जाखानास ठार मारून त्याचा सूड घेतला.दरम्यान सर्जाखान आणि बहलोलखान चालून आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना चकवा देऊन रायगडावर सुखरूप आले.(मराठेशाहीतील दसरा)

सुरतेवरील प्रथम स्वारी ( जानेवारी १६६४ ).शायीस्ताखानाने आपल्या तीन वर्षांच्या ( १६६० ते १६६३ ) महाराष्ट्रातील मुक्कामात बहुतांश मुलुखाचे अतोनात नुकसान केले होते.राज्यातील उत्पन्नाची साधने नष्ट,क्षितीग्रस्त झाल्याने खजिना रिकामा झाला होता.शत्रूने मराठी मुलखाचे केलेले नुकसान,हानी भरून काढण्यासाठी पुण्यापासून सुरते पर्यंतचा सर्व भाग मोगलांच्या ताब्यात असून देखील सुमारे तीनशे मैल शत्रू प्रदेशात जाऊन मोगलांच्या धनाढ्य सुरत शहरावर हल्ला करण्याची मोहीम शिवरायांनी आखली.हि मोहीम प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी त्यांनी अतिशय बारकाईने तिचे नियोजन केले होते.दसऱ्याच्या दिवशी हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक व सुमारे २०० हेर ह्या कामगिरीवर रवाना झाले.हि मोहीम कमालीची लाभदायक ठरली.सहा जानेवारी १६६४ ते १० जानेवारी १६६४ मराठ्यांनी मोगलांचे सुरत शहर धुऊन काढले.छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या मोहिमेत २८ शेर वजनी मोती,जडजवाहीर,हिरे,माणिक,पाचू व इतर सोनेनाणे खूपच मिळाले.जवळजवळ एक कोटी रुपये वसूल करून १० जानेवारीस मराठ्यांनी सुरत सोडली.

दक्षिण दिग्विजय मोहीम. मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस अनन्य साधारण महत्व आहे.दक्षिणेकडील सत्ता सूत्रे इथल्याच लोकांकडे..धर्माने भले ते मुस्लीम असोत..राहिली पाहिजेत न कि उत्तरेकडील मोगलांच्या हाती, ‘ दक्षिण ची पातशाही आम्हा दक्षिणीयांचेच हाती राहिली पाहिजे!’ अशी त्यांची भूमिका होती.ह्यासाठी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली. दसऱ्याच्या मुहूर्तावर—६ ऑक्टोबर १६७६ रोजी पंचवीस हजार फौज व बाळाजी आवजी,दत्ताजीपंत मंत्री,सूर्याजी मालुसरे,नेतोजी पालकर,सर्जेराव जेधे,मानाजी मोरे,नागोजी जेधे,हंबीरराव मोहिते,येसाजी कंक,हणमंते बंधू,धनाजी जाधव,बाबाजी ढमढेरे,यासारखे जानेमाने सरदार घेऊन रायगडा वरून दक्षिण दिग्विजय मोहिमेचा शुभारंभ केला.हि मोहीम नेहमीच्या स्वार्यांपेक्षा वेगळी होती,म्हणजे मित्र जोडण्यासाठी आखलेली मोहीम होती,म्हणून सगळ्यांना ताकीद होती कि,वाटेने रयतेस कोणेही प्रकारे आजार ( त्रास ) पावता कामा नये.रयतेची एक काडी तसनस न व्हावी.

महाराज ह्या मोहिमेत प्रथम टप्प्यात कुतुबशहा ला भेटले.त्यावेळी बादशहाच्या भेटीस येणाऱ्या ने बादशहास लवून कुर्निसात व मुजरा करायचा तेथील रिवाज होता ज्याला ‘ शिरभोई धरणे ‘ म्हणत.पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहास कळविले कि,..पादशाही आदब आहे कि शिरभोई धरावी,तसलीम करावी.परंतु आम्ही आपणावरी छत्र धरिले असे ( सार्वभौम राजे आहोत )तरी शिरभोई व तसलीम माफ असावी.अशा प्रकारे महाराजांनी बादशहाला आपण सार्वभौम छत्र सिंहासनाधीश्वर अधिपती असल्याची जाणीव करून दिली.

महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम सुमारे पावणेदोन वर्षे चालली व कमालीची यशस्वी झाली.रायगडाहून ६ ऑक्टोबर १६७६-दसऱ्याच्या दिवशी दक्षिणेस प्रयाण करणारे छत्रपती शिवाजी महाराज जून १६७८ मध्ये रायगडी सुखरूप आले.या मोहिमेतील एक दसरा महाराजांनी जिंजी किल्ल्यावर साजरा केला!

संताजी व धनाजींच्या मोहिमा. छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्तेनंतर रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यात मराठ्यांची राजधानी स्थापन करून तिथून मराठेशाहीचा कारभार बघावयास सुरुवात केली.पण मोगली फौजांनी जिंजी किल्ल्यास वेढा घातला होता.इ.स.१६९२ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर हे दोघे मराठेशाहीचे शूर सेनानी आपल्या फौजा घेऊन कर्नाटकात उतरले.जिंजीच्या वाटेवरील मोगली मुलुखाची नासधूस,लुटालूट करून ते जिंजी इथे आले.धनाजी जाधवांनी मोगली फौजांचा वेढा मोडून काढला व इस्माईलखान मख नावाचा नामांकित मोगल सरदाराला पकडून छत्रपती राजाराम महाराजांपुढे हजर केले.दुसरीकडे संताजीनी कांचीपुरम जवळ आणखीन एक नामचीन मोगल सरदार अलीमर्दन खानास पराभूत करून त्यास छ.राजाराम महाराजांपुढे उभे केले.

धनाजी संताजीच्या ह्या मोहिमांमुळे मोगली फौजात चांगलीच दहशत निर्माण झाली होती.ह्या मोहिमेची आखणी इ.स.१६९५ मध्ये हुकुमत पनाह रामचंद्रपंत अमात्यांनी विशालगडावर प्रमुख मराठे सरदाराना बोलावून आखली होती.

थोरल्या बाजीराव पेशव्यांची दिल्लीला धडक.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची,विजीगिषु वृत्तीची परंपरा,वारसा पुण्यश्लोक शाहू महाराजांच्या कारकिर्दीत चालूच राहिला,मराठ्यांच्या राजसत्तेचा विस्तार हिंदुस्थानभर होऊन दिल्लीचा बादशहा त्यांच्या हुकमतीत आला.इ.स. १७३५ मध्ये थोरल्या बाजीरावांनी काढलेल्या उत्तर भारताच्या मोहिमेच्या वेळी दिल्लीकर बादशाहने भेटीचे आमंत्रण देऊन पण ऐनवेळी भेटण्यास नकार दिला होता.हा बाजीरावांचा नव्हे तर समस्त मराठ्यांचा अपमान समजून छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन इ.स.१६३६ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर थोरल्या बाजीरावांनी पुन्हा उत्तर हिंदुस्तान मोहीम काढली.मराठ्यांना नर्मदेच्या उत्तरेसच अडविण्यासाठी बादशाहने सादतखान ह्या नामांकित सरदारास भली मोठी फौज देऊन पाठविले,पण मोगली फौजेस गुंगारा देऊन थोरल्या बाजीरावांनी सरळ दिल्लीला धडक मारली ज्याची बादशाहने कधी स्वप्नात पण कल्पना केली नव्हती.बादशाहने पाठवलेल्या फौजेचा दणदणीत पराभव झाला.मोगल बादशहास उखडून टाकून दिल्ली ताब्यात घेण्याचा मराठ्यांचा हेतू नसल्याने बाजीराव बादशहास काही तोशीस न लावता माघारी फिरले.

विजयादशमीशी निगडीत अन्य काही घटना.शहाजी राजांनी आदिलशाहीत आपले स्थान स्थिर झाल्यावर राजमाता जिजाबाई व शिवाजी महाराज आदि कुटुंबियांना आपल्याकडे बंगळूरू स बोलाविले होते.दादोजी कोंडदेव,जिजामाता,शिवाजी महाराज,त्यांची नवपरिणीत पत्नी सईबाई विजयादशमीच्या मुहूर्तावर बंग्ळूरूस रवाना झाल्या.इ. १६४० ते १६४२ अशी जवळपास दोन वर्षे शहाजी राजांचा परिवार बंगळूरू,विजापूर इथे वास्तव्यास होता.

पानिपत संग्रामातील कुंजपुरा येथील दसरा.तृतीय पानिपत संग्रामात कुंजपुरा हे दिल्लीपासून उत्तरेस ८० मैल अंतरावरील ठिकाण अब्दालीच्या परतीच्या मार्गावरील प्रमुख ठाणे होते.पानिपत युद्धास तोंड फुटण्या आधी जखमी दत्ताजी शिंद्यांचे शीर कापून अब्दालीस पेश करणारा कुतुबशाह इथे मराठ्यांना जिवंत सापडला,मराठ्यांनी त्याचे शीर कापून छावणीत फिरवले,किल्ल्यास तोफांचा मारा करून भगदाड पडले,दहा हजार पठाण फौज कापून काढली.मराठ्यांच्या हाती प्रचंड लुट लागली.दुसऱ्या दिवशी असलेली विजयादशमी मराठ्यांनी जोशात साजरी केली.(मराठेशाहीतील दसरा)

शहाजी राजांच्या कर्नाटकावरील स्वाऱ्या.लष्करी मोहिमा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु करण्याची परंपरा शहाजी राजांनी ते आदिलशाहीत सेवारत असताना देखील पाळली होती.इ.स.१६३७ ते १६४० या तीन वर्षात रणदुल्लाखान व शहाजी रजनी कर्नाटकात लागोपाठ तीन स्वाऱ्या केल्या.आदिलशाही फौजा दसऱ्यास कूच करून पुढील पावसाला सुरु होण्यापूर्वी परत येत.असाच शिरस्ता मराठेशाहीत पण चालायचा.

दसऱ्याशी संबंधित अजून एक गोष्ट सांगून पोस्ट संपवतो.नारायणराव पेशव्याच्या वधानंतर राघोबा दादा पेशवा झाला.तो २५ सप्टेंबर १७७३ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पुण्याबाहेर पडला.त्यानंतर बारभाई नी केलेल्या कारस्थानामुळे राघोबा दादास पुन्हा कधीच पुण्यात येता आले नाही.

सदर लेख प्रकाश लोणकर सर यांचा आहे

संदर्भ:

१-मराठ्यांचा इतिहास खंड दुसरा.संपादक आ.रा.कुलकर्णी व ग.ह.खरे
२-मराठी रियासत खंड एक ले.गो.स.सरदेसाई
३-मराठेशाहीचे अंतरंग – ले.डॉ.जयसिंगराव पवार
४-राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. ले.बाबासाहेब पुरंदरे.

Leave a Comment