फलधारिणी –
कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.८ –
सौंदर्यप्रसाधनांमध्ये मग्न असणाऱ्या सुरसुंदरीच्या समूहामध्ये कोरवली येथे एकूण पाच सुरसुंदरी आहेत . या सर्व देवांगना स्वर्गीय अप्सरा आहेत. त्यामध्ये हातात फळ घेतलेली एक नयनरम्य अशी सुरसुंदरी आहे. तिच्या हातात बिजपुरक फळ आहे. म्हणूनच तिला फलधारिणी म्हणावे का? हा प्रश्न पडतो. खरे तर काही ग्रंथात अशा अप्सरांना गौरी असे संबोधले आहे. अशी विविध नावे असणारी ही सुरसुंदरी कोरवलीच्या मंडोवरावर स्थित आहे. कोरवली सारख्या अतिशय लहान खेडेगावात उत्तरचालुक्यकालीन जे शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराच्या मंडोरावर विलोभनीय असे फलधारणी देवांगणेचे शिल्प पहावयास मिळते. या सुरसुंदरी चे वैशिष्ट्य म्हणजे कोठेही न भंगलेली खंडलेली आहे.
अत्यंत सुबक देखणी शिल्पकृती कलाकारांनी आपले सर्व कौशल्य हिला घडवण्यासाठी खर्ची पाडलेले आहे. वास्तविक फलधारिणी ही संज्ञा कोठेही नसताना ती याठिकाणी का निर्माण केली असावी? हा देखील प्रश्न आहे,
वलयांकित प्रभावळ हिच्या मस्त काशी कोरलेली असून त्याच्या मध्यभागी या सौंदर्य लतिकेचे हसरे किंचित उभट गोलाकार मुखकमल आहे. एखाद्या सरोवरामध्ये सूर्योदयास दवबिंदुनी न्हाहून निघालेले कमलपुष्प जसे भासते, तशा ताज्यातवान्या कमल पुष्षाप्रमाणे हिचे लोभस मुखकमल आहे. मस्तकावरील आकर्षक केशरचना आणि कानाच्या पाळीतून ल्यायलेली आणि दोन्ही गालशी लोंबणारी भलीमोठी कर्णभूषणे शोभिवंत आहेत.
चेहऱ्यावर हसरा भाव असला तरी हे हास्य एका तारुण्यसुलभ सौंदर्य लतिकेचे आहे. म्हणूनच त्यामध्ये थोडासा सौंदर्या भिमान मिसळलेला आहे. द्विभंगा अवस्थेत उभी असणारी ही स्वर्गीय देवांगणा चित्ताकर्षक आणि ठसठशीत आहे. तारुण्याचा बहर चढलेले स्त्री सौंदर्य कसे असावे हे ह्या शिल्पांमध्ये दाखवण्यात कलाकार शंभर टक्के यशस्वी झालेला आहे.
देवांगणा किंवा सुरसुंदरी म्हटले की, त्यांच्या अंगाखांद्यावर विपुल प्रमाणात आभूषणे आणि वस्त्रप्रावरणे असलीच पाहिजे .कलाकारांनी या फलधारिणीला हे सर्व लेणे चढविले आहे. कंठहार ,स्कंदमाला हीक्कासूत्र, स्तनहार, केयुर, कटकवलय हिने परिधान केलेले आहे. कमरेशी असणारे कटीसूत्र त्या कटिसूत्राच्या खाली तोरणाप्रमाणे भासणारी उरूद्दाम आणि त्यामधून लटकलेल्या मोत्यांच्या माळा अर्थात मुक्तद्दाम ही आभूषणे लक्षणीय आहेत. तिने परिधान केलेल्या वस्त्रांची, उंची वस्त्रे म्हणून गणना व्हावी अशा रीतीने तिच्या दोन्ही पायांमध्ये लोंबणारा वस्त्रांचा भरजरी सोगा कलाकाराने मोठ्या खुबीने दाखवलेला आहे. त्याचे सहा पदर मोजता येण्यासारखे आहेत.
नक्षीदार तोड्यासारखे भासणारे पाद वलय आणि नाजूक पावलांवर पसरलेली पादजालक तिच्या आभूषणांची शेवटची पायरी ठरतात. किंचित झुकलेल्या उजव्या कमरेशी नाभीच्या खाली विसावलेला तिचा उजवा हात व नाजूक बोटे जास्त देखणी आहेत की, तिचे सौंदर्य देखणे आहे? हा प्रश्न पाहणाऱ्या पडतो. डाव्या हातात अलगद धरलेले बिजपुरक तिच्या अस्तित्वाची आणि शिल्पांकित करण्याचे कारण दाखवतो. कोणत्याही ही ग्रंथात हिचा उल्लेख जरी नसला तरी ही सुरसुंदरी याठिकाणी पहावयास मिळते. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांच्या मंडोरावर अशा सुरसुंदरी पहावयास मिळतात.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर