हत्ती आणि कोरीवकाम –
साधा लहानसा हत्ती. देवगिरीच्या किल्ल्यात कोरलेला. यादवकालीन. पण कलात्मकता पहा किती त्यात. पहिलं म्हणजे त्याचा आकार व त्यातील रेखीवपणा. त्याचे दागिने – डोक्यावरचे, पाठीवरचे. पाठीवर मधोमध बांधलेली घंटा. सोंडेचे हुबेहूब वळण. डोळ्याभोवती आणि सोंडेच्या सुरुवातीला धातूचा मुखवटा – बहुतेक सोने वा चांदीचा वर्ख दिलेला. गळ्यात माळा. गंडस्थळाचा आणि कानाचा आकार तर पहा एकदा !!(हत्ती आणि कोरीवकाम)
पायातील साखळदंड. चारही पायात साखळदंड न बांधता हत्तीच्या चालण्याचा पद्धतीचा विचार करून फक्त पुढच्या दोन पायात बांधला आहे. त्याने वेगाने पळू नये म्हणून !! अजून एक साखळी पाय व शेपटीच्या टोकाजवळ बांधली आहे !
पायात कडे आहे. अंगावर झुल दाखविली आहे. माहुताची तोडफोड झालीये काळाच्या ओघात. पण तरीही त्याच्या हातातील अंकुश पहा !! हत्तीबरोबर जाणाऱ्या स्वारीवर पाठीमागून हल्ला होऊ नये म्हणून एकजण जणू उलटा बसवलाय !
यातून त्या काळातील ऐश्वर्य व रसिकता देखील दिसून येते. इतके बारीक निरीक्षण व ते दगडात उतरवण्याची क्षमता – धन्य ते शिल्पकार. आपल्या क्षेत्रात आज काम कसे करावे ? या कलाकारांसारखे ! कौशल्यपूर्वक आणि दर्जेदार !!
© प्रसाद तारे
PC दिपक पटेकर