महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,50,041

रणमस्तखानाची फजिती अन मराठ्यांची विलक्षण युद्धनीती

By Discover Maharashtra Views: 3720 5 Min Read

रणमस्तखानाची फजिती अन मराठ्यांची विलक्षण युद्धनीती

प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या रौद्रशंभो व्याख्यानात काही वाक्ये ऐकली होती ती अशी होती, “एक एक नामचीन सेनापती अफाट ताकदीने महाराष्ट्राला कैचीत पकडायला चाहुबाजुनी आत आत घुसवले अन मराठे सज्ज झाले. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लंगडेतोड चालू केली. मराठे सुसाट सुटले. जिथं भेटेल तिथं मोगलांना कापत कापत राहिले. जिथं जाईल तिथं. अरे सरबुलंद खान मार खाऊन परतला. फत्तेखान तोंड काळ करून गेला. बहादूरखान नुसता पळून पळून दमला. औरंगजेबला चहू बाजूनी फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार पराभव, हार पराभव. अवघा तेवीस वर्षाचा छावा मुघलांना सळो की पळो करून सोडतो. औरंग्या तू महाराष्ट्रात येतो ना, संभाजीराजांनी विलक्षण युद्धनीती खेळली. मराठ्यांच्या फौजा सरळ मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. इतकं इतकं फाटलं की औरंगजेबला काही कळेना. मराठे तिथं आले म्हणून सैन्य पाठवावे तर मराठे पुढं. मराठे पुढं गेले म्हणून सैन्य पाठवावे तर मराठे त्याच्या पुढं. कुठं कुठं शिवावं, सगळीकडेच फाटत निघालय.”

बानगुडे पाटलांच्या व्याख्यानात वरील वृत्तांत ऐकला अन अंगात रोमांच रोमांच संचारले.
नकळत मनाला वाटलं की अशी लढाई कधी घडली असेल? कोणती असेल ती लढाई? पाटील सर कोणत्या लढाईचे वर्णन करत असावेत??
खर तर अशा खूपशा लढाया लढल्या गेल्या असाव्यात.
त्याचा शोध घेण्याचे कुतूहल खूप दिवस मनात होते.
पण त्यानंतर माझ्या वाचनात वरील व्याख्यानातील उल्लेखास मिळतीजुळती अशी एक लढाई आली. ती अशी–

शिवरायांच्या अकस्मात निधनानंतर स्वराज्यावर भले मोठे संकट कोसळले. संभाजीराजे त्यावेळी पन्हाळ्यावर होते. इकडे रायगडावर शिवरायांच्या निधनाची खबर गुप्त ठेऊन कटकारस्थान शिजू लागले. त्यातून संभाजीराजे सहीसलामत बाहेर पडले.

संभाजीराजांनी स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेताच स्वराज्यावर औरंगजेबाचे परचक्र चालून आले.
त्याने आपल्या बलाढ्य फौजा स्वराज्याच्या हद्दीत घुसवल्या. स्वराज्यात घुसणार्या मोगली फौजांना मराठे प्रतिकार करत होतेच, पण स्वराज्याबाहेर पडून मोगली मुलखात त्यांनी कशाप्रकारे धुमाकूळ घातला याची शेकडो उदाहरणे मोगल इतिहासकार खाफिखान, साकी मुस्तेदखान तसेच भीमसेन सक्सेना यांनी लिहून ठेवलीत.

मुघल फौजेत असणाऱ्या भीमसेन सक्सेना या इतिहासकाराने लिहून ठेवलेला खालील वृत्तांत इतिहासात मराठ्यांच्या युद्धनीतीची साक्ष देताना आढळतो.

“रणमस्तखान उर्फ बहादूरखान मोहोजच्या घाटाने कोकणात उतरला. नाशिक प्रांतात मराठे पसरले आहेत व धुमाकूळ घालत आहेत अशी खबर मिळाल्यावर बहादूरखान रामशेजवरून नाशिककडे आला. पण तो तिथे पोहचण्याआधीच मराठे तिथून निघून गेले.
नाशिकचा फौजदार महासिंग बहादुरीया याच्याबरोबर आपले जड सामान व बुणगे ठेऊन बहादूरखान मराठ्यांच्या पाठलागावर रवाना झाला.”

“त्यानंतर मराठे नांदेड भागात पसरले व तिथे जाऊन मुघली फौजांना सळो की पळो करून सोडले. त्यांचा बिमोड करण्यासाठी शहजादा मुअज्जमचा मुलगा शहजादा मुइजुद्दीन याला बादशहाने तिकडे पाठवले व बहादूरखानाने शहजादा मुइजुद्दीन बरोबर राहावे अशी आज्ञा खानाला दिली. त्याच्या आज्ञेचे पालन करत बहादूरखानाने आपले बाजारबुणगे नाशिकहून बोलावून घेतले. खानाने औरंगाबादपासून सोळा कोसावर गोदावरी काठी रामइ येथे शहजाद्याची भेट घेतली.”

“शहजादा मुइजुद्दीन याने नांदेड येथे काही दिवस मुक्काम केला. त्यावेळी नांदेडचा फौजदार रशीदखान उर्फ ईल्हामुल्लाखान होता. तो येऊन शहजाद्याला भेटला अन त्याच्यासोबत तो बिदरपर्यंत गेला. पण त्यादिवशी त्याला खबर मिळाली की- बादशहाचे व मुअज्जमचे हत्ती चरण्यासाठी म्हणून पाथरी भगत ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर मराठ्यांनी जोरदार हल्ला केला आहे. हे ऐकून बहादूरखानाने शहजाद्याला त्याच्या बुणगे लोकांसहित बिदरजवळ सोडले. तो निवडक सरंजाम घेऊन मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. इतक्यात बातमी आली की मराठ्यांनी हत्ती हाकलून नेले. खान त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील लहसुना येथे होता. त्याने नांदेडचा फौजदार रशीदखान याच्याबरोबर आपले जड सामान नांदेडला पाठवले. नंतर त्याने मराठ्यांचा पाठलाग करून काही हत्ती सोडवले. मराठे तिथून निघून गेले पण जाताना आपल्यासोबत ते काही हत्ती घेऊन गेले.

बहादूरखानाने त्याला मिळालेले हत्ती रशीदखानाच्या हवाली केले अन तो पुन्हा मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. तुरुकचंदा(नांदेड जिल्ह्याजवळ, आंध्रप्रदेशात) अन गोवळकोंडा राज्याच्या सरहद्दीजवळ त्याने मराठ्यांना गाठून बाकीचे हत्ती सोडवले. त्यानंतर बहादूरखानाने बिदरजवळ कमठाण्याच्या तलावाच्या काठी मुक्काम केला. नांदेडहुन त्याने बाजारबुणगे मागवून घेतले. पण या पाठलागात खानाच्या सैन्याला प्रचंड त्रास झाला. बहादूरखानाचा तंबूही त्याच्यासोबत नसायचा. जेवणाखाण्याचेही खूपच हाल झाले. या मोहिमेत त्याचे अनेक सैनिक ठिकठिकाणी मागे राहत गेले ते नंतर बऱ्याच दिवसांनी छावणीत आले.”

संभाजीराजांच्या काळात मराठे कशाप्रकारे नाशिकपासून गोवळकोंड्याच्या हद्दीपर्यंत धुमाकूळ घालत होते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
विशेष म्हणजे मराठ्यांची ही युद्धनीती भविष्यात म्हणजे राजाराम महाराज तसेच महाराणी ताराबाई यांच्या काळातसुद्धा बदलली नाही.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a Comment