भोरच्या परिसरात !!!
ऐन बहरात आलेल्या श्रावणात यंदा सगळ्याच वाऱ्या चुकलेल्या आहेत. पण हे अडकलेले दिवसही संपणार आहेत आणि भटकंतीसाठी सगळ्यांनाच बाहेर पडता येईल. त्यावेळी भटकंतीचा श्रीगणेशा काहीशा निराळ्या ठिकाणापासून करायला हवी. गर्दी नसेल पण ऐतिहासिक काळात मनमुराद रमता येईल अशी जागा म्हणजे भोरचा परिसर. ऐतिहासिक स्थळे आणि अफाट हिरवागार निसर्ग इथे आपली वाट पाहतो आहे. पुण्यापासून भोर फक्त ५५ कि.मी अंतरावर आहे.(भोरच्या परिसरात)
भोरला येताना वाटेत नसरापूर फाट्यावर थांबून तिथला भोरच्या संस्थानिकांनी बांधलेला स्वातंत्र्यस्तंभ बघायलाच हवा. नसरापूर फाट्याच्या समोरच्या बाजूला कुंपण घातलेल्या प्रांगणात एक दगडी स्तंभ आहे. भोर संस्थांचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून हा स्तंभ उभारला आहे. एका दगडी चौथऱ्यावर मोठ्या डौलात उभा असलेला असा हा स्तंभ. या स्तंभाच्या पायथ्याशी तत्कालीन भोर संस्थानात असणाऱ्या किल्ल्यांची दिशा आणि त्यांची अंतरे संगमरवरी पट्ट्यांवर कोरलेली आहेत. हा स्तंभ इथेच का ? याबद्दल एक कथा सांगतात की तोरणा किल्ला घेण्यासाठीचे डावपेच शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी याच ठिकाणी बसून आखले, अशी या संस्थानिकांची ठाम समजूत होती. स्वराज्याचा श्रीगणेशा ज्या जागी झाला तिथेच त्याचे स्मारक हवे म्हणून संस्थानिकांनी ते इथे उभारले.
इथून पुढे भोर फाट्यावरून पुढे जायला लागले की कासुर्डी इथे गुंजवणी नदीवरचा पूल ओलांडल्यावर उजवीकडे हातवे-तांभाड रस्ता फुटतो. त्याच रस्त्यावर मोहरी गाव आहे. या गावी आहे अमृतेश्वर महादेवाचे एक प्राचीन शिवालय. हे देवस्थान शिळीमकर मंडळींचे कुलदैवत आहे. मंदिराच्या आजूबाजूला काही जुन्या मूर्तींचे भग्नावशेष मांडून ठेवले आहेत. या मंदिराच्या बाह्य भागावर जोत्याच्या तळात असलेले गंडभेरुण्डाचे शिल्प उल्लेखनीय आहे. दोन डोक्याचा बलशाली असा हा काल्पनिक पक्षी आहे. याशिवाय गाभाऱ्यात असलेल्या शिवपिंडीच्या मागील कोनाड्यात असलेली गरुडारूढ लक्ष्मीविष्णूची मूर्ती खूप सुंदर आहे. गाभाऱ्याच्या बाहेर उभी असलेली भैरवाची मूर्तीसुद्धा आकर्षक आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी “दिव्य” करण्याची म्हणजेच न्यायनिवडा करण्याची प्रथा होती. सन १६४८ मध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या समोर इथे एक रवादिव्य झाले होते.
इथून मागे येऊन भोरकडे निघाल्यावर वाटेत डावीकडे एक अप्रतिम निसर्गदृश्य बघण्यासाठी थांबायचे आहे. इथे नीरा नदी खूप सुंदर असे वळण घेऊन वाहते. हे वळण नेकलेस सारखे दिसते. सुरेख अशा या वळणाचे दर्शन काही अंतर खाली उतरून घेता येते. ऐन पावसाळ्यात तर सर्वत्र हिरवागार गालीचा पसरलेला आणि त्यातून हे बाकदार वळण घेत वाहणारी नीरा फारच सुंदर दिसते. इथून पुढे भोरला जावे. भोरचे पंतसचिव आणि त्यांचे भोर संस्थान. राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर इकडे रामचंद्रपंत अमात्यांच्या साथीने शंकराजी नारायण यांनी स्वराज्याचा कारभार मोठ्या समर्थपणे सांभाळला. शंकराजीने राजगड किल्ला मुघलांच्या ताब्यातून जिंकून घेतला तसेच विविध धाडसी कार्ये मोठ्या विश्वासाने पार पडली. त्यांचे हे शौर्य पाहून राजाराम महाराजांनी त्यांना ‘मदारूल महाम’ ही पदवी बहाल केली. याचा अर्थ अत्यंत विश्वासू कारभारी असा होय. पुढे छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून परत आल्यावर शंकराजींना सचिवपद दिले गेले. यांच्या नंतर यांच्या कुटुंबातील विविध कर्ते पुरुष भोरचे संस्थानिक झाले. भोरला पंतसचिवांचा मोठा दगडी वाडा मुद्दाम पाहण्याजोगा आहे.
भोरवरून पुढे वरंध घाटाच्या दिशेने निघाल्यावर वाटेत कारी आणि आंबवडे इथे थांबलेच पाहिजे. इथे असलेला लोखंडी झुलता पूल बघणे आणि त्यावरून पलीकडे जाणे हे केलेच पाहिजे. आपण ऋषिकेशचा झुलता पूल ऐकून किंवा पाहून असतो. पण इथे आंबवड्याचा हा झुलता पूल पार केलाच पाहिजे. पलीकडे गेले की शंकराजी नारायणांची समाधी, नागेश्वराचे मंदिर आणि जवळच असलेले शिवरायांचे सरदार कान्होजी जेधे यांची समाधी या वास्तू बघितल्याच पाहिजेत. रायरेश्वराच्या मांडीवर वसलेल्या कारी गावचे देशमुख होते कान्होजी. अफजलखान स्वारीच्या वेळी मावळातील इतर देशमुखांना एकत्र आणून शिवरायांच्या पाठीशी उभे करण्यात कान्होजींचा सिंहाचा वाटा होता.
या सगळ्या परिसरात कुठे आणि किती फिरू असे होते. सर्वत्र हिरवागार गालीचा पसरलेला, आणि पाठीशी असतो रायरेश्वराचा जबरदस्त डोंगर. आपल्याकडे असलेला वेळ बघून इथून पुढे वरंध घाटात जाणे आणि तिथून पुढे शिवथरघळीला जाणे हा पर्याय आहे. अन्यथा रायरेश्वरावर जाणे आणि तिथे फुललेल्या असंख्य रानफुलांचे दर्शन घेणे हा अजून एक पर्याय. भोरवरून मांढरदेवीला जाऊन तसेच पुढे वाईलासुद्धा जाता येईल. खरेतर इथे कमीतकमी दोन दिवस तरी काढून यायला हवे. पण एक दिवस नुसता भोर परिसरात मनसोक्त हिंडायला ठेवला तरी इथे अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत, त्या व्यवस्थित बघून होतील. इथल्या मातीला ऐतिहासिक घटनांचा स्पर्श झालेला आहे. मराठी वीरांच्या शौर्याचा गंध इथल्या मातीत ओतप्रोत भरलेला आहे. इतिहास आणि निसर्ग यात रममाण होण्यासाठी भोर परिसरात मनसोक्त भटकंती केलीच पाहिजे.
आशुतोष बापट