फकीरा, क्रातितिर्थ, वाटेगाव | अपरिचित इतिहास व समाधी –
“हाती तलवार घेऊन यांच्या छाताडावर नाचलं पाहिजे” असं म्हणून बलाढ्य इंग्रजी सत्तेला आव्हान देणारा फकीरा. गोरगरीब जनतेला इंग्रजाच्या कैदेतून सोडवण्यासाठी फासावर जाणारा फकीरा, विश्वासघातकी वातावरणात विश्वास निर्माण करणारा फकीरा, प्रामाणिक कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देणारा आहे.इतिहास.
फकीरा रानोजी साठे म्हणजे विर योध्दा फकीरा मांग याचा जन्म आणि राधामायी रानोजी साठे यांच्या पोटी १ मार्च १८८५ साली वाटेगाव ता. वाळवा जि. सांगली येथे झाला आहे. इंग्रजी राजवटीत गोरगरिबांच्या छळाच्या विरोधात फकिरानं लढा दिला आहे. माणूस वाचला पाहिजे, जगला पाहिजे यासाठी फकिराने प्राणाची बाजी लावून संघर्ष केला आहे. नेहमीप्रमाणे इतिहासाने अशा या बहादूर महानायकाची नोंद घेतली नाही.
थोर साहित्यिक विचारवंत अण्णा भाऊ साठे यांनी या महानायकाचा विचार, लढा, संघर्ष जगासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘फकीरा’ या अजरामर साहित्यकृतीच्या माध्यमातून केला आहे. फकिराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ‘फकीरा’ ही कादंबरी लिहिली आहे. फकीरा मांगाचा जो काही इतिहास आहे तो तसाच्या तसा अण्णाभाऊ साठे यांनी रेखाटला आहे. फकिराच्या सोबत राहून संघर्ष केलेले एकूण एक पात्र त्या मातीत खेळलेले आहे, बागडलेले आहे, लढलेले आहे आणि त्याच मातीत एकरूप झालेलं आहे.
फकीरा नावाच्या महानायकाच्या विचारात आणि क्रुतीत तसूभरही अंतर नव्हतं याचे काही दाखले इथं दिले पाहिजेत. जसे की,
माणसाच्या जगण्या आड कायदा येत असेल तर कायदा झुगारून माणसं वाचण्यासाठी वेळप्रसंगी चौकट तोडली पाहिजे मात्र अशी चौकट तोडण्यामागचा प्रामाणिक हेतू माणूस आणि माणूसच असला पाहिजे. सरकारी धान्याची कोठारे लुटून दुष्काळात गोरगरीब जनतेचा जीव वाचवणारा फकीरा. अन्न-पाण्यावाचून मरणारी माणसं वाचणारा फकीरा.
“मी खजिना न्हेनार हाय, तुमासनी ओरबडाय मी आलो न्हाय. आब्रु खाऊन उपाशी माणसं जगत नसत्यात.” असं म्हणत महिलांच्या अब्रुशी इमान राखणारा फकीरा. आपण फासावर जाण्यामुळे आपल्या लोकांची छळ छावणीतून मुक्तता होणार असेल तर आपण फासावर गेले पाहिजे असा त्यागाचा, बलिदानाचा विचार देऊन फासावर जाणारा फकीरा.
“ही तलवार माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवाजीराजांनी दिली. ही तलवार घेऊन माझा बाप खोतासंगं लढला नि तिला घेऊन मी तुमच्याशी लढलो.” असं म्हणून त्याच्या जातीचं क्षत्रियाशी नातं सांगणारा फकीरा आधुनिक पिढीसाठी खरा महानायक ठरणार आहे.
१ मार्च २०२० रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे फकीरा रानोजी साठे या विरयोद्ध्याची पहिली जयंती फकीराच्या समाधी जवळ साजरी करण्यात आली . शोषणमुक्तीची सशक्त चळवळ उभी करण्यासाठी आम्हाला अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकीरा’ कादंबरीतून ‘फकीरा’ बाहेर काढावा लागणार आहे. मांग जातीला देशोधडीला लावणाऱ्या इंग्रजाच्या जुलमी कायद्याच्या विरोधात फकीरा लढला आहे. ( सकाळ )
फकीराच्या अंगात असणारा झुंजारपणा ,बंडखोरपणा ,लढताना मरण पत्करायची तयारी, स्वाभिमान , मदत करण्याची वृती असणा-या फकीराची समाधी वाटेगाव ता वाळवा येथे साध्या स्थितीत असून ती समाधी व त्याचा इतिहास फारसा लोकांना परिचीत नाही . त्याच्या समाधी जवळ ती समाधी कोणाची आहे याचा साधा फलक ही नसावा ही शोकांतिका आहे.
फकीरा हे पात्र काल्पनिक नसून ते ब्रिटीशां विरुद्ध लढणारा शूर स्वातंत्रयोध्दा आहे.
संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड, पुणे