वेरूळ –
कृष्णाने जेव्हा देवलोकीचे कैलास पृथ्वीवर आणण्याचे ठरवले, तेव्हा या भागात जो काही श्रीमंतीचा देखावा उभा राहीला असेल, त्याची तुलना कुबेराने आपल्या धनाशी केली असणार.. हजारो पाथरवाट आपापली हत्यारे घेऊन या ‘एलिचपुरास’ जमली असतील. छिन्नी-हाथोड्याने काळ्या कुळकुळीत बेसॉल्टमध्ये हिमालयातील पांढरेशुभ्र ‘कैलास’ उभारण्यासाठी सगळे सज्ज असतील. प्रत्येकाच्या डोळ्यात वेगळं दृश्य.(वेरूळ)
कोण नंदीला बसलेला पाहतोय, तर कोण शिवाला नृत्य करताना.. कुणाला गणपती लहान वाटतोय, तर कुणाला भक्तांना आशीर्वाद देताना.. शिवाच्या जटांना दगडातून कोरून बाहेर काढताना कुणाचे रक्त ‘गंगेच्या प्रवाहाप्रमाणे’ जटांमधून वाट शोधत शिवाला न्हाऊ घालत असेल.. तर भविष्यात ज्या पायांवर करोडो लोक आपले मस्तक भक्तिभावाने अर्पण करतील, ते कुणी घामाने डबडबलेला पण भक्तीरसाने चिंब न्हाऊन निघालेला तयार करीत असेल..
कैलास लंकेला घेऊन जाण्याची ताकद रावणाने बाळगली होती. पण शिवाने ते शक्य होऊ दिले नाही. पण, ‘कृष्णाची’ ‘शिवभक्ती’ रावणाला भारी पडली असावी. म्हणून तर हिमालयातला आदीपुरुष आपल्या गणगोत, बायकापोरांना घेऊन या दख्खनेत येऊन विसावला.. रावणाला जे जमले नाही ते कृष्णाने करून दाखवले. म्हणूनच की काय, रावणाचे महाकाय शिल्प कैलासाच्या पायाशी खोदलय..
दिवसभर डोंगर फोडून, सर्व देवीदेवतांना, गंधर्वांना, अप्सरांना, यक्षांना, भूतप्रेत पिशाच्चांना या जमिनीवर सदेह अवतार घेण्यास मजबूर करून ते ‘विश्वकर्मा’ रात्री याच कैलासाच्या अंगणात झोपत असतील.. तेव्हा सारी सृष्टी त्यांच्यावर अशीच शीतलवृष्टी करीत असावी.. नवीन जग निर्माण करणाऱ्या या सृष्टीकर्त्यांचे सोहळे सारा आसमंत अगदी याच उत्साहाने करीत असावा..
वेरूळच्या पहिल्याच दर्शनाने, या लेण्यांच्या भव्यतेने वेड लागायची पाळी आलेली. माणसाने निर्माण केलेल्या गोष्टीचे श्रेय परग्रहवासीयांना देण्याचा मोह आपल्याला का झाला असावा, याचे उत्तर याच लेणीत मिळाले. डाव्या बाजूला जैन लेण्या.. उजव्या बाजूला बुद्ध लेणी आणि मधल्या भागात हिंदू लेण्या.. दख्खनेच्या धार्मिक बदलाचे जिवंत उदाहरण म्हणजे वेरूळ. एकच ठिकाण तिन्ही धर्माच्या अनुयायांसाठी किती पवित्र असेल! या वेरुळच्या अस्तित्वात आपल्या पुसटशा का होईना, पाऊलखुणा उमटल्या असणार.. त्याशिवाय या जागेचा केवळ उल्लेख झाला म्हणून वेगळीच अस्वस्थता निर्माण होते?
©आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
फोटो साभार – भावना पवार