आपल्याला ठाऊक नसेल पण १७ व्हय शतकात जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग हा संभाजी राजांनी केला होता.
आता एखादी मोठी लढाई करण्याऐवजी मराठे नेहमीच छोट्या छोट्या खोड्या काढून मुघली सैन्याचे भयंकर नुकसान करत असत. त्यामुळे आपल्या सैन्याची हानी सुद्धा टाळली जात असे अन स्वराज्याचे नुकसान सुद्धा होत नसे. त्यावेळी एक खूपच मोठी स्वारी औरंगजेबाने स्वराज्यावर केली होती. त्याने आपला पुत्र शहा आलम याला प्रचंड फौज म्हणजे जवळपास दीड लाखाची फौज देऊन स्वराज्यावर पाठवले. मोगली दरबारी नोंदीनुसार ही स्वारी १५ सप्टेंबर १६८३ ते २४ मे १६८४ या काळात झाली.
दुर्दैवाने शहा आलम च्या या स्वारीची दखल कोणत्या मराठी बखरकारांनी व इतिहासकारांनी घेतली नाही. या विषयी सर्वप्रथम ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी संशोधन करून याविषयीची माहिती उजेडात आणली. या स्वारीमागे औरंगजेबाचे दोन हेतू होते. तीन वर्ष संभाजी राजांच्या विरुद्ध लढून एकदा सुद्धा औरंगजेबला यशाची चव चाखायला मिळाली नव्हती त्यामुळे त्याने सभोवतालच्या प्रदेशाचा बंदोबस्त करून त्यांना घेरण्याची योजना बनवली. तसेच दुसरा हेतू म्हणजे दक्षिणेतील आजूबाजूच्या सत्तांकडून मिळणारी रसद बंद करणे. त्यावेळी झालेल्या शहा आलम च्या स्वारीची व्याप्ती खूपच मोठी होती. स्वराज्यावर आलेले हे एक खूप मोठे संकट होते. पण संभाजी राजांच्या विलक्षण युद्धनीतीमुळे याची झळ रयतेला पोचली नाही त्यामुळे ही घटना इतिहासकारांकडून दुर्लक्षित राहिली असावी.
स्वारीवेळी असलेला मुघल फौजफाटा
त्यावेळी अजमशाह जो पन्नास हजार मनसबदार होता त्याच्यासोबत बाकी सरदार घेऊन आदिलशाहीच्या सीमेवर ठेवले. व गोवळकोंडा अन विजापूर कडून स्वराज्याला होणारे साहाय्य तोडले. दक्षिण कोकण व गोव्यापर्यंत चा मुलुख घेण्यासाठी शहा आलम याला जवळपास ९० हजारांची फौज घेऊन रामघाटातून स्वराज्यावर उतरवले. त्याच वेळी शहाबुद्दीन खान हा सुद्धा भली मोठी फौज घेऊन देवघाट मार्गे कल्याणला उतरला. तसेच जंजिऱ्याच्या सिद्दीला रसद व दाणागोटा पुरवण्यासाठी वेंगुर्ला व गोवा या भागात नेमले. तसेच डच, पोर्तुगीज व इंग्रज यांना सुद्धा औरंगजेबाने स्वतःकडे वळवले व स्वराज्याला यांची मदत होणार नाही याची दक्षता घेतली. म्हणजेच एवढ्या प्रचंड अन चहूबाजूने आलेल्या संकटांनी स्वराज्य कोंडीत सापडले गेले.
आता संभाजीराजे त्यावेळी गोव्यावर चालून गेले होते. ते स्वतः गोव्याच्या मोहिमेत पोर्तुगीजांशी छाती झुंज घेत होते. व गोवेकारांना पुरते नामोहरम केले त्यामुळे त्यांची ताकद दुबळी होऊन त्यांना मुघलांना साहाय्य करण्याची क्षमता राहिली नाही. आता शहा आलम याला रामघाट उतरून यायला जवळपास दोन महिने गेले. येताना तो आसपासचा प्रदेश लुटत व जाळत आला होता. पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुलखात देखील त्याने लूटमार केल्यामुळे पोर्तुगीजांचा त्याच्यावरील विश्वास उडाला. शहा आलम ला त्यावेळी इंग्रजांचे सहाय्य झाले नाही की पोर्तुगीजांचे साहाय्य झाले नाही. त्यामुळे ही अत्यंत बलाढ्य व महत्वकांक्षी योजना फसली गेली.
कारण बलाढ्य मोगली फौजेसोबत जर युद्ध स्थळावर इंग्रज व पोर्तुगीज अन अरब यांचे साहाय्य मिळते तर एकच मोठी आघाडी झाली असती पण यांनी मदत न केल्यामुळे ही आघाडी चार आघाड्यांत विभागली गेली व ही योजना फसली.
संभाजीराजांनी दिलेला लढा
आता शहा आलम खाडीच्या प्रदेशात आलेला. तस बघायला गेलं तर गोवा ते वेंगुर्ला भाग हा त्याकाळी युद्धासाठी फारच अवघड होता. कारण या खाड्यांची पात्रे नुसतीच रुंद नाहीत तर भरती ओहोटी मूळे चिखलही खूप खोल आहे. म्हणजे माणूस जशी आपली हालचाल वाढवेल तसा तो त्या दलदलीच्या प्रदेशात रुतत जातो. अशा प्रतिकूल परिस्थितीत शहा आलम अफाट फौज घेऊन आला. आता त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास ५-१० मैलांवर एखादी मचूळ पाण्याचा पुरवठा करणारी एखादी विहीर भेटायची. बाकी खाडीचा प्रदेश असल्याने गढूळ अन खारट पाणी होते. त्यामुळे पिण्याच्या वण्याची खूप वाणवा होती. आणि अशातच संभाजी महाराजांनी जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग केला.
जे पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते आणि योग्य होते, त्या पाण्यात संभाजी राजांनी विष कालवले अन सर्व धान्यसाठा लुटला. मुघल फौजेला या गोष्टीचा थांगपत्ता नसल्याने जवळपास ४० हजार सैन्य विषबाधा होऊन मृत्युमुखी पडले. त्या मृत्युमुखी पडलेल्या प्रेतांच्या भयंकर वासाने रोगराई निर्माण झाली, जनावरे मेली. त्या बेकार दुर्गंधीच्या वासाने आजारी पडून कैक मेले. धान्यसाठा लुटल्यामुळे उपासमारीने कैक मेले. आता धान्यसाठा आणायला पण संभाजी राजांनी जागा ठेवली नव्हती, सगळ्या बाजूनी मुघल फौजेला कोंडीत पकडले होते.
जगाच्या इतिहासात शत्रूची गाठच न पडता सैन्य पराभूत झालेली ही पहिलीच लढाई असेल. साधं शस्त्रही न उचलता एवढी मोठी लढाई जिंकणारा पहिला राजा म्हणून इतिहासाला आमच्या संभाजी राजांची नोंद घ्यावी लागते.
अशाप्रकारे निव्वळ बुद्धीच्या बळावर स्वराज्यावर आलेले भलेमोठे संकट संभाजी राजांनी युद्ध न करता, लढाई न लढता, आपला एकही माणूस न गमावता, आपल्या फौजेचे अन रयतेचे काही नुकसान न होऊ देता संभाजी राजांनी मुघलांना पाण्यातून पाणी दावल.
अशा या महापराक्रमी, महा बुद्धिवंत, सगळया क्षेत्रात सर्वोत्तम अशा योध्याला शत शत प्रणाम..
मनापासून अभिवादन🙏♥️🚩